"अनन्यपूर्विका (अगोदर दुसर्याला न दिलेली), रमणीय, जिच्याशी सापिंड्य नाही अशी, वयाने वरापेक्षा कमी, निरोगी, भ्रातुयुक्त, भिन्न गोत्र व प्रवर असलेली अशी वधु वरावी" अशी याज्ञवल्क्य इत्यादिकांनी कन्येची विशेषणे सांगितली आहेत. यापैकी, रमणीयत्व, निरोगत्व, भ्रात्रुयुक्तत्व या तिघांहून भिन्न जी विशेषणे सांगितली आहेत त्यांचा अभाव असेल तर इहलोकी व परलोकी पातित्य प्राप्त होते. याकरिता याविषयी विस्ताराने सांगतो
१. अन्यपूर्विका म्हणजे अगोदर दुसर्या पुरुषाच्या न झालेल्या वधू. मनाने दिलेली, वाचेने दिलेली, विवाहहोमापर्यंत संस्कार झालेली, सप्तपदी झालेली, उपभोग घेतलेली, गर्भधारण झालेली आणि प्रसूत झालेली; अशा सात प्रकारच्या वधू पुनर्भू जाणाव्या. याहून भिन्न असेल ती अनन्यपूर्विका होय. सप्तपदीविधीच्या पूर्वीच्या तीन (म्हणजे मनाने दिलेली, वाचेने दिलेली आणि विवाहहोमापर्यंत संस्कार झालेली) यांचा संकट असेल तर दुसर्या पुरुषाशी विवाह होतो. सप्तपदी विधि झाल्यावर तो विवाह बलात्काराने केलेला असला तरी ती वधू दुसर्या पुरुषाला देऊ नये
२. असपिंडा - समान म्हणजे एक आहे पिंड म्हणजे पिंडदानक्रिया अथवा मूलपुरुषशरीरसंबंध जिचा ती सपिंडा. तिच्याहून भिन्न ती असपिंडा. "पिता, पितामह व प्रपितामह हे पुरुष पिंडभागी आणि प्रपितामह वगैरे तीन पुरुष लेपभागी होत. या सर्वांना सातवा पुरुष पिंड देणारा आहे. म्हणून सात पुरुषांपर्यंत सापिंड्य होते" असे मत्स्यपुरानामध्ये वचन आहे. यास्तव एका पिंडदानाच्या क्रियेमध्ये दातृत्व, पिंडभाक्त्व आणि लेपभाक्त्व यापैकी कोणत्याही प्रकारच्या संबंधाने होणारा प्रवेश त्याचे नाव निर्वाप्यसापिंड्य असे काही ग्रंथकराचे मत आहे. याठिकाणी पतीसहवर्तमान स्त्रियांकडेही कर्तृत्व येत असल्यामुळे त्यांचीही सापिंड्यसिद्धि होते. मूलपुरुषाच्या एकशरिसंबंध अवयवांचा संबंध आहे म्हणून त्यास सापिंड्य सिद्ध होते असे दुसरे मत आहे. जरी भ्रात्यांच्या पत्नीचे हे सापिंड्य संभवत नाही तरी आधारत्वाने एक शरीराचा संबंध होतो. कारण एका मूलपुरुषाच्या अवयवांचे पुत्रद्वारा त्यांच्या ठिकाणी आधान होते. या दोन्ही सापिंड्यलक्षणांमध्ये, गयादिश्राद्धामध्ये मित्रादिकांना देखील पिंड प्राप्त होतो म्हणून; आणि एक शरीराचा संबंध सातांपेक्षा जास्त शेकडो पुरुषांपर्यंत असतो म्हणून; त्यासही सापिंड्य प्राप्त होईल अशी अनवस्था उत्पन्न होते. याकरिता "वधू अथवा वर यांचा पिता कूटस्थ पुरुषापासून जर सातवा असेल आणि त्यांची माता जर पाचवी असेल तर सापिंड्याची निवृत्ति होते" इत्यादि वचनांनी त्यांचा निरास होतो. कारण, मातृत्व, पितृत्व, इत्यादि संबंध असताच पाचवी माता व सातवा पिता येथपर्यंत सापिंड्य अशाविषयी दोन नियमांचा स्वीकार केला आहे, - त्यावरून पित्याकडून सापिंड्याचा विचार केला असता सात पुरुषांनंतर सापिंड्याची निवृत्ति होते आणि मातेकडून सापिंड्याची विचार केला असता पाचव्यानंतर सापिंड्याची निवृत्ति होते याप्रमाणे निर्णय जाणावा.