मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र १९

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १९

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


आतां सूत्रकार नारदमुनि । मतमतांतरें परीक्षुनि । स्वमत दाविती बोलोनि । तें सावधान परियेसा ॥२३०॥
जगन्नियंता परमेश्वर । तेणें जग निर्मिलें सचराचर । प्राणिमात्रांचे व्यवहार । त्याचे अनुज्ञें चालती ॥२३१॥
त्याचे सत्तेविरहित । कोणी कांही करूं न शकत । वृक्षांचेइ पान हालत । सत्ताबळें तयाच्या ॥२३२॥
समुद्रावरील कल्लोळ । आकाशपंथी तारामंडळ । पृथ्वीवरील जीव सकळ । वर्तती तयाच्या आधारें ॥२३३॥
स्थावर जंगम सकळ सृष्टि । इच्छामात्रें जो प्रगटी । पालन पोषण करिता कष्टी । नव्हे स्वयें आपण ॥२३४॥
यालागीं जगज्जनक । रक्षक आणि संहारक । त्याचे आज्ञें वर्तति लोक । तरीच कल्याण तयांचे ॥२३५॥
ईश्वर आज्ञा तोचि धर्म । सकळांसी लाविला नेम । प्राणीमात्रांचे योगक्षेम । सहज साधे तयानें ॥२३६॥
जें जें कांही करावें । तें तें ईश्वरासी अर्पावें । अभिमानरहित वर्तावें । सदा स्मरणीं सावधान ॥२३७॥
अहंकाराचें निरसन । तेचिं म्हणावें ईश्वरार्पण । सर्व कर्म करोनि आपण । देवें केलें म्हणावें ॥२३८॥
फलाशा सर्व टाकावी । भगवतप्रीति मनीं धरावीं । त्याचीच आठवण ठेवावी । सर्वकाळ हृदयीं ॥२३९॥
विसर न पडावा तयाचा । हाचि निर्धार निश्चयाचा । तरिच भक्तिमार्गाचा । अनुभव कळों येईल ॥२४०॥
त्यासि चिंतिलिया मनीं । चित्ता करी गवसणी । सकळ मनोरथ पुरवोनी । परम शांति देईल ॥२४१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP