श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६३
नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.
आतां या भक्तिमार्गासी । अपायकारक कोण कैसी । तेंही जाणिलें पाहिजे ऐसी । आकांक्षा धरोनि बोलती ॥६८१॥
सद्वैद्य औषध देती । परी पथ्यही सांगोनि ठेविती । पथ्य पाळिल्या गुण निश्चिति । अनुभवा ये तमाच्या ॥६८२॥
तैसेचिं येथेंही आहे । उदंड भक्ति जरी लाहे । तरी शुध्द आचरणावीण नये । कांहीच येत प्रत्यया ॥६८३॥
हरिचिंतन सत्संगति । सर्वत्र भगवदस्वरूप ख्याति । हे औषधापरि बोलों येती । परी पथ्य पाळिलें पाहिजे ॥६८४॥
वावडें काय तें जाणावें । जाणोनि नित्य टाळावें । तरीच तें अनुभवावें । फळ केल्या कार्याचे ॥६८५॥
यालागीं तें निरूपिति । विघ्न टाळावया निश्चिति । स्त्रीधन नास्तिक संगति । साधकानें वर्जावी ॥६८६॥
त्याचें घेवों नये दर्शन । न करावें चरित्र श्रवण । तेथें मन वेधिल्या जाण । नये हातीं आपुल्या ॥६८७॥
या तिहीमाजीं प्रथम । स्त्रीविषय बहु दुर्गम । चेतवूनि क्रोध काम । घातक होय आपणा ॥६८८॥
इतर विषय आहाति । परि एकेक इंद्रियासी लोभवति । सर्वेंद्रियासी गोवती । ऐसें बळ नाहीं तया ॥६८९॥
स्त्रीविषय जरी एकला । तरी सर्व इंद्रियांसी चटावी भला । प्राणी एकदां वश झाला । कीं तो गेला रसातळीं ॥६९०॥
स्त्रीसंगतीनें नाश । झाला आजवरी बहुतांस । कर्मठ ज्ञानी योगीजनास । हाचि झाला बाधक ॥६९१॥
विश्वामित्र पराशरादिक । यांसी स्त्री झाली घातकारक । तपश्चर्या आणि विवेक । यांसीं केलें देशोधडी ॥६९२॥
आणिकही थोरथोर । नागविले अधिकारी नर । तेथ इतर सामान्य येर । कोण पुसे तयांसी ॥६९३॥
यालागीं साधकानें । फार जपूनि वागणें राहाटलिया गाफिलपणें । नाश असे ठेविला ॥६९४॥
स्त्रीचरित्र नायकावें । त्यांसी डोळां न देखावें । संभाषण तेंही वर्जावें । एकांतीं आणि लोकांती ॥६९५॥
ईषत् प्रसंग घडों येतां । भोगार्थ वाढे लंपटता । मनीं लोभ धरूं जातां । अध:पात चुकेना ॥६९६॥
परस्त्री आणि परधन । जो मानी विषासमान । तोचि जगीं धन्य जाण । करील सार्थक जन्माचें ॥६९७॥
द्रव्यलोभ बहु कठीण । आवरीतां नावरे जाण । प्राण देती घेती त्यालागून । निर्घृणपणें अविवेकी ॥६९८॥
द्रव्य जोडिल्या सर्व जोडे । जवळी नसतां पडे उघडे । यालागीं जिकडे तिकडे । पाहातां खटपट त्यासाठीं ॥६९९॥
द्रव्यावांचूनि निभेना । त्याविरहित कांहीं जुळेना । द्रव्य असल्याविण चालेना । संसारयात्रा कोणाची ॥७००॥
द्रव्य तें अवश्य संग्राह्य । सर्वाचीच जरी होय । तरी अन्यायानें करितां संचय । हित नव्हे आपणा ॥७०१॥
स्त्रिया आणि धन । यांचें स्वधर्में करावें संपादन । रक्षण आणि परिपालन । स्वधर्मेंचि बोलिलें ॥७०२॥
अन्यायनें मिळवूं जातां । करी अपाय तत्वतां । यालागीं तेथील वार्ता । सज्जनीं मनीं नाणावी ॥७०३॥
परमार्थासी साधन धन । परि तेंचि साध्य मानितां क्षण । सकल परमार्थ बुडवून । करी राखरांगोळीं ॥७०४॥
म्हणोनि दूर राहावें । तयाचें भरी न पडावें । कुणीहीं पडों न द्यावें । स्त्रीधन चरित्र साधकीं ॥७०५॥
तैसेचि नास्तिकापासून । दूर राहावें जाणून । संगतिनें तयाचा गुण । लागल्याविण राहीना ॥७०६॥
चुकूनि जरी संभाषण । कानीं पडले तरी जाण । विकल्प मनीं उपजल्यावीण । न राहे होय घातक ॥७०७॥
साधकाचें कोमल मन । बिघडवितां नलगे क्षण । शुध्द भाव होय मलीन । क्षण एक न लागतां ॥७०८॥
विकल्प मनीं उपजला । तरी तो न वजे दवडिला । कुंठित करूनि बुध्दि सकळा । भ्रांतिमाजी पाडील ॥७०९॥
वृक्षाचा कोमल अंकुर । सहज खुडताये सत्वर । तोचि वृक्ष होता थोर । मत्त गजाही नाटोपे ॥७१०॥
तैसे साधक स्थितीत असतां । बुध्दिसि न राहे स्थिरता । सहज संशय मनीं येतां । तोचि राहे स्थिरावोनि ॥७११॥
म्हणोनि साधकाचे चित्तीं । राहे अपरिपक्व बोधस्थिती । ते नास्तिकांचि ये संगति । नाश करील तयाचा ॥७१२॥
नास्तिकांसी नाहीं प्रमाण । वेदशास्त्र पुराणवचन । सत्संगति विषासमान । मानुनि निंदा करिताती ॥७१३॥
स्वयें आपण बुडती । इतरांसीही बुडविती । अंधतम नरकगति । भोगूनि इतरां भोगविति ॥७१४॥
ऐसा हा थोर कठीण । परिणाम घडे दारुण । यालागीं चरित्र श्रवण । नास्तिकांचें वर्जावें ॥७१५॥
तयांसी न करावें भाषण । नाइकावें तयाचें वचन । तयांचा संबंध टाळून । दर्शनही न करावें ॥७१६॥
जोंवरी दृढ निश्चय नाहीं । तोंवरी दूर राही । निश्चय बाणतां आपुल्या ठायीं । काय करील नास्तिक ॥७१७॥
तैसेचि असे स्त्री आणि धनाचें । मन मोहिती साधकाचें । दूर राहणें तें हिताचें । कल्याणकारक सकळां ॥७१८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2015
TOP