लग्न, प्रतिष्ठा (मण्डपप्रतिष्ठा वगैरे) व उपनयन यांची समाप्ति होईपर्यंत सगोत्रांना अनध्याय असल्याचें स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे. यास्तव, तीनपुरुषपर्यंत जे सपिण्ड असतील त्यांनीं ब्रह्मयज्ञ, वैश्वदेव वगैरे वर्ज्य करावींत व मुंज, लग्न वगैरेसाठीं केलेंल्या मण्डपप्रतिष्ठापनादि उत्सवाची समाप्ति होईपर्यंत उपनयन करुं नये असें वाटतें. विवाहादि मंगलकार्यें करण्यांत दोष नाहीं. मंगलकार्याचा जो दिवस तो अनध्याय होय, असें वचन असल्यानें, गर्भाधानादि शुभ कार्यांच्या दिवशीं एकाच कुलांत किंवा एकाच घरांत व्रतबन्ध (मुंज) करुं नये असें वाटतें. भूकम्प, भूविदारण, वज्रपात (वीज पडणें), उल्कापात, धूमवेतूची उत्पत्ति, ग्रहण वगैरे जर असतील तर दहा दिवस किंवा सात दिवस व्रतबन्धादि मंगलकार्यें करुं नयेत. संकटकालीं तीन दिवस अनध्याय मानावा, असें कोणी सांगतात. अकालिं वृष्टि झाल्यास तीन रात्रीं किंवा पक्षिणी (बारा प्रहर) अनध्याय होय असें म्हणतात. पौषाच्या आरंभापासून चैत्राच्या शेवटापर्यंत जर पाऊस पडला, तर ती अकाली वृष्टी होय. आर्द्रारम्भापासून ज्येष्ठाच्या अखेरीपर्यंतचीं सूर्यनक्षत्रें सोडून बाकीच्या नक्षत्रीं जर पाऊस पडला , तर तीही अकालवृष्टि असल्याचें कोणी सांगतात. ज्या देशांत पावसाचा जो काल असेल त्याहून इतर काळीं जर वृष्टि होईल तर तो अकाल पर्जन्य होय, असा (सामान्य) नियम समजावा. अतिवृष्टि, गारांचा पाऊअस अथवा रक्तवृष्टि झाल्यास तीन दिवस; प्रातःसन्ध्येच्या वेळी गर्जना (मेघांची) झाल्यास एक अहोरात्र; गुरु, शिष्य किंवा ऋत्विज मेल्यास तीन दिवस; पशु, बेडूक, मुंगूस, कुत्रा, सर्प, मांजर व उंदीर यांपैकी कोणी मधून गेल्यास एक अहोरात्र, रानमांजरादि मधून गेल्यास तीन रात्रींपर्यंत; कोल्हा, वानर, वगैरे मधून गेल्यास बारा रात्रींपर्यंत --असा अनध्याय समजावा. श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशी, यमद्वितीया , महाभरणी, वगैरे इतरही अनेक नित्य व नैमित्तिक अनध्याय इतर ग्रंथांत जरी सांगितले आहेत, तरी त्यांचा उपनयनाशीं संबंध नसल्यानें, ते येथें सांगितले नाहींत. व्रतबन्धसंस्कारांत नान्दीश्राद्धानन्तर वर सांगितलेले (मेघ) गर्जनादि नैमित्तिक अनध्याय जर प्राप्त होतील, तर ज्योतिर्निबन्धग्रन्थांत त्याबद्दल असें सांगितलें आहे कीं, नान्दीश्राद्धानंतर जर अकालिक अनध्याय येईल, तर फक्त उपनयन (गुरुजवळ नेणें) करावें, वेदशिक्षणारम्भ करुं नये. वेदशिक्षणारम्भाचा जो निषेध येथें सांगितला आहे, तो यजुःशाखीयांनाच फक्त लागू आहे; कारण, ऋक्शाखीयांनीं उपाकर्माच्या (गुरुजवळ जाण्याच्या) वेळींच वेदाध्ययनाला आरम्भ करावा असें वचन असल्यानें, त्यांच्या मुंजीच्या दिवशीं वेदाध्ययनारम्भ होणें संभवतच नाहीं. म्हणून उपनयन करण्यास ऋवशाखी वगैरेंना सर्वसाधारण सांगितलें. यजुःशाखीयांना मुंजीनन्तरसुद्धां अनध्याय प्राप्त होत असल्यामुळें वेदाध्ययनारम्भ वर्ज्य असल्याचें सांगितलें. नान्दीश्राद्धाच्या आधीं जर नैमित्तिक अनध्याय आला, तर उपनयन निराळ्या मुहूर्तावर करावें. मुंजीनन्तरच्या अनुप्रवचनीय होमाच्या आधीं जर (मेघ) गर्जना झाली, तर काय करावें त्याचा निर्णय पुढें सांगेन. असा हा अनध्ययादि निर्णय होय.