पद १४१ वें.
जरि तरिच सहज सुखी अससी ॥धृ०॥
संत समागमीं जाणुनीं, आत्म एकांतीं बससी ॥ज०॥१॥
आपणा आपण जाणत जाणत, विस्मृतिला ग्राससी ॥जा०॥२॥
विष्णु गुरुपदीं कृष्ण जगन्नाथाचा जसा, तसा डससी ॥ज०॥३॥
पद १४२ वें.
चिन्मात्र मात्र पाहीं रे, अपवित्र त्यागीं रे ॥धृ०॥
बैसुनि एकांतीं नाठवावें चित्तीं, कलत्र पुत्र कांहीं रे ॥चि०॥१॥
जडादि प्रकाशि एक अविनाशी, अन्यत्र सूत्र नाहीं रे ॥चि०॥२॥
विष्णु गुरु कथी कृष्ण जगन्नाथीं, न अस्वतंत्र राहीं रे ॥चि०॥३॥
पद १४३ वें.
श्री राम तुझें सहज करिल कल्याण ॥धृ०॥
सांडुनि स्नेहा विसरुनि देहा, जरि रोधिसि मन प्राण ॥श्री०॥१॥
आपपर ऐसें द्वैत न कल्पुनि, आपणा आपण जाण ॥श्री०॥२॥
विष्णु गुरुकृपें अनुभव घेउनि, कृष्ण जगन्नाथ वाहे आण ॥श्री०॥३॥
पद १४४ वें.
तरिच सुखरूप तुझा संसार, करिसी आत्म विचार ॥धृ०॥
पंचभुतात्मक देह तुझा हा, न जाणसी कां रे । साक्षी तूं याचा वाहूं नको कीं भार ॥त०॥१॥
असंग होउनि स्वरुपींच रहा, न ढळतां बारे । रज्ज्वात्मा मिथ्या दृष्ट भुजंगाकार ॥त०॥२॥
विष्णु गुरु कृष्ण जगन्नाथा, भेटतां पहारे । आपुला आपण अनुभव आला सार ॥त०॥३॥
पद १४५ वें.
सदैव राम राम ह्मणा रे बापानो ॥सदैव०॥
नरतनु हे दुर्लभ गणा रे ॥धृ०॥
तुम्हीं प्रपंच केला जरि निका । तरि होइल शेवटिं हा फिका । यम काढिल शोधुनि बहु चुका । मार मारिला कठिण आयका रे ॥बा०॥१॥
काय घालवितां वय फुका । ध्यानि आठवा रघुनायका । ब्रह्मत्वें आपणां तुका । जन्म मरणाला मग मुका रे ॥बा०॥२॥
देह पडेल कधिं न भरंवसा । निज आत्मा आपुला कसा । हें जाणत एकांति बसा । न कळे तरि गुरुला पुसा रे ॥बा०॥३॥
मोठेपणिंचा अभिमान सोडा । छी छी देह मी पण खोडा । दृढ असंग शस्त्रें तोडा । आहे अखंद सुख तें जोडा रे ॥बा०॥४॥
जगीं तारक वैष्णव गुरु । त्याचे चरण जाउनि दृढ धरूं । कृष्ण जगन्नाथ सांगे उद्धरूं । आपआपणा सावध करूं रे ॥ बा०॥५॥
पद १४६ वें.
जप तूं राम नाम किती मधुर, मधुर, मधुर, मधुर ॥धृ०॥
राम नाम ध्वनि उमटे । तेथें लक्ष लविं नेटें । ब्रह्मानंद सहज भेटे । प्रचुर, प्रचुर, प्रचुर, प्रचुर ॥ज०॥१॥
दृष्य देखतांचि दिठी ।देईं द्रष्टे यासि मिठी । आपुलें आपण सौख्य घोटीं । नदुर, नदुर, नदुर, नदुर ॥ज०॥२॥
राम विष्णु कृष्ण ध्यान । त्यासि दे मुकुंद ज्ञान । जेणें होय समाधान । चतुर, चतुर, चतुर, चतुर ॥ज०॥३॥
पद १४७ वें.
आहे भासे प्रिय राम स्फुरे, ह्लदयिं प्रगट कां धरितो देह मी ॥धृ०॥
भू, वन्ही, आकाश, पवन, जल । अंश नटक या भुलुनिं फुकट ॥आ०॥१॥
तत्वमसि महा वाक्य विवरितां । सर्वहि निरसुनि ब्रह्म निकट ॥आ०॥२॥
स्वयंप्रकाशी तूं अविनाशी । अलक्ष लक्षुनिं होईं मुकट ॥ आ०॥३॥
वैष्णव सद्गुरुपद फळ ऐसें । पांडुरंग कृष्णासि विकट ॥आ०॥४॥
पद १४८ वें.
पाहें रे पाहें नृजन्मीं या थोरवा, पाहें रे स्वस्वरुपीं जागें रे ॥धृ०॥
धन दारादिक होय उपाधिक, करूनि विबेक, जनिं बागें रे ॥पा०॥१॥
देह अनात्मा, आपण आत्मा, विवरिसि तरि सोय लागे रे ॥पा०॥२॥
विष्णुपदीं रत, कृष्ण जगन्नाथ, कथि निज हित अनुरागें रे ॥पा०॥३॥
पद १४९ वें.
येव्हां रामकृष्ण हरि मुखें बोलुं या रे । बाळपणिं कांहिं चिंता नाहीं ह्मणुनियां ॥ये०॥
होइल आनंदचि त्या सुखें डोलुं या ॥सु०॥
सारे मेळुया येथें खेळूं या ॥ये०॥धृ०॥
विषयोप भोगें, तरुणपणि वय जाय । सुखावरि दु:खें येतां, मनीं होइल हाय हाय । इछित हेतु न साधे तरि मग अंगीं क्रोधाची चढाय । कोणी नीच उत्तर देतां लागे करावी लढाय । नित्य संसार चिंता मोठेपणाची बढाय । प्रभु कंसारि जो कृष्ण त्याचे नाठवेल पाय ॥ये०॥१॥
वृद्धपणामाजी छी, छी, कोणी नव्हती सहाय । आह्मी प्रत्यक्ष पहातों हाल हाल होती काय । दिवसें दिवस बुद्धी चळती बैसवेना एके ठाय । जरी पडला भूमी तरी त्यासि कोणी न उठाय । तरि विषयांच्या सोसें वाढे अधिक पिसाप । गळती शक्ति ज्याची त्याची कांहीं न चले उपाय । तैं मग साधेल कैसा नवविधा भक्ति व्यवसाय । विष्णु कृष्ण जगन्नाथा हरी सर्व ही अपाय ॥ये०॥२॥
पद १५० वें.
भाग्य मोठें प्रभुनें दिला देह मनवाचा । दशेंद्रियें मन बुद्धि दिलीं साह्यते जिवाच्या । पटुत्वहि दिधलें किति तें न बोलवे वाचा । उपकार वाटे सदय ह्लदय राघवाचा ॥भा०॥१॥
श्रवण भक्ति साधुनि प्रेमें सुखें वोलुं नाम । आकळेल मूळ सुखाचें होतिल पूर्ण काम । स्वानुभवें भेटेल ह्लदयिं स्फुरुनि आत्माराम । तेणें आत्मा होइल सदोदित अखंद आराम ॥भा०॥२॥
चरणिं यात्रा साधुनि गाऊं वाजऊं करटाळी । श्याम सुंदर ध्यान मनोहर पाहुं वनमाळी । सत्संगीं आत्म भजन रंगीं रंगुंया त्रिकाळी । लोळुनि तत्पदिं पाय धुळीतें लाउंया कपाळी ॥भा०॥३॥
ऐसा हा आनंद इतरां योनि माजि नाहीं । पशुपश्वादि जन्मीं न घडे आत्म बोध कांहीं । कळुनि आत्म महिमा न पडो दु:खाच्या प्रवाहीं । विष्णु कृष्ण जगन्नाथ आठऊं लवलहिं ॥भा०॥४॥