नित्य दोन यज्ञोपवीते धारण करीन. उदकयुक्त कमंडलु, छत्री, पागोटे, पादुका, जोडा, सुवर्णकुंडले व दर्भमुष्टि ही धारण करीन. वारंवार कर्तन न केलेले केश, दाधी, नखे असा राहीन. म्हणजे निमित्तावाचून मुंडन करणार नाही असा अर्थ जाणावा; कारण ज्याचा समावर्तन संस्कार झाला आहे त्याने मुंडन करू नये असा निषेध सांगितला आहे. नित्य अध्ययनामध्ये मग्न राहीन. स्वतःच्या शरीरावरून काढलेली पुष्पे, चंदन इत्यादिक निर्माल्यवत झालेली मी पुन्हा धारण करणार नाही. शुभ्र वस्त्र धारण करीन. सुगंधयुक्त व प्रियदर्शन असा राहीन. वैभव असता जीर्ण वस्त्रे व मलिन वस्त्रे धारण करणार नाही. तांबडे वस्त्र अथवा शरीराला पीडा करणारे वस्त्र धारण करणार नाही. गुरूवाचून अन्य माणसांनी धारण केलेली वस्त्रे, अलंकार, माळा इत्यादि धारण करणार नाही. असमर्थ असेल त्याने दुसर्यांनी धारण केलेली वस्त्रे वगैरे धुतल्यानंतर धारण करावी. दुसर्याने धारण केलेले यज्ञोपवीत, जोडा ही धारण करणार नाही. कंथा (गोधडी) धारण करणार नाही. उदकामध्ये स्वतःचे स्वरूप पहाणार नाही. भार्येबरोबर एका पात्रांत अथवा एका काली भोजन करणार नाही. हे विवाह खेरीज करून अन्य प्रसंगाविषयी जाणावे. शूद्राला धर्मज्ञान, नीतिज्ञान, व्रते यांचा उपदेश करणार नाही. हे वचन साक्षात उपदेश करण्याविषयी आहे. ब्राह्मणाला पुढे करून उपदेश करावा असे वचन आहे. करिता ब्राह्मण पुढे केल्यावर दोष नाही. गृहस्थाश्रमी शूद्राला स्वतःचे उच्छिष्ट देणार नाही. शूद्राला होमशेष देणार नाही. वर काढलेल्या उदकाने उभा राहून आचमन करणार नाही. कारण गुडघ्यापर्यंत अथवा त्याहून जास्त पाण्यात उभी राहून आचमन केले असता दोष नाही. अशुचि माणसाने आणलेल्या अथवा एका हाताने आणलेल्या उदकाने आचमन करणार नाही. पायाने पाय धुणार नाही. आतुर अशा स्त्रियेप्रत गमन करणार नाही. डोक्याला वस्त्र गुंडाळून दिवसास भटकणार नाही. रात्री आणि मलमूत्रोत्सर्गाचे वेळी डोक्याला वस्त्र गुंडाळीन. पायात जोडा असताना खाणे, नामगोत्रोच्चारपूर्वक नमस्कार करणे ही करणार नाही. पायाने आसन (पाट वगैरे) ओढणार नाही. याप्रमाणे दुसरीही स्मृतीमध्ये सांगितलेली वचने आहेत. या व्रतांमध्ये जी व्रते करणे शक्य असेल तितक्यांचाच संकल्प करावा. संकल्प केलेल्या व्रतांचे उल्लंघन बुद्धिपूर्वक होईल तर तीन दिवस उपवास करावा, अजाणता होईल तर एक रात्र उपवास हे प्रायश्चित्त जाणावे. उपवासाविषयी अशक्त असेल तर एक अथवा तीन ब्राह्मणांना भोजन द्यावे. याप्रमाणे स्नातकाची व्रते सांगितली.