श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४८
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
आतां आणिकही सांगति । कर्मफलाची सोडा आसक्ति । कर्माहंकार सोडोनि सहजस्थिति । निर्द्वंद्वता अनुभवा ॥४९५॥
कर्मफळ म्हणिजे शरीर । तें प्राप्त पूर्वकर्मानुसार । जे जे काहीं चालिले व्यवहार । ते आपआपणा विरह्ति ॥४९६॥
जें जें काहीं होतें जातें । तें ईश्वरच्छेनें घडते । त्याचें त्यासीचं पावतें । सर्व आधीन तयाच्या ॥४९७॥
कर्तव्य करितची रहावें । परी फळ ईश्वरासी अर्पावें । ज्याचें त्यासी देऊनि व्हावें । आपण मोकळे निश्चिंत ॥४९८॥
फळावरी मन ठेवितां । कर्मासी ये व्यंगता । तेंचि ईश्वरासी अर्पितां । कर्माकर्मसमान ॥४९९॥
फलाभिलाषें वासना । चित्तीं राहिल्या जडूनि नाना । जन्ममरणाच्या यातना । चुकविल्या न चुकती ॥५००॥
जयासी वाटे मुक्त व्हावें । तेणें वासनेतें जिंकावें । फळाचा संग टाकोनि व्हावें । मुक्त नि:संग संसारीं ॥५०१॥
तैसाचि सांडावा अभिमान । कर्तेपणाचा दारुण । लहान थोरांलागून । जो सदैव जडलासे ॥५०२॥
कर्मसंन्यास करणें । म्हणजे अहंकारासी दवडणे । मीं केले ऐसें न म्हणणें । कर्ता करविता ईश्वर ॥५०३॥
अहंकार धरिल्यावाचून । कर्म न निपजे यथागुण । परि तोचि पतनासी कारण । विशेषत्वें जाचक ॥५०४॥
पंचकारण समुदायीं । जीव एक अनुयायी । त्याचे स्वाधीन असे काई । पाहा ठायीं विचारुनि ॥५०५॥
तो म्हणे जरी मी कर्ता । तरी त्याची नाहीं सत्ता । व्यर्थ मनीची अहंता । विकृतीसी कारण ॥५०६॥
अहंता जरी गेली । तरी देवपदवी आली । माया सरिता ओसरली । ठायीचें ठायी ॥५०७॥
अहंता फलाशा त्यागितां । निर्द्वंद्वता ये हातां । सुखदु:खी समान चित्तता । घडों लागे सहज ॥५०८॥
कैंचा मान कैंचा अपमान । कैचे पाप कैंचे पुण्य । कैंचे शीत कैंचे ऊष्ण । लेखी दोहीं समान ॥५०९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP