पद १७१ वें.
रामा माझीच चूक मज कळली कळली रामा०॥धृ०॥
बाळपणिं बाळमती धरुनी बाळसंगती । खेळतां खेळतां वृत्ति मळलि मळली ॥रा०॥१॥
मन्मित्र पुत्र कलत्र स्मरतां दिवस रात्र । माया हे चित्र विचित्र बळलि बळली ॥रा०॥२॥
तरुणवयि पाहुनि तरुणि नयनी । केली करणी वाइट स्थिति चळलि चळलि ॥रा०॥३॥
विष्णु गुरु ज्ञान देतां त्यांचि कृष्ण जगन्नाथा । तेणें देहींची अहंता गळलि गळली ॥रा०॥४॥
पद १७२ वें.
सत्संगें तुजला श्रीरामा गांठिला न सोडिं रे ॥धृ०॥
मिथ्या माया दृष्य पसारा द्रष्टा तूंचि नटला सारा रे । थारा स्वस्वरुपींच मजला निजानंद गोडी रे ॥स०॥१॥
जरि पैसावसि कांहीं बळें धरिन ह्लदयिं पाहीं रे । भक्तांहुनि प्रिय तुज नाही ( रे ) कळली हे खोडी रे ॥स०॥२॥
सर्वदा तुज गातां ध्यातां विष्णु कृष्ण जगन्नाथा रे । ऐसी पदवी आली हाता सच्चित्सुख जोडी रे ॥स०॥३॥
पद १७३ वें.
शरण तुला मिं राघवा, तारीं दशवदनारि रे ॥धृ०॥
शाम सुंदर प्रभुराम दयाघन, वर्षुनि त्रिताप वारीं रे ॥श०॥१॥
अवलेकिन तुज हेतु असा मज, उपजला मनिं भारीं रे ॥श०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा सोसवेना भव व्यथा, जन्म मृत्यु परिहरीं रे ॥श०॥३॥
पद १७४ वें.
दाखविं पद पंकज रघुराज एकदा ॥धृ०॥
जाचवि मति पांच विषयिं लाचवली सदा, साचारे तुजवांचुनि अघ सांचलें चित्तिं कांच बैसुनि वांचेना कदा ॥दा०॥१॥
जानकिपति पाहति किती अंत सर्वदा, संत सद्नति सतत आत्म चिंतनिं मज भेटुनि हरिं वेगिं आपदा ॥दा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ इछि दैवि संपदा, कंपवि देहा हंपण दु:संपवि अपरंपरा नुरविं असन्मदा ॥दा०॥३॥
पद १७५ वें.
तूंचि जननि जनक निज जानकी जीवन मज तारक सर्वदा ॥रामा०॥
सदया, उदयासि सदोदित ये ह्लदयांत हरी विपदा । चरणिं शरण भव तरणिम करुणाघन स्मरण तुझें सदा ॥रा०॥धृ०॥
जाचवि मन जनिं याचुनियां वांचविं श्रीहरि यांतुनियां ॥ नाचवि घडि घडि धरुनि विषयिं गोडि आवरिं एकदा ॥रा०॥
करुं काय, प्रभो न उपाय सुचे, तुज गाय मुखें शतदा, । पुरे पुरे पुरे इहपर विषयिक सुख मुक्त नव्हे कदा ॥रा०॥स० च० तूं०॥१॥
क्षणभंगुर चर नरकाया, परमात्मा श्री रघुराया माय मय जाया गृह सुत धन मिथ्या संपदा ॥रा०॥
व्यवसाय मुळें वय जाय, न पाहुनि पाय तुझे सुखदा । मुख दाखवुनि माझें चुकविं सकळ दु:ख नुरवुनि आपदा ॥रा०॥ स० च० तूं०॥२॥
जरि अपराधी अनंत तरीं रक्षण तुजविण कोणा करी, न क्षणभरि धीर न धरवे अंतरिं परमानंददा ॥रा०॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ नाम तुझें स्मरि शामसुंदर वरदा । वरदार, परिवार, तुजवरि सार भार आळवितों पद ॥रा०॥ स० च० तूं० ॥३॥
पद १७६ वें.
पहावा राम सदोदित हाचि मला हेतु भारी॥धृ०॥
जिवन जिवाचें धाम सुखाचें नाम जपे त्रिपुरारी ॥ जयाचें ना०॥ प०॥१॥
काम मनोहर शामसुंदर वामांकिं जानकी नारी ॥ जयाचे वा० प० ॥२॥
स्मरणिं अखंडित चरणिं पवन सुत करणि अगम्य संसारीं ॥ जयाची क० प०॥३॥
जनक जननि जो भक्त जनाचें संकट विघ्न निवारी ॥ जनाचें सं० प० ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ सदा अद्वय आनंदकारी ॥ सदा अ० ॥ प०॥५॥
पद १७७ वें.
राम मनोहर शामसुंदर जानकी वर पाहिं सदोदित ॥धृ०॥
चाप बाण धर ताप सकल हर यापरता नाहिम दयाघन या० आप शिवाचा बाप जयाचा सुख दाता देहिं अखंडित ॥रा०॥१॥
स्नेहि असा मज ज्या विण न दिसे जनिं विजनीं गेहीं सर्वदा ॥रा०॥२॥
एक असुनि जो अनेक याची किती वदुं नवलाई । सेव्य सेवक व्याप्य व्यापक त्रिजगाचे ठायीं ॥रा०॥३॥
चिन्मय स्वरुपी तन्मय असतां जन्म न तुज बाई । साच कीं राम विष्णु कृष्ण जगन्नाथचि तारिल लवलाही ॥रा०॥४॥
पद १७८ वें.
अजुनि कां न येसि राम राया रे । गेलें माझें व्यर्थ वय वाया रे ॥आ०॥धृ०॥
प्रपंच हा करितो मज क्षिण रे । उबगलों वाटुनि बहु शीण रे । जीउं कोणा शरण तुजवीण रे । कोण काजी गुंतला कोणा ठाया रे ॥अ०॥१॥
विषयींचे जाच जाणुनि रे । निज बळें लाथ ह्मणुनि रे । राजे गेले राज्यें सोडुनि रे । एकांत स्वरुपीं रमाया रे ॥अ०॥२॥
रघुविरा राजीव लोचना रे । कोणाशीं करुं मी याचना रे । विशयाशा बंध मोचना रे । क्षणभंगुर हे तौं काया रे ॥अ०॥३॥
भेटीसाठीं तळमळत भारीं रे । मुखें गातोम श्रीराम क्रुष्ण हरी रे । सुख व्हाया बहुत अंतरीं रे । आळबितों अद्वय रस प्यायारे ॥अ०॥४॥
कृष्ण जगन्नाथ हेतुला रे । न पुरतां लाज हे तुला रे । भव समुद्रींच्या सेतुला रे । दाखविं दिव्य तव पायारे ॥अ०॥५॥
पद १७९ वें.
भक्तांचा कैवारी श्रीराम आजि म्या पाहिला ॥धृ०॥
कोटि मदन लावण्य मनोहर स्तविति पुजिति, ब्रह्मादिक सुरवर रत्न जडित सिंहासनि रघुविर जानकीसह शोभला हो ॥कै०॥१॥
उमारमण शिव सांब निकट अति, भक्तियुक्ति करि नम्रपणें स्तुति, नाम स्मरणें वानर गर्जति, थाट वाटतो भला हो ॥कै०॥२॥
चाप बाण करिं ताप समुळ हरी, पाप परि हरुनि आपण सुख करि, बाप माय विश्वासाचा श्रीहरि, दिव्य नयनिं झोंबला हो ॥कै०॥३॥
काम जनक निज नाम प्रिय निष्काम, भजक जन काम पूर्ण करि धाम, सौख्य कल्पद्रुम साचा दृढ ह्लदयीं खोंवला हो ॥कैवा भ०॥४॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथा, दिवस रात्र आवडीनें घ्यातां, अद्वय मुक्ति सुखाचा दाता, अलभ्य हा लाभला हो ॥कै० भ०॥५॥
पद १८० वें.
अजोध्यापुरमें राज्यासनमों राम बैठे हैं , राजाराम० सीताराम० अछाराम० ॥धृ०॥
सूरत मूरत आखनमों, देखनके सज्जन आते है, बडे भारसे खडे रहै नर सुरवर शीस नमावत है ॥अ०॥१॥
जडाव सुन्नाके रतन मुकुत झग झग झग मन हर्ते हैं, जबलग दर्शन करके तबलग जनमों हर्सन मावत है ॥अ०॥२॥
चंद्रकोटी सूरज विज्युत्के लख लख तेज चमकतके है, बैजयंति मोतनके माला गलमें चक झलकते है ॥अ०॥३॥
धनुरव बाण धर वामांक पर बेटी जनक न्रुपन के है, जनन मरन भय हरन करित प्रभु, चरन कमल दासन के है ॥अ०॥४॥
सामसुंदर के सिरकेउपर छतर पताका धर्ते है, भरत लछमन बबिखन सतुघन चाम करके डालत है।अ०॥५॥
बानर बहुविध नलनिल अंगद सुग्रिव सुखमें रमते है, अंजनि के सुत आगे जै जै रघुवीर समर्थ कहते है ॥अ०॥६॥
सब संतन के थाट मिल रहे, मुखसे नाम समर्तें है, बिना ताल खन खन खन धिमिकिट धिमिकिट मृदंग बजावत है ॥अ०॥७॥
भगत प्रेमसे राम भुलगये, जगत्कु आनंद कर्तें है, प्रभु रामचंद्र महाराज दयाके सागर मनमें डुलते है ॥अ०॥८॥
हात जोर के बिनति करे सब, देव देवन के सुनते हैं, बिसनु किसन जगन्नाथ बडा, आत्म भजनमें रंगते है ॥अ०॥९॥