पद १५१ वें.
कां रे उचात तूं ऐसा । प्राण्या न कळुनि कोण मी कैसा ॥धृ०॥
सत्कर्मावरि निष्ठा न तुझी । जनविसि मात्र तूं पैसा ॥कां०॥१॥
ज्या त्या अंगावरि तूं येसी । क्रोधानें पशु जैसा ॥कां०॥२॥
गुरु विष्णु कृष्ण जगन्नाथ । तुजहि सुखद हो तैसा ॥कां०॥३॥
पद १५२ वें.
मीपण शोधिं तुझें शोधिं तुझें । कोठुनि बा हें उपजे ॥धृ०॥
उगेंचि असतां जेथें, मीपण उमटे लक्षी तेथें ॥मी०॥१॥
नसतें बोलसि वदनी । मीपण नेईल तुज यम सदनीं ॥मी०॥२॥
मी मी ह्मणवुनि उडसी । अवाच्य शब्द बडबडसी ॥मी०॥३॥
मीपन धरिसी खोटें । निद्रेमाजि असे तें कोठें ॥मी०॥४॥
आवडि गुरुपदिं साची । विष्णु कृष्ण जगन्नाथाची ॥मी०॥५॥
पद १५३ वें.
चला गडे या हो, अयोध्येसी जाऊं । भक्त काम कल्पद्रुम राम नयनिं पाहूं ॥धृ०॥
नाशवंत देह, तैसा हा संसार । अभिमानें मोठे मोठे नाडियले फार ॥ चला०॥१॥
अनंत जन्मीचें पुण्य ज्याचे गाठीं । त्यास अनायासें होय, सुखें राम भेटी ॥चला०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ राम कृपा मूर्ति । ऐसी हे प्रगट झाली, त्रैलोक्यीं सत्कीर्ति ॥चला०॥३॥
पद १५४ वें.
राम कृष्ण हरि ह्मणा, राम कृष्ण हरी । सुखें करा काम, परि मुखें बोला राम । आला सीताराम, चला पाहूं अभिराम ॥ रामकृष्ण हरि ह्माणा०॥१॥
नाम गाय भावें, त्याचें काम देव करी ॥रामकृष्ण ॥रा०॥२॥
श्याम सुंदर राम तनु, काम कल्पतरु । धाम आनंदाचें त्याचें नाम नित्य स्मरूं ॥रा०॥३॥
गळां वैजयंती माळा, शोभे मेघश्याम । वेळों वेळां साधु जेथें पावती विश्राम ॥रा०॥४॥
हळाहळ शिव प्याला कळत मुद्दाम । कळा निधी हुनी जळा फळला श्रीराम ॥रा०॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ अचल आराम । सेवितां सेवितां होय विपदविराम ॥राम०॥६॥
पद १५५ वें.
भाग्यवंत ऐसा मनुजा तुझ्यासम कोणिच नाहीं ॥धृ०॥
ह्मणसि भाग्य माझें कैसें । ह्लदयीं राम प्रगटे ऐसें । जैसें कर्म करिसी तैसें । प्राप्त फळ न संशय कांहीं ॥भा०॥१॥
जरि तूं जाउनि करिसिल चोरी । मार खासिल परोपरी । आपुला आपण होउनि वैरी । दंड होती ते ते साहीं ॥भाग्य०॥२॥
मुखें नाम हातीं टाळी । वाजवि त्याचीं विघ्नें टाळी । विसंबेना कधिं वनमाळी । मागें पुढे रक्षित राही ॥भाग्य०॥३॥
नवविधा मक्ति केली । ब्रह्मानंद पदवि उदेली । दु:ख दुर्दशा ते गेली । सांडुनियां दिशा दाही ॥भाग्य०॥४॥
जरि तूं होता वृषभ गाई । श्र्वान सुकर नव्हति बढाई । भगद्भक्ति घडती काई । विचारें आप आपणांत पाहीं ॥ भाग्य०॥५॥
मनुष्य जन्म पदवि न थोडी । पुनर्जन्म बंधन तोडी । लागेल जरी सज्जन गोडी । न पडवी दु:ख प्रवाहीं ॥भाग्य०॥६॥
दाटुनी जरी पापें करिसी । लक्ष चौर्याशिं योनी फिरसी । जन्मुनि जन्मुनि पुनरपि मरसी । श्र्वान सूकर होउनि गाई ॥भाग्य०॥७॥
संत संग जरि तूं धरिसी । आत्मज्ञानें भवनिधि तरसी । पूर्ण आनंदांतचि भरसी । देती वेदशास्त्रें ग्वाही ॥भाग्य०॥८॥
विष्णुकृष्ण जगन्नाथाला । सत्यत्वेंहा अनुभव आला । ह्मणुनि कळवितो सर्वांला । गोष्टि अंतरांत धरा ही ॥भाग्य०॥९॥
पद १५६ वें.
अयोध्येसि उत्साह भला, तुह्मीं येतां काय हो पाहुं चला ॥धृ०॥
संतसाधु समुदाय मिळाला ॥येतां०॥१॥
कीर्तन नर्तन थाट मिळाला ॥येतां०॥२॥
राज्यासनिं श्री राम बैसला ॥येतां०॥३॥
मंदहसित सुख छंद भजनिं, आनंदघन सांवळा । रत्न जडित शिरीं मुकुट झगझगित, पितांबर पींवळा ॥तुह्मीं०॥४॥
गळ्यांत मैक्तिक पंक्ती धवला ॥येतां०॥५॥
पदकें नवरत्नांन्वित माला ॥येतां०॥६॥
उमटति विद्युत्प्रकाश ज्वाला ॥येतां०॥७॥
लख लख शोभे भाळीं केशर, कस्तुरि चंदन टिळा । केसरि पट पांघुरला । त्रिभुवनिं अगम्य ज्याची लीला ॥तुह्मीं॥८॥
व्यापक ब्रह्मांडाचा सकळां ॥येतां॥९॥
जिवन्मुक्ताचा जिव्हाळा ॥येतां०॥१०॥
सदैव ज्याचें भय कलि काळा ॥येतों०॥११॥
आज्ञाधर विधि हर इंद्रादिक, सुर जोडुनि करकमला । वर वांछिति दृढतर भक्तीचा । पर्रम प्रीतिकर आगळा ॥तुह्मी०॥१२॥
सुरवर वानर संघ दाटला ॥येतां०॥१३॥
किन्नर विद्याधर गण आला ॥येतां०॥१४॥
सुंदर गाती प्रेम जयांला ॥येतां०॥१५॥
सनक शुकादिक योगी भोगिति, ध्यानीं सुख सोहळा । कनकालंकृति वामांकावरि, जनक नृपाची बाला ॥तुझी०॥१६॥
जपी तपी सन्यासी मेळा ॥येतां०॥१७॥
भक्त नाचती मांडुनी खेळा ॥येतां०॥१८॥
दर्शन घेती वेळोवेळां ॥तुह्मी०॥१९॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ सद । अवलोकी निज डोळां । पवनात्मज सुता भजनि लंपट, करुनि मनाचा गोळा ॥तुह्मीं०॥२०॥
पद १५७ वें.
हितकर गोष्टी न घेसि तुं कानीं । तुज वारंवार किति कथितों हित गुज जाउनियां याच्या त्याच्या बससी दुकानीं ॥धृ०॥
नित्य उठोनियां जेथें तेथें तूम त्रिकाळीं । बैसोनियां मारिसि तूं लोकाचि टवाळी । साधु संतां देसि रे, उगिच शिव्या गाळी । तरी बा तुझी, मोड ही खोड वाईट, जोड भगवद्भक्ति नीट, कधिंच न होय तृप्ति विषय सुखानी ॥ हितकर गोष्टी न घे०॥१॥
रात्रंदिवस वागविसि संसार व्यथा । नावडे हरी पुराण कीर्तन कथा । गेलें रे तुझें यांतचि आयुष्य सारें वृथा । एखादा तुज जरी, कोणी नेला बळें, आळसानें अंग वळे, न ह्मणतां राम मुखें राहसि मुक्यानें ॥ हितकर गोष्टी न घे०॥२॥
जरि तूं न भजसि दयाघन रामराया । चुकेल भाग्य फसेल ही मानव काया । परत लागसि तूं नाना योनि भ्रमाया । न जाणों माकड, बैल बोकड, पशुपक्षि होउनि कीं, कीं, कीं, चीं, चीं, पीं, पीं, करिसी वृक्षीं असंख्य रूपानीं ॥ हितकर गोष्टी न घे०॥३॥
आतां तरि भज विष्णु कृष्ण जगन्नाथा । वदनीं वद सद्भावें सद्गुण गाथा । वरद हस्त ठेविल कीं आपुल्या माथा । जो आपण सच्चिदानंद, प्रगटुनि ह्लदयीं तुझ्या, पुरविल हेतु नानाविध कौतुकांनीं ॥ हितकर गोष्टी न घे०॥४॥
पद १५८ वें.
आतां तरी जाऊं या रामभेटी । धरुनियां आवडी पोटीं ॥धृ०॥
किती खेपा जन्मा आलों । बाळ तरुण वृद्ध झालों । भोगियलीं दु:खें कोटी ॥आतां०॥१॥
जे जे संसाराची येती । ते ते मृत्युपंथें जाती । पुढें यमयातना मोठी ॥आतां०॥२॥
वेद पुराणें गर्जती ॥ धरारे संत संगती । मिथ्या हे प्रपंच रहाटी ॥आतां०॥३॥
कोटी सूर्य समप्रभ । राम अद्वय स्वयंभ । प्रगटला भक्तांसाठीं ॥आतां०॥४॥
वैष्णव सद्गुरु स्वामी । नित्य वसे अचला रामीं । कृष्ण जगन्नाथ आंगें गांठी ॥ आतां०॥५॥
पद १५९ वें.
अयोध्येसि आनंदें नाचती नगरवासि सुरवृंद । सिंहासनि रघुराज बैसला जानकि परमानंद ॥धृ०॥
कीर्तन गजरें थाट मिळाला भक्तजनांचा पुंज । छत्र पतका चवरें उभविती ध्वज नामाच छंद ॥ अयो०॥१॥
झणझणाणती टाळ विणे किती वाजताति मृदंग । स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध कवणासि अटक ना बंद ॥अयो०॥२॥
पुष्पांचा पर्षाव बुक्याचा घम घम येति सुगंध ॥ धन्य धन्य नरजन्म घोंटिती केवळ ब्रह्मनंद ॥अ०॥३॥
संत साधु सत्पुरुषांचा जो सर्व सुखाचा कंद । निज भजकां श्रीराम विलोकी हास्य करुनियां मंद ॥अ०॥४॥
लक्षकोटि संख्यांक मशाला घेउनियां नि:शक । निरहंकारें उभे ज्या नसे थोर पणाचा गंध ॥अ०॥५॥
धों धों नौबत वाद्यें वाजति चित्र विचित्र अनंत । उडती वानर जय रघुवीर ह्मणुनि स्वच्छंद ॥अ०॥६॥
रघुरायाची कीर्ती गर्जती मानिति भूवैकुंठ । अखंद स्वरूपानंदानें आलिंगिति निर्बंध ॥अ०॥७॥
रत्नजडित लखलखीत मंडपीं विबुधोद्यानवसंत । श्रीसीतापति पद कमलावरि मारुति होय मिलिंद ॥अ०॥८॥
देव ऋषी गंधर्व भाट जन सन्मुख गाति प्रबंध । राम विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रिय निरतिशयानंद ॥अ०॥९॥
पद १६० वें.
तरी तुज प्रपंच हा वाटे अति गोड । जरि पुत्र नातु पणतु सुना शिव्या देती नारी ॥तरि०॥धृ०॥
चाळणिचें जळ विषय सुख केवळ । चिळस न ये जरि बहुविध दु:खें गांजला संसारीं ॥ तरी०॥१॥
बोलसि घरच्यांसि फार । खर्च करितां वारंवार । तीं तुज बोटें मोडिति मागें, घालिसी जैं घसारीं ॥तरी०॥२॥
ह्मणसी मी शहाणा । चतुरांचा राणा । बैल जसा घाण्याचा प्राण्या श्रमसि त्यापरि भारी ॥तरी०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा भक्ति मार्गें शोधीं आतां । सांपडेल सुखमय ह्लदय माझारीं ॥तरी॥४॥
पद १६१ वें.
भज रे मानसिं राघवा । आनंद पावसि आवघा । जरि तुज वाटे वानवा । विचारिं संतांसि मानवा ॥भ०॥धृ०॥
हरुनि सकल आपदा । दाखविल आपुल्या पदा । ना तरि योनि श्वापदा । निश्चयें भोगिसि तापदा ॥भ०॥१॥
नाठविसि राम येधवां । आठविसि तरि केधवां । काय करिसि तूं तेधवां । यम मारिल तुज जेधवां ॥भ०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ या । स्मरतां वारिल तो भया । स्वसुखानुभव यावया । विषयिं न घालिं या वया ॥भ०॥३॥
पद १६२ वें.
प्रभु अखंड सुखमय रामचि हा । देह मीपण सांडुनि उलट पहा ॥प्र०॥धृ०॥
दिसतो जो तुज दृष्ट पसारा । मिथ्या मृगजल जाण, होशिल सुजाण, वधुनि शत्रूंसि सहा ॥प्र०॥१॥
अंतर दृष्टी करुनि निरीक्षीं । खेळे ज्यावरि प्राण, लक्षिं त्या आण, न कल्पित उगिच रहा ॥प्र०॥२॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरणें । करि कल्याण, सख्या तुझि आण, ज्यासि प्रिय भक्त महा ॥प्र०॥३॥