पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, भरणी, रोहिणी व आर्द्रा ही नक्षत्रे असता मनुष्यगण; हस्त, रेवती, पुनर्वसु, पुष्य, स्वाती, मृग, श्रवण, अश्विनी व अनुराधा ही नक्षत्रे असता देवगण; कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा शततारका ही नक्षत्रे असता राक्षसगण; याप्रमाणे जन्मनक्षत्रांचे गण जाणावे. वधुवरांचा एकच गण असेल तर शुभ होय. देवगण व मनुष्यगण असेल तर मध्यम होय. देवगण व राक्षसगण असेल तर वैर होय. राक्षसगण व मनुष्यगण असेल तर मरण होय. याकरिता मनुष्यगण व राक्षसगण यांचा विवाह करू नये. यांचे गुण- दोघांचाही एक गण असेल तर सहा गुण; वराचा देवगण व वधूचा मनुष्यगण यांचे देखील सहा गुण; वराचा मनुष्यगण आणि वधूचा देवगण असेल तर पांच गुण. वराचा राक्षसगण व वधूचा देवगण असेल तर एक गुण. वराचा देवगण आणि वधूचा राक्षसगण असेल तर शून्य गुण. एकाचा मनुष्यगण व दुसर्याचा राक्षसगुण यांचाही शून्य समजावा.