यासाठीं ब्राह्मण, ब्राह्मणस्त्रिया व (ब्राह्मण विधवा) यांनीं काढिलेलें (कापसाचें) सूत घ्यावें. चार अंगुळें एकत्र करुन त्याच्याभोवतीं तें सूत शहाण्णव वेळां (त्या बोटांच्या) मुळाशीं गुंडाळावें व तें त्रिगुणित (तिहेरी) करुन त्याला वरचा (उर्ध्ववृत्त) पीळ भरावा व तें पुन्हां खालच्या (अधोवृत्त) पिळानें त्रिगुणित करावें. म्हणजे तें (सूत) नवसुती बनतें. ही नवसुती तीन वेळ वेष्टण करुन, तिला भक्कम गाठ मारावी. स्तनाच्या वर आणि बेंबीच्या खालीं (अशा लांबीचें) जानवें कधींही धारण करुं नये. (जानवें) तुटल्यास, खालीं (अशा लांबीचें) जानवें कधींही धारण करुं नये. (जानवें) तुटल्यास, खालीं गेल्यास किंवा जेवण केल्यावर तयार केलेलें टाकून द्यावें, ’सिद्धपदार्थांना मंत्र योजावे’ या न्यायानें तयार झालेलें जानवें (यज्ञोपवीत) त्रिगुणीकरणादिकांच्या मंत्रांनीं अभिमंत्रून ’यज्ञोपवीतं परमं०’ या मंत्रानें जें गळ्यांत घालावें, तें असें :- गायत्रीमंत्रानें (तें) त्रिगुणित करुन ’आपोहिष्ठा०’ वगैरे तीन ऋचांनीं (तें) प्रक्षालन करुन पुन्हां गायत्रीमंत्रानें त्रिगुणित करावें. गांठींत ब्रह्मा, विष्णु व महेश अयंचा न्यास (स्थापना) करावा. नऊ तन्तूंच्या ठिकाणीं नऊ देवतांचा न्यास करण्यासही कोणी सांगतात. नन्तर गायत्रीमंत्रानें दहावेळ अभिमन्त्रित केलेल्या पाण्यानें यज्ञोपवीत प्रक्षालन (धुणें) करुन ’उदुत्त्यं’ या तीन ऋचांनीं तें सूर्याला दाखवावें आणि ’यज्ञोपवीतं’ या मंत्रानें प्रथम उजवा हात वर करुन त्यांतून गळ्यांत घालावें. उजवा हात वर करुन गळ्यात घातलेलें जें ब्रह्मसूत्र (जानवें) तें उपवीत आणि डावा हात वर असतां घातलेलें जें ब्रह्मसूत्र तें प्राचीनावीत (असें समजावें.) गळ्यांत (माळेसारखें) जें घातलेलें (जानवें) तें निवीत होय. चिताकाष्ठ, चिताधूम, चाण्डाल, रजस्वला, प्रेत व बाळंतीण यांचा स्पर्श झाला असतां, स्नान करुन (जुन्या) जानव्याचा त्याग करावा व दुसरें घालावें. गळ्यांत माळेसारखें (निवीत) जानवें न घालतां परसाकडे किंवा लघवी हीं केलीं असतांही (जुन्या) जानव्याचा त्याग करावा. (दर) चार महिन्यांनीं (जुन्या) जानव्याचा त्याग करावा. सोयर व सुतक हीं फिटल्यावर (जुनें) जानवें टाकून नवें घालावें, असें कांहीं ग्रंथकार सांगतात.
’समुद्रं गच्छ स्वाहा०’
या मंत्रानें किंवा प्रणव (ॐकार) पूर्वक व्याहृतिमंत्रांनीं जुन्या यज्ञोपवतीला टाकून द्यावें. चुकीनें जानवें हरवल्यास अमंत्रक असें दुसरें जानवें घालावें, आणि ’मनो ज्योति० अग्ने व्रतपते चरिष्यामि तच्छकेयं तन्मे दाध्यतां वायो व्रतपते० आदित्य व्रतपते०’ या चार मंत्रांनीं तुपाच्या चार आहुतींचें (अग्नींत) हवन करुन, नंतर विधियुक्त नवें जानवें घालावें; किंवा
’यज्ञोपवीतनाशजन्यदोषनिरासार्थं प्रायश्चित्तं करिष्ये’
असा संकल्प करुन, आचार्यवरण, अग्निप्रतिष्ठापन वगैरे आज्यभागापर्यंतचें कर्म करुन, सूर्यासाठीं १०८ किंवा १००८ तिलघृतांचा गायत्रीमंत्रानें होम करावा, आणि नंतर नवें जानवें घालून राहिलेलें सन्ध्यादि कर्म करावें. यज्ञोपवीतावांचून क्षणभरही राहिल्यास, शंभर गायत्रीजप करावा. भोजन किंवा मलमूत्रोत्सर्ग हीं जर यज्ञोपवीतावांचून केलीं तर आठ हजार गायत्रीजप करावा. डाव्या खांद्यावरुन कोंपर्यावर किंवा मनगटावर जर जानवें पडलें, तर तें त्याच ठिकाणीं ठेवून, तीन अथवा सहा प्राणायाम अनुक्रमें करावेत व मग नवें जानवें घालावें. क्रोधादिक कारणांनीं स्वतःच जर जानवे फेकून दिलें असलें,तर पुन्हां साधेंच जानवें आधीं घालून प्रायश्चित्त करावें व नंतर (यथाविधि) नवें घालावें. ब्रह्मचार्यानें एक जानवें घालावें. स्त्रातकानें (गृहस्थाश्रम्यानें) दोन किंवा उत्तरीय (उपरणें) वस्त्राच्या अभावीं तीन घालावींत. बाप अथवा वडील भाऊ जिवंत असलेल्यानें उत्तरीय वस्त्र किंवा त्याच्या ऐवजी तिसरें (जानवें) घालूं नये. आयुष्याची (वाढीची) इच्छा करणारानें तिहींहूनहि अधिक जानवीं घालावींत. अभ्यंगस्नान, समुद्रस्नान, आणि मातापितराचे मृत दिवस याप्रंसगीं तैत्तिरीय, कठ, कण्व, चरक व वाजसनेयी या ब्राह्मणांनीं गळ्यातून जानवें काढवून तें प्रक्षालन करावें. इतर जे यजुःशाखी, ऋग्वेदी व सामवेदी ब्राह्मण त्यांनीं गळ्यांतून जानवें काढलें असतां, तें टाकून देऊन नवें घालावें.