वस्त्र परिधान करुन साधें आचमन करावें. यज्ञोपवीत घातल्यावर यथाविधि आचमन करण्याचा विधि पुढें सांगेन. आज्यपात्राच्या उत्तरभागीं बटूकडून आचमन करवून, प्रणीतपात्रांच्या पश्चिमदेशरुप तीर्थानें (त्याचा) प्रवेश करवून, आचार्य व अग्नि यांच्या मधून नेऊन (त्याला) आचार्याच्या उजव्या बाजूला बसवावें. त्यानंतर ग्रहींच्या आस्तरणापासून स्त्रुवसम्मार्गान्ताचें कर्म झाल्यावर यज्ञोपवीतदानापासून आचमनापर्यंतचें कर्म करावें. आणि मग बटूच्या ओंजळींत पाण्याचें अवक्षारण वगैरे समिदाधानापर्यंत गायत्रीच्या उपदेशाचे अंगभूत जें कर्म तें करावें. बटूच्या शुचिर्भूतपणाची सिद्धि होण्यासाठीं
’अग्नये समिध०’
हा मंत्र त्याच्याकडून एकवार म्हणवावा. त्यानंतर (सूर्य व प्रजापति यांच्या स्वाधीन बटूला करणें) परिदान व अग्नीला अभिवादन हीं करविल्यावर आचारप्राप्त असें गायत्रीपूजन करावें. आणि अग्नीच्या उत्तरभागीं बटूला गायत्रीचा उपदेश करावा. अवक्षारणसुद्धां अग्नीच्या उत्तरभागींच करवावें. पूर्वाभिमुख असलेल्या आचार्यानें पश्चिमाभिमुख (बसविलेल्या) बटूला गायत्र्युपदेश करावा.