पवित्र उपदेश - श्लोक ११ ते २०
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
अशा या संसारीं रत मनुज भोगूनि विषयां । सदां मोहीं गुंते नच कधिं मनीं मानि विषयां ॥
घरीं आला कोणी अतिथि तरि त्या दे न कवडी । कुसंगानें ऐसा फुकटचि पहा काळ दवडी ॥११॥
हा पापी नर जाउनी यमपुरीं भोगी बहू यातना । दुष्कमीं वय घालवी प्रतिदिनी ज्याची कुडी वासना ॥
राधे काय वदूं तुला, पशुचि ते जे यापरी वागती । झाले धन्य सदा विमुक्त जन जे संतांपदीं लागती ॥१२॥
असो इतर या कथा ह्रदयिं सत्पथा तूं वरीं । सुसंगति धरीं सदा कधिं न तूं अकार्या करीं ॥
तरी प्रिय तूं राधिले रघुपतीस होसी पहा । हरूनि दुरितें तुझीं करिल तो सुखी पापहा ॥१३॥
बहुत सुख मिळावें सर्वही दु:ख जावें । विविध विषय भोगीं सर्वदा कीं रमावें ॥
अशिच सकळ जीवां वासना मानसीं ती । परि न घडत ऐसें ही जगाचीच रीती ॥१४॥
विषय नश्वर हें सकळां कळे । परि न वृत्ति सुख स्वरुपीं वळे ।
पडति मृत्यु मुखीं जन पाहत्ती । तरिहि त्यांतचि लोळुनि राहती ॥१५॥
पडे विस्मृती राघवाच्या पदाची । मला वाटतें ती खरी आपदाची ॥
घडी एक जो रामराया न सोडी । तया देतसे तो निजानंद गोडी ॥१६॥
वैराग्या परतें न भाग्य वदती जें संत साधू मुखें । सत्यत्त्वें मनुजें मनीं धरुनि तें लोकीं रहावें सुखें ॥
ऐसा लाभ दुजा नसे नर तनू जी राघवें दीधली । झालें सार्थक ती जरी निशिदिनी त्याच्या पदीं लागली ॥१७॥
घडी आयुष्याची बहुत धन देतांहि न मिळे । असा जातो व्यर्थ प्रतिदिनिं कसा काळ न कळे ॥
मुखें निंदी संतां परि नच अनंता मनिं धरी । अशा या पापानें मिळवि नर तो दुर्गति खरी ॥१८॥
न कोणी कोणाचा सकळ सुख शोधीत फिरती । जरी लाभे पूर्ण स्वसुखतरि त्या वृत्ति विरती ॥
करावें अभ्यासा गुरुचरणिं विश्वास धरुनी । स्मरावें तन्नामा घडि अहंता विसरुनी ॥१९॥
मी माझें करि पात्र जन्ममरणा जो त्याग याचा करी । तो ज्ञानी गुरुभक्ति युक्त गमतो निष्ठा जयाची खरी ॥
जे जे वृत्ति उठे तिला मिळवि जो आत्मस्वरूपीं बरी । राहे यापरि धारणा धरुनियां तो विश्व हें उद्धरी ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : June 16, 2014
TOP