मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ८३

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८३

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


इति शब्दें सुचविलें । भक्तिचें व्याख्यान संपलें । पुष्ट्यर्थ देताति दाखले । आणिक  भक्ताचार्याचे ॥११७६॥
ऐका म्हणति नारदमुनी । इतरही भक्तश्रेष्ठांनी । हाचि अभिप्राय निर्भयपणीं । एकमतें प्रतिपादिला ॥११७७॥
लौकिक मत सांडूनि दूरी । स्वमताचें भरोवरी । स्वानुभवाचे जोरावरी । निश्चयात्मक बोलिले ॥११७८॥
संमतिदाखल त्यांची नावें । घेऊनि सांगतो ऐका भावें । भक्तिचें स्वरूप कळों यावें । सामान्यपणे सकळांसी ॥११७९॥
त्यामाजी प्रथम सनत्कुमार । ब्रह्मयाचे मानसपुत्र । निवृत्तिमार्गाचे परम उदार । ज्ञानदाते सदुगुरु ॥११८०॥
ज्यासी हंसरूपें आपण । विष्णूंनी येऊन कथिलें ज्ञान । ब्रह्मदेवाचाही मान । राखिला वडिलपणाचा ॥११८१॥
तैसेचि व्यासो नारायण । वेदमूर्ति स्वयें आपण । ज्याचे ज्ञानासी नाहीं परिमाण । पराशस्र सुत प्रसिध्द ॥११८२॥
तैसेचि शुक महामुनि । जे ब्रह्मनिष्ठ सिध्दज्ञानी । भागवत मत विस्तारोनि । परीक्षितासी बोधिले ॥११८३॥
शांडिल्य ऋषी परम पवित्र । भक्तिमार्गाचे शुध्दनेत्र । सूत्रें रचुनि स्वयें स्वतंत्र । उपकार केला जगावरी ॥११८४॥
गर्गाचार्य संहिता कर्ते । विष्णु ऋषी भक्तिधर्ते । कौंडिण्यऋषी पूर्णज्ञाते । आकळिलें अनंता ॥११८५॥
शेष सहस्त्रवदनांचा । अखंड जप हरिनामाचा । उध्दव अवतार प्रल्हादाचा । भक्तश्रेष्ठ शिरोमणी ॥११८६॥
अरुणि भक्तिसंप्रदाय वक्ता । बलिदानवांचा अधिष्ठाता । त्रिपाद भूमिदान कर्ता । आकळिलें विष्णूसी ॥११८७॥
हनुमंत महावीर । रामरायाचा सेवक थोर । रामचरणी झाला स्थिर । चिरंजीव पद पावला ॥११८८॥
बिभीषण भक्तश्रेष्ठ । रावणाचा बंधु कनिष्ठ । रामभक्ति करूनि वरिष्ठ । लंकाधिपति जाहला ॥११८९॥
ऐसे अनंत भक्त देती ग्वाही । भक्तिनें उध्दार लवलाही । जे जे कोणी पडले प्रवाही । तयां नाहीं आन गति ॥११९०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP