श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ११
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
लौकिक वैदिक आचरणीं । ईश्वराज्ञा प्रमाण मानोनि । सदा वर्तति निर्भयपणीं । निरलसपणें निरंहकार ॥१६२॥
ईश्वर आज्ञा ती कोण । केंवि मानावी प्रमाण । धर्मग्रंथी लिहिलें जाण । तेचि आज्ञा ईश्वराची ॥१६३॥
प्रथम वेदश्रुति प्रमाण । तयावरी शास्त्रानुशासन । सर्वांवरी संतवचन । प्रमाण अखिल कार्यार्थीं ॥१६४॥
भाविक असतील जे जन । ते सत्वरीं श्रद्धा ठेवून । उध्दरती आपणालागून । सवें घेऊनि आणिका ॥१६५॥
कुर्तकीं दांभिक पाषांडी । जयांची मति झाली वेडी । तयांची विरोधावरी आवडी । परमार्थ न रुचे तयांसी ॥१६६॥
स्वार्थी दृष्टि अनिवार । विषयावरी पडिभर । केवळ भोगैकतत्पर । होऊन राहिले असती ॥१६७॥
बहिरंगदृष्टि तयांची । जाणीव नाहीं स्वहिताची । आसक्ति क्षणिक सुखाची । तेणें जाती अधोगती ॥१६८॥
तयांचा संग धरावा । अथवा विरोधही न करावा । उदासीनपणें पहावा । खरा खोटा निर्णय ॥१६९॥
कोणासीही भांडीं नये । नादीं कोणाच्या लागों नये । श्रध्दा आपुली सोडू नये । परिणामी कळों येईल ॥१७०॥
अकाली पाऊस पडला । ओढीयीसी पूर आला । थेंव नाहीं डोळियाला । परतोनि पाहतां लावावया ॥१७१॥
तैसें दांभिकाचें वैभव । अथवा पाखांड्याचें गौरव । जरी दिसों आले सावेव । तरी अवघे क्षणिक ॥१७२॥
म्हणोनि तयावरी न भुलावें । बुध्दीसी चळों न द्यावें । श्रुति संतां अनुसरावें । सर्वभावें आपण ॥१७३॥
ईश्वर सर्वाचें हृदयीं । नास्तिक पाखांडियांचे ठायीं । सद्भुद्धि देवो लवलाहीं । उध्दाराकारणें तयांच्या ॥१७४॥
ऐसें तयासी विनवावें । वादावादी न पडावें । कोणी पुसिलें तरी बोलावें । एरव्ही मौन उदासीन ॥१७५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 15, 2015
TOP