गर्भधारणेच्या दिवसापासून किंवा जन्मतिथीपासून पांचव्या अथवा आठव्या वर्षीं ब्राह्मणाच्या (मुलाचें) उपनयन करावें. उपनयन म्हणजे (मुंज) याच न्यायानें क्षत्रियाचें उपनयन अकराव्या किंवा बाराव्या वर्षी आणि वेश्याचें बाराव्या अथवा सोळाव्या वर्षीं करावें. धनप्राप्तीची इच्छा करणारानें सहाव्या वर्षी करुं नये, असें कांहींचें मत आहे. सोळाव्या वर्षांपर्यंत ब्राह्मणाचा बाविसाव्या वर्षांपर्यंत क्षत्रियाचा आणि चोविसाव्या वर्षांपर्यंत वैश्याचा हे काल गौण आहेत. ही संख्या गर्भकालापासून मोजावी. जन्मापासून पंधरा वर्षेंपर्यंत मुंज न केल्यास ब्राह्मणाला विशेष प्रायश्चित नाही. सोळाव्या वर्षीं (ब्राह्मणाला) उपनयन करणें असल्यास, शेंडीसुद्धां हजामत (वपन) करुन एकवीस रात्रींपर्यंत यव खाऊन रहावें, आणि शेवटीं सात ब्राह्मणांना भोजन द्यावें, असें हें त्याचें प्रायश्चित्त आहे. सतराव्या वगैरे वर्षी जर उपनयन करणें असेल, तर तीन कृच्छ्रांचें प्रायश्चित्त करुन मग मुंज करावी. ब्राह्मण व क्षत्रिय यांचें मौंजीबंधन उत्तरायणांत करावें व वैश्यांचें दक्षिणायनांत करावें. ब्राह्मणाची मुंज वसंतऋतूंत करावी, क्षत्रियाची ग्रीष्मऋतूंत करावी आणि वैश्याची शरद्ऋतूंत करावी, अथवा ’माघापासून ज्येष्ठापर्यंतचे पांच महिने सर्व द्विजांना साधारण होत.’ असें गर्गाचें वचन असल्यानें, वसन्त न साधेल तर तर शिशिर किंवा ग्रीष्मऋतूसुद्धां चालतील; कारण, वसन्तकाल (मुख्य) सांगितल्यामुळें उत्तरायणादि कालांचा संकोच होत नाहीं. याप्रमाणेंच माघादि पांच महिन्यांचा जो नियम सांगितला, त्यावरुन उत्तरायणांत पौष व आषाढ या महिन्यांत मुंज करुं नये. त्यांतल्या त्यांतही मीनेचा सूर्य होऊन तो मिथुनेला जाईपर्यंतचा काल प्रशस्त होय. मीन व मेष यांत सूर्य असतांना (हाच काल) विशेष प्रशस्त होय. ’मकर आणि कुंभ या राशींचा सूर्य असतांना मध्यम, मीन व मेष यांचा तो असतांना उत्तम, व वृषभ आणि मिथुन यांचा असतांना वाईट, असा हा उपनयनाचा काल होय,’ असें वचन आहे. मीनेचा सूर्य असतांना जर चैत्र महिना असेल, तर अनिष्ट गुरु असतांहि तो अपवाद आहे, असें वचन असल्यानें, तो काल (या कर्माला) फारच चांगला. ’गुरुशुक्रांचा अस्त, सिंहस्थ गुरु, चंद्र आणि सूर्य हे निर्बळ व गोचरीचा गुरु असें अनिष्ट ग्रह असतांहि जर मीनेचा रवि असेल, तर मौंजीबंधन करावें,’ अशा अर्थाचें स्मृतिवचन आहे. या ठिकाणीं गुरुशुक्रांचा जो अस्त अपवादात्मक सांगितला आहे, तो महान् संकट असलेल्या प्रसंगींच लागूं पडतो, म्हणून तो न सांगणेंच बरें. क्षत्रिय आणि वैश्य यांना पहिल्या खेरीजकरुन (इतर) पुत्रांच्या बाबतींत या कार्याला दोष नाहीं. ज्येष्ठ अपत्याचें ज्येष्ठमासीं मङ्गलकर्म करुं नये. शुक्लपक्ष सबंद व कृष्णपक्षाचे अखेरचे पांच दिवस वजा करुन तोहि पक्ष होय,’ असें बृहस्पतीचें वचन असल्यानें संकटकालीं कृष्णपक्षांतल्या दशमीपर्यंत उपनयन करण्यास बाध नाहीं. शिष्ट लोक संकटकालींहि कृष्णपक्षांतल्या पंचमीपर्यंतच उपनयनसंस्कार करतात.