मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ६१ ते ७०

श्री रामाचीं पदें - पदे ६१ ते ७०

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.


पद ६१ वें

जगज्जीवन रामीं रमारे । शरण जाउनिं दृढ धरुनि गुरुचरण ॥धृ०॥
नर जन्माचें सार्थक साचें । जरि करि विवरण आत्मत्वाचें । तरि हे नौका होय भवतरण ॥रा०॥१॥
विषयासक्ति त्यजुनि विरक्ति । योगें करितां नवविध भक्ति । सहज मुक्तिसुख हरि जनन मरण ॥रा०॥२॥
वैष्णव गुरुवर अद्वय सुखकर । कृष्ण जगन्नाथ राघव तत्पर । नित्य निरंतर अज्ञान हरण ॥रा०॥३॥

पद ६२ वें

विषय न विष कधिं घ्यावें । राम नाम अमृत प्यावें ॥धृ०॥
चिद्भमराभज गुरुचरणांबुज । ब्रह्मानंद सहज होय स्वभावें ॥वि०॥१॥
धनसुत दारा दु:ख पसारा । देह मी जडभारा विसरावें ॥वि०॥२॥
एकचि आपण मिथ्या दुजेपण । ऐसी सद्भुरुखुण जाणुनि रहावें ॥वि०॥३॥
विष्णुचरण रत कृष्ण जगन्नाथ । विनवित निजहित हें परिसावें ॥वि०॥४॥

पद ६३ वें

वरिला तो मी श्रीराम या देहीं एकांति ॥वरि०॥यादे०॥सद्‍गुरु वचनाधारें आत्म विचारें ॥व०॥धृ०॥
जो निज द्रष्टा दृश्य सकळ हें । आंगें नटला परी अंतरिम निष्काम ॥या०॥१॥
लक्ष लक्ष्मण उन्मनि सीता । अनुभव मारुति यांचें जो सुखधाम ॥व०॥२॥
भाव भरत शत्रुघ्न प्रेम । करिं असंग चवरें तन्मय अंतर्याम ॥व०॥३॥
सद्नुरु विष्णु राघवपूर्ण प्रकाश । चित्सुख कृष्ण ह्लदय आराम ॥व०॥४॥

पद ६४ वें

रात्रदिन राम गाऊंरे । पुत्र कलत्र भ्रम पुरे पुरे ॥धृ०॥
छत्र सुखासनीं माझा । स्वामी अयोध्येचा राजा । शोभे आजानुबाहु रे ॥रा०॥१॥
वामांकिं जानकि नार । संमुख मारुति विर । दिसे सुंदर पाहुं रे ॥रा०॥२॥
राम विष्णुपदीं चित्त । ठेवी कृष्ण जगन्नाथ । सुख अद्वैत लाहुं रे ॥रा०॥३॥

पद ६५ वें

राम जडला न सोडी । घडि घडि ओढी काय सांगुं तुज गोडी ॥धृ०॥
नुरवितो दृष्ट गुण । दावितो मुळिंचि खुण । आपण आपण जोडी ॥रा०॥१॥
जेथें धांवे तेथें मन । रामचि होय चिद्धन । वाई द्वैत भान मोडी ॥रा०॥२॥
राम विष्णु गुरुप्रीती । कृष्ण जगन्नाथीं अति । हरि देह मति खोडी ॥रा०॥३॥

पद ६६ वें

वाज नसुनि जन लाज त्यजुनि रघुराज सदैव भजावारे ॥धृ०॥
दृष्य विलक्षण राम लक्ष्मण । न क्षण एक त्यजावारे ॥वा०॥१॥
नाशिवंत जाण देह न मी ह्मण । साक्षी आपण उमजारे ॥वा०॥२॥
विष्णु चरणिं रत । कृष्ण जगन्नाथ । काळ न विषयांत जावा रे ॥वा०॥३॥

पद ६७ वें

संत साधुंचा समुह आला रामाला राज्याभिषेक झाला ॥धृ०॥
मूर्ति रत्न जडितासनि शोभे कीर्ति त्रिभुवनाला ॥रा०॥१॥
अमर पुष्प वर्षाव करिति बहु पावुनि हर्षाला ॥रा०॥२॥
विधि शिव इंद्रादिक सुर ह्लषिगण स्तवुनि नमिति ज्याला ॥रा०॥३॥
शूरचि तो राक्षस कोटींसह वधुनि रावणाला ॥रा०॥४॥
चरणिं उभा बलभीम मारुती लंपत प्रेमाला ॥रा०॥५॥
दक्षिण लक्ष्मण बंधु विराजे सीता वामांकाला ॥रा०॥६॥
होउनि अति आनंद नाचती भक्त मानसाला ॥रा०॥७॥
अयोध्या नगरवासि नारीनर येति दर्शनाला ॥रा०॥८॥
सुग्रिवांगद नळगील बिभीषण चित्त वल्लभाला ॥रा०॥९॥
पट्टाभिषेक राम त्रिलोकुनि आनंद प्रजांला ॥रा०॥१०॥
जय जय रघुवीर समर्थ सकळ गर्जति नामाला ॥रा०॥११॥
भरत शत्रुघ्न चवरें ढाळिती संतोष मनाला ॥रा०॥१२॥
छत्र सुखासनि विष्णु राम कृष्ण जगन्नाथाला ॥रा०॥१३॥

पद ६८ वें

छत्र सुखासनि दाशरथी श्रीराम नृपति बैसला ॥धृ०॥
दक्षिण भागीं लक्ष्मण साजे । वामांकीं जानकी विराजे । धन्य धन्य नर जन्म आमुचा सुदिन आजिचा भला हो ॥छ०॥१॥
हर्षुनि सुमन वर्षति सुखर । जय जयकारें गर्जति रघुविर धनुर्बाणधर मदन मनोहर दिव्य मूर्ति शोभला हो ॥छ०॥२॥
सुग्रीवांगद नळनीळादिक । सन्मुख नाचति राम उपासक वानरेंद्र बलभीम मारुती दास चरणिं लागला हो ॥छ०॥३॥
अलभ्य लामचि हा आह्मांला । अमृत सिद्धियोग घडुनि आला । संत साधु सत्पुरुष सज्जनीं ब्रह्मानंद दाटला हो ॥छ०॥४॥
वैष्णव सद्‍गुरु दीन दयाघन । प्रिय भजकाला दे निज दर्शन । कृष्ण जगन्नाथाचा सच्चित्सुख आत्मा प्रगटला हो ॥छ०॥५॥

पद ६९ वें

छत्र सुखासनि राजाराम राजिवलोचन जानकिजीवन आजि पाहिला हो ॥धृ०॥
कोटि विद्युत्प्रकाशाचा । मस्तकिं मुगुट ज्याचा । संत साधु जनीं गुण गाइला हो ॥छ०॥१॥
रावणादि राक्षसांला । वधुनि अयोध्ये आला । देव ऋषि श्रम ज्याणें साहिला हो ॥छ०॥२॥
चरणिं मारुति उभा । मुखीं मंद हांस्य शोभा । आवडुनि दास्य भावें राहिला हो ॥छ०॥३॥
उत्साह नगरवासी । लोकां आनंद मानसिं । दाटला कौसल्यादिक आईला हो ॥छ०॥४॥
नारद तुंबरादिक । गाति नाचति सन्मुख । बंधु भरतानें ज्यासि वाहिला हो ॥छ०॥५॥
नीलोत्पल दलश्याम । त्रिभुवन साक्षीराम । लक्षुनि विषय काम दाहिला हो ॥छ०॥६॥
वैष्णव सद्नुरु भला । सच्चित्सुख प्रगटला । कृष्ण जगन्नाथें चित्तिं वाहिला हो ॥छ०॥७॥

पद ७० वें

आत्मभक्तांचा सारथी । तो हा राम दाशस्थी । वैष्णवांचे मनोरथीं । सीतापती सर्वदा ॥धृ०॥
चिद्रत्न जडित सहजासनी । आपण राजाराम त्रिभुवनीं । निजांकीं चिच्छक्ती भमिनी । जानकी ते धरियेली ॥आ०॥१॥
ऐसा आत्माराम राजा । केवळ प्राणविसावा माझा । उडी घालुनि भक्ताकाजा । मूर्मिमंत बैसला ॥आ०॥२॥
लक्ष लाउनी सज्जन । अलक्ष लक्षिति चिद्‍घन । तो हा राम सनातन । ब्रह्मानंद प्रगटला ॥आ०॥३॥
सन्निध विवेक मारुती । ज्यासि दृश्याची उपरती । आत्माराम पूर्ण ज्योती । चित्तीं चिंती सर्वदा ॥आ०॥४॥
वैष्णव सद्नुरु करणामूर्ति । ज्यांची त्रैलोक्यीं सत्कीर्तीं । कृष्ण जगन्नाथ स्फूर्तीं । स्वस्वरुपीं मेळविली ॥आ०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP