श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६०
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
सहज शांती लाभे तेथ । परमानंदी मान डुल्लत । जयापरतें या जगांत । प्राप्तव्य नाहीं आणिक ॥६४७॥
भक्तिमुळें उपजे शांति । अथवा परमानंद ये व्यक्ति । हेंही म्हणणें निश्चिती । दिसे भेदमूलक ॥६४८॥
भक्ति शांति दोन्ही एक । नाममात्रिचिं वेगळिक । शांतिमाजी परमानंद देख । स्वयें नांदे आपण ॥६४९॥
ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । या त्रिपुटीचा लय साधून । नांदे निजरूपें करून । ते शांति ऐसी म्हणावी ॥६५०॥
ते एक वेळ जरी लाभली । तरी नये सांडितां सांडिली । आपुलेपणें नित्य संचली । राहे आपुलियापाशी ॥६५१॥
देहाचें नुरे तेथ भान । बाह्य विषयाचें नाहीं चिंतन । सदैव मन रममाण । होऊनि राहिलें निजरंगी ॥६५२॥
तोचि परमानंद केवळ । बोधरूप निष्फळ । अनुभवलिया एक वेळ । कदा नोहे परती ॥६५३॥
परब्रह्मरूपें अवस्थान । साच शांतिचें हे लक्षण । परमानंद तोचि जाण । तेचि भक्ति बोलिली ॥६५४॥
ऐसिये भक्तिचा वरित । तो कैसिया परी असे वर्तत । तेंही सांगो सुनिश्चित । द्या अवधान लवलाही ॥६५५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP