प्रार्थनापर पदें - पदे १६५ ते १७०
श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.
पद १६५ वें.
मजविषयिं तें मन निष्टुर कां केलें ॥धृ०॥
प्रर्हादासाठी कडकड घडघड शब्दें, स्तंभिंच जें उदेलें । गजेंद्रासी नक्रें गांजितां, होउनी सकृप जें त्वरें गेलें ॥मज०॥१॥
होउनि भक्तांसी लंपत हरी जें, संकट आयिकेलें । कीर्ति किती संत महंतांची चित्त स्वानंद होउनि ठेलें ॥मज०॥२॥
दुर्जन वधार्थ सज्जन सुखार्थ जागृत जें न निजेलें । विष्णु कृष्ण जगन्नाथ सच्चित्सुख भेटुनियां बह भक्त समाधान कार्य सिद्धिस नेलें ॥मज०॥३॥
पद १६६ वें.
धांव रे धांव माझ्या पंढरिनाथा । श्री रघुनाथा । सोसवेना मज या संसार व्यथा ॥धृ०॥
पुत्र नातु पणतु सुना आणि जावया । भुलुनियां पाहे माझें वय जावया ॥धां०॥१॥
तूंचि एक मज मागें पुढें रक्षिता । किति वेळ झाला तुझि वाट लक्षितां ॥धां०॥२॥
जळुं ऐसें जिणें माझें लजिरवाणें । घडि एक नाहीं तुझें नाम मुखीं गाणें । धां०॥३॥
कोणीकडे जाऊं तुज पाहुं कोणे ठाया । नेणों कधीं पडेल हे नाशिवंत काया ॥धां०॥४॥
धरुंनियां सोस विषयांचा अंतरी । जन्म मरणाच्या पडलों मी भरी ॥धां०॥५॥
अससि ह्लदयिं निश्चय मानसाचा । अंत पहातोसी काय दिना गरिबाचा ॥धां०॥६॥
अपराधि म्हणूनी मी त्यजिसी तूं जरी । सदय ह्लदय नाम गेलें तुझें तरी ॥धां०॥७॥
सोडुनियां ऐसा मज रहासि तूं ऊगी । संतपथें आपणासी आकळीन जगीं ॥धां०॥८॥
सच्चित्सुख विष्णु कृष्ण जगन्नाथा । सद्भावें गाइन नीत्य आत्म गुण गाथा ॥धां०॥९॥
पद १६७ वें.
आतां कैसा सोडिन तुला मी सांपडला अंतर्यामी ॥धृ०॥
तुज शोधितं श्रीरामा रे काळ गेला बहु सुखधामा रे ॥आ०॥१॥
आजी गवसलसि हाता रे । उलट दृष्टीनें पहातां रे ॥आ०॥२॥
जरि तूं नाना रूपें धरिसी रे । एक सच्चित्सुखमय स्फुरसी रे ॥आ०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथारे । मुखें गाइन निजगुण पाथारे ॥आ०॥४॥
पद १६८ वें.
किति काळ झाले अजुनि न भेटसी मज । येतां वाटे कोणि काय आडविलें तुज । काय गरिबाची माझी करितोसी मौज । तुजविण कंठवेना मज प्रतिरोज । राम हरे कृष्ण हरे गोविंद हरे गोपाल हरे ॥रा०॥१॥
दिला मज मनुष्य जन्म तुवां आईबापें । न भेटसि काय माझीं सरलीं न पापें । गिळियलें पहा मज मृत्यु रुप सापें । कासाविस झालों संसाराच्या धापाधापें ॥रा०॥२॥
पुरे नको आला विट प्रपंचाचा जाण । वाटे जीव द्यावा गळां बांधुनि पाषाण । येरे झडकरिं माझा जाऊं पाहे प्राण । त्रिविध तापें तापयलों मी देवा तुझी आण ॥रा०॥३॥
माझ्या कन्या माझे पुत्र म्हणतां माझी दारा । सरलें आयुष्य दे रे आत्म पदीं थारा । विषय वासनांचा मज लागों नेदि वारा । आपणा विरहित कोणी न मज उदारा ॥रा०॥४॥
वाट पाहे तुझी विष्णु कृष्ण जगन्नाथा । कळे तैसी गातों प्रेमें निजगुण गाथा । न करीं विलंबा येरे वेगें दिनानाथा । ठेविन सद्भावें आत्मपदावरी माथा ॥रा०॥४॥
पद १६९ वें.
व्यर्थ हें वय जाय तुज विण हें राघवा । मज भेटसी तूं केधवां ॥धृ०॥
शामल सुंदर राम मनोहर दर्शन दे निज भक्ती लाघव ॥व्य०॥१॥
गृहधन दारा मोह पसारा भ्रमकर वाटे आघवा ॥व्य०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ दयाळू त्रिजगांत । उद्धरिं जानकीच्या धवा ॥व्य०॥३॥
पद १७० वें.
मज तारीं रे तारीं रे राघवा । तारीं दशवदनारी विघ्नें हीं निवारीं ॥मज तारीं॥धृ०॥
काया वाचा मनें तुज शरण मीं रघुराज दाविं निज पद राजिवा मला ॥ वेगीं दाविं०॥
दुस्तर हा भवजलधि न तरवे करीं कृपा दृष्टी देवा कष्टी झालों भारीं ॥मज०॥१॥
नेणुनि आत्मभजन विषयीं भ्रमनी मन विसरवि स्वसुख जिवा रघूत्तमा ॥वि०॥
क्षणभंगुर तनु धीर न, गेलें जातें वय माझें या संसारीं ॥मज०॥२॥
राम विष्णु गुरु साक्षी कृष्ण जगन्नाथ लक्षी आपण चिद्घन दिवा अलक्ष जो ॥आपण०॥
परी देह बुद्धी खोटी हरितां न हरवे धांव झडकरिं ब्रह्मानंदिं वृत्ति सारीं ॥मज०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP