पद २१३ वें.
दामोदर पद धरा । करा निज आत्म विचार बरा ॥धृ०॥
देह मी ऐसें मानिति कांहो, समज मनीं घ्या जरा । चिन्मय अमृत त्यजुनि न सेवा, प्रपंच हाका जरा ॥दा०॥१॥
कोण मी कैंचा आलों याचा शोध करुनि अंतरा । पूर्णानंदानुभवें मृगजलसम, भव सागर हा तरा ॥द०॥२॥
रज्जुज्ञानें सर्प भयाचा, मिथ्याभ्रम परिहरा । जगन्नाथ सुत कृष्ण वदे जरि, नकळे सद्रुरु करा ॥दा०॥३॥
पद २१४ वें.
श्री दामोदर मी तव किंकर, पूर्ण कृपा कर देवा रे ॥श्री०॥धृ०॥
बहु अन्यायी मी मज पाळिसी, जरि चुकलों निज सेवा रे ॥श्री०॥१॥
जाळुनि मत्तम हे पुरुषोत्तम, दाविं निजात्मा ठेवा रे ॥श्री०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याला, देईं शाश्वत मेवा रे ॥श्री०॥३॥
पद २१५ वें.
देइल सुख दामोदर तुज गा ॥धृ०॥
जवळिं असे ह्लद-यांत विलोकी, कां भुलतोसि जगा ॥दे०॥१॥
आत्मा रज्जुवरी कल्पुं नको, मिथ्या जग भुजगा ॥दे०॥२॥
प्रार्थीं कृष्ण जगन्नाथात्मज, स्वस्व-रुपीं भज गा ॥दे०॥३॥
पद २१६ वें.
जन बसले कां उठा या दामोदर भेटी ध्याया ॥जा०॥धृ०॥
त्रैलोक्याचा नाथ तुम्हाला, समर्थ इच्छित द्याया ॥ज०॥१॥
पूर्ण कृपेचा सागर जाणुनि, वदनिं निरंतर गाया ॥ज०॥२॥
भावें विष्णु जगन्नाथात्मज, शरण तयाच्या पायां ॥ज०॥३॥
पद २१७ वें.
धन्य दिवस वाटला, नयनिं आजि श्री दामोदर पाहिला ॥धृ०॥
गुंतुनिं जो भक्तांचे वचनीं, जंबावलिं राहिला ॥न०॥
घडला बहु अपराध क्षमेनें, नेणों किति साहिला ॥न०॥२॥
जगन्नाथ सुत कृष्णें मस्तक, भावें पदिं वाहिला ॥न०॥३॥
पद २१८ वें.
श्री दामोदर मजला देइं झडकरीं निजचरणिं विसावा ॥धृ०॥
क्षणिक विषय सुख मानुनि याचा, तिळभरि तरि मज संग नसावा ॥श्री०॥१॥
वृत्ति रहित आनंदानुभवें, जनिं वनिं मनिं चिन्मात्र दिसावा ॥श्री०॥२॥
विनवी कृष्ण जगन्नाथात्मज, तुजवरि हरि बहु प्रेम असावा ॥श्री०॥३॥
पद २१९ वें.
जोडुनि कर दामोदर वंदा ॥धृ०॥
तत्वविचारें साधुनि घ्या हो, निज आत्मानंदा ॥जो०॥१॥
भक्ति ज्ञान विरक्ती योगें, लागा या छंदा ॥जो०॥२॥
बोले कृष्ण जगन्नाथात्मज, हाचि खरा धंदा ॥जो०॥३॥
पद २२० वें.
सुखकर दामोदर ध्यावा हो ॥धृ०॥
चिन्मय ध्यान निरंतर करुनि, कांहिं विसावा ध्यावा हो ॥सु०॥१॥
अज्ञानें हा काळ तुमचा, फुकत म जाऊं द्यावा हो ॥सु०॥२॥
सांगे कृष्ण जगन्नाथा-मज, निजानंद रस प्यावा हो ॥सु०॥३॥