श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २७
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
कर्मज्ञान योगाचे ठायीं । नित्य नवा अभिमान पाही । तो ईश्वरास साहवत नाहीं । दूर पळे तेथोनि ॥२८८॥
ईश्वर स्वभावतां निरहंकार । सर्वोतर्यामीं निर्विकार । तेथें अभिमानासी नाहीं थार । समसमान सर्वत्र ॥२८९॥
ज्ञानी अज्ञानी असोत जन । कर्मी भूषण किंवा दूषण । योगी वियोगी असोत जाण । सर्व सारिखे तयासी ॥२९०॥
सर्वांचे अंतर्यामीं असे । जया लागले, त्याचें पिसें । त्याचेनि छंदे वर्ततसे । ऐसा नियम तयाचा ॥२९१॥
कोणी असो कर्मनिष्ठ । अथवा अत्यंत कर्मभ्रष्ट । अंतर्यामीं ईश्वरनिष्ठ । तोचि प्रिय तयाचा ॥२९२॥
ज्ञानी असो वा ब्रम्हज्ञानी । योगपारंगत सिध्द मुनि । जैसी चाड ज्यांचे मनीं । तैसेचि ते पुरवीत ॥२९३॥
ज्ञानियासी ज्ञान देतो । योग्यासी सिध्दि दावितो । कर्मठासी भोग अर्पितो । आपण राहूनि निराळा ॥२९४॥
परी जे त्यालागी दीन । असोत पात्रापात्र जाण । त्याचीच नेई उध्दरून । कृपा पूर्ण तयाची ॥२९५॥
म्हणोनि त्याचीच चाड धरावी । सर्व आशा सांडावी । अहंकाराची वाट मोडावी । तैचि भेटी तयासी ॥२९६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 16, 2015
TOP