श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४९
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
ईश्वरप्रेम भरले अंगीं । अनासक्त विषयभोगीं । सकल कर्मीं नि:संग विरागी । देही असोनि विदेही ॥५१०॥
भक्तिसी विकलें जिव्हार । वृत्ति आत्मानुसंधानपर । एकचि झाले आंत बाहेर । अखंड ऐक्यता बाणली ॥५११॥
आंतबाहेरी एकचि हरि । त्यावांचून नेणे परी । अखंड म्हणतां हरि हरि । हरिरूप होऊनि राहिला ॥५१२॥
जैसी तैलधारा अविच्छिन्न । तैसें अखंड जडलें स्मरण । कर्माकर्माचें स्फुरण । तेहीं संपूर्ण निमालें ॥५१३॥
नाहीं स्वदेहाचें भान । विषयांचें नुठी स्मरण । भोगेच्छा उपजेल कोठून । प्रमाण एक श्रीहरी ॥५१४॥
सर्व संसार व्यापार । हरिरूप झाला साचार । देहेद्रियांचे व्यवहार । सकळ झाले हरिरूप ॥५१५॥
ऐसी स्थिति प्रकटली । स्वदेहाची विस्मृति झाली । कर्माकर्माची भाष हरपली । भगवत्प्रेम सर्वकाळ ॥५१६॥
तेथ वेदशास्त्रोक्त कर्म । कवणें आचरावा धर्म । विरून गेले देहधर्म । आत्माराम स्वरूपें ॥५१७॥
यालागीं वेदानापि संन्यसति । ऐसें म्हणती येचि रीति । स्वयें न सांडितां सहज रीती । कर्मसमाप्ति जाहली ॥५१८॥
बुध्दिपूर्वक त्याग करणें । तें कृत्रिम ऐसें म्हणणें । आपैसया जें सुटणें । तें साहाजिक बोलिलें ॥५१९॥
निषिध्द कर्में त्यागावीं । विहित आचरीत जावीं । ऐसी शास्त्राज्ञा बरवी । सकल संतीं वंदिली ॥५२०॥
परि हें नियमन कोठवरी । देहबुध्दि असेल तोंवरी । तेचि निमालिया अंतरीं । विहिताविहित संपलें ॥५२१॥
म्हणोनि वैदिक कर्म आचार । नाहीं राहिला विचार । एकरूप सर्व प्रकार । झाला केवळ हरिमय ॥५२२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP