पांचव्या वर्षीं उत्तरायणांत अक्षरलेखनाला आरम्भ करावा, मात्र कुंभेचा सूर्य असतांना करुं नये. शुक्लपक्ष व अखेरच्या पांच तिथि सोडून कृष्णपक्ष या कर्माला योग्य होय. द्वितीया, तृतीया, पंचमी, दशमी, द्वादशी, व त्रयोदशी या तिथि या कर्माला श्रेष्ठ होत. अश्विनी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शततारका व रेवती, हीं नक्षत्रें व मंगळ व शनि यांखेरीज बाकीचे वार, हीं या (कर्माला शुभ) होत. गणपति, लक्ष्मी, नारायण, सरस्वती, आपली कुलदेवता आणि सूत्रकार यांची पूजा करुन गुरु, ब्राह्मण व धात्री (दाई) यांची पूजा करावी. नमस्कार करुन सर्वांना तीन प्रदक्षिणा घालाव्या व नन्तर प्रथम ॐकार लिहून, मागून दुसरीं (श्रीगणेशाय नमः) वगैरे अक्षरें लिहिण्यास आरंभ करावा. गुरुला मग नमस्कार करुन देवताविसर्जन करावें. ’अत्र भुवनमातः सर्ववाङमयरुपेणागच्छागच्छ’ या मंत्रानें सरस्वतीचें आवाहन करुन, तिला प्रणवमंत्रानें (ॐ) सर्व उपचार अर्पण करावेत.