श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३७
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
यावरी साधन जें तिसरें । तें निरूपति प्रेमभरें । भगवदभजनकीर्तन पुरे । लौकिक मतें प्रतिपादिती ॥३६७॥
भगवंताचें गुण गावे । भजनकीर्तनीं रमावे । सर्वांनी मिळून आचरावें । ऐसा मनीं संकेत ॥३६८॥
एकाचें पाहून दुसर्यासी । सदबुध्दि उपजे भरवंसी । सर्व जनोध्दारासी । हेंचि प्रमाण सर्वांशी ॥३६९॥
ईश्वराचें गुणगान । सर्वांसी वेध लावून । पापपुण्याची निवड करून । सदाचारी प्रवर्तवी ॥३७०॥
मनुष्यप्राणी समाजप्रिय । त्यासी संगतिवीण राहों नये । संगतिचि कारण होय । सद्गति अथवा दुर्गतिसी ॥३७१॥
ज्यासी जैसीं आवडी । तैसीचि संगती तो जोडी । संगतिनें घडोघडी । वाढे आवडी सर्वकाळ ॥३७२॥
भगवतभक्ताचे संगतीं । भजनकीर्तनी उपजे प्रीती । सज्जन दुर्जन तेही मिळती । एकया ठायीं सहज ॥३७३॥
लहान थोर वृध्द तरुण । अज्ञान सज्ञान सर्व मिळोन । भगवदकीर्तनीं सप्रेम होऊन । भक्तिसुखें उंचावती ॥३७४॥
कीर्तनीं वेध सर्वांसी । हारवोनी चिंता भयासी । क्षणैक तन्मयता त्यांसी । होय श्रवणकीर्तनें ॥३७५॥
एकदां श्रवण केलिया । मन लोभूनि त्या ठायां । पुन: पुन्हा श्रवण कराया । प्रवृत्त करी सर्वांसी ॥३७६॥
विषयाचें सुख निमिषमात्र । कीर्तनें सुख लाभे सर्वत्र । गोडी लावून करी एकत्र । इंद्रिय मनोबुध्दिसी ॥३७७॥
एकाचे संगती अनेक । तरती सकळ जनलोक । प्रसंग तरी तात्कालिक । परिणाम उपजवी शाश्वत ॥३७८॥
कीर्तनें उपजे भगवत् प्रेम । जीवासी करी निष्काम । निष्काम तोचि आत्माराम । लागे स्वरूपीं ॥३७९॥
ऐसें सहज घडे साधन । लौकिक व्यवहार न सांडून । मोक्षद्वार खुलें करून । सकळ जनां उध्दरीं ॥३८०॥
परी संत कृपेवीण । कही न घडे भजन कीर्तन । त्यांचे संगति लाभे पूर्ण । परमार्थ निजठेबा ॥३८१॥
त्यांचे चरण रज:कण । माथां पडतील तरी जाण । भवभयांचे विध्वंसन । निर्भयता होय सर्वोसी ॥३८२॥
यालागीं संतसंगति । चौथें साधन प्रतिपादिती । ईश्वरकृपेनें जे लाह्ती । तेचि म्हणों सदैव ॥३८३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP