मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ७२

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७२

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


सकल संत समसमान । तेथें भेदासि नाहीं कारण । स्वानुभवें संपूर्ण पूर्ण । ईश्वरप्रसाद पावले ॥८५४॥
म्हणोनि उत्तम अथवा हीन जाती । संबंध नाहीं तयांप्रति । ते मुक्त होऊनि राहिले असती ।जन्मकर्माविरहित ॥८५५॥
प्रल्हादाची कोण जाति । परी त्याचे भक्तिपुढती । इंद्रादिक तुच्छ ठरती । शरण जाती तयासी ॥ ८५६॥
दैत्यकुळीं जन्मला । नारदांचा अनुग्रह झाला । भक्तिप्रभावें तेणें केला । नरहरी देव आपुलासा ॥८५७॥
विदुर तरी दासीपुत्र । परी भगंवंताचे प्रेमपात्र । भक्तियोगें परम पवित्र । मैत्रैया करवीं बोधिला ॥८५८॥
उत्तम कुल अथवा जाति । तें काहीं येथ न सरति । भक्तिचि प्रमाण निश्चिति । आन कांहीं नलगे ॥८५९॥
असो हीनजाति कुल । भक्तिभाव असतां प्रबल । ते उध्दरिती जीव सकळ । इतरांसीही समागमें ॥८६०॥
पांडवांची कुलकथा । पाहतां एक कुंतीमाता । जन्म देणार्‍या देवतां । भिन्न भिन्न पितृरूपें ॥८६१॥
म्हणोनि कुल उत्तम नोहावें । जाति अत्यंजही होआवें । परी सर्वकाळ अंतरीं असावें । प्रेम सर्वोत्तमाचें ॥८६२॥
म्हणोनि भेद उत्तम हीन । कदा नोहेति भक्तालागून । भक्तीच येथ प्रमाण । अकारण कुलजाति ॥८६३॥
तैसेचि विद्या अविद्या । हेंही नलगे पाहावया । सुरूप करूपता वायां । विचार करून पाहतां ॥८६४॥
हे देह संबंधीचें गुण । नव्हति परमार्थासी कारण । सधन अगर द्रव्यहीन । कामा नये कांहीहीं ॥८६५॥
द्रव्यानें साधों जातां । तरी परमार्थ सहज । घडतां परि येथ भांडवल मुख्यता । पाहिजे शुध्द भावाचें ॥८६६॥
म्हणोनि कांही करणें वा न करणें । तें वायां जाईल धरितां मनें । सर्व कांही करोनि न करणें ।
हेंचि मुख्य साधन ॥८६७॥
जाति विद्या कुल धन । न येती उपभोगालागून । रूपसौंदर्य कर्माचरण । नव्हे लाग तयाचा ॥८६८॥
यालागीं भगवदभक्तांचें ठायीं । हें नलगे पाहावें कांहीं । असोत नसोत लक्षणें ही । भक्ति सर्वांशीं प्रमाण ॥८६९॥
भक्तिनें उपजे तन्मयता । तेथ भेद नुरेचि पाहतां । देहनिरास झालिया वरौता । भेद कैंचा राहील ॥८७०॥
प्रत्यक्ष पाहा नयनीं । निद्रा लागतांचि ते क्षणीं । धर्मशाळेंतील सर्वप्राणी । एकरूप दिसताती ॥८७१॥
तेथ नाहीं स्त्रीपुरुष भेद । कुल जाति वर्ण प्रवाद । सधन निर्धनत्वाचा वाद । नुरे ज्ञान अज्ञान ॥८७२॥
सर्वचि सारखे भासति । हारपतां देहस्मृति । अज्ञानपणाचीही स्थिति । ज्ञान होतां तैसेचिं ॥८७३॥
सिध्दावस्थें आत्मज्ञान । देहाचें तेथें नुरे भान । देहाश्रित भेद निर्मूलन ।होय तेथें सहजचि ॥८७४॥
साधक स्थिति असतां । जरी लाभली तन्मयता । तरी त्यासी ये पूज्यता । निरहंकारता निर्लोभपणें ॥८७५॥
तेथेंही जाति कुल न पाहति । योग्यता जाणूनि वंदिती । ईश्वरासी चित्त अर्पिती । ते ईश्वरचि होऊं लागति ॥८७६॥
ऐसे जे ईश्वर झाले । कां ईश्वरता पात्र ठरले । ते तदीय म्हणोनि संबोधिले । झाले भेदरहित ॥८७७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP