संध्या व अग्निकर्म यांचा लोप झाला असता आठ सहस्त्र गायत्रीजप करावा. एकदा लोप झाल्यास "मानस्तो के०" या मंत्राचा शंभर वेळा जप करावा असे क्वचित ग्रंथामध्ये सांगितले आहे. भिक्षेचा लोप झाला असता आठशे गायत्रीजप करावा. वारंवार भिक्षेचा लोप झाला असेल तर दुप्पट जप करून पुनरुपनयन करावे. मद्य, मांस यांचे अशन केले असता प्रायश्चित्त पूर्वी सांगितले आहे. स्त्रीसंग झाला असता गर्दभपशुयाग करावा. एक अथवा अनेक व्रतांचा लोप झाला असता साधारण प्रायश्चित्त ऋग्विधान ग्रंथामध्ये सांगितले आहे ते असे- स्वधर्मामध्ये काही न्यून झाल्यास ब्रह्मचार्याने शिवालयामध्ये बसून "तंवोधिया०" या मंत्राचा एक लक्ष जप करावा, म्हणजे न्यून जाऊन पूर्णता येते.
उपाकर्म केल्यानंतर पूर्वी विद्यारंभकाली अक्षरविद्येला आरंभ करताना ज्याप्रमाणे विष्णु आदिकरून देवतांचे पूजन सांगितले त्या प्रकाराने पूजन करून वेदाध्ययनाला आरंभ करावा. कलियुगावाचून इतर युगांमध्ये द्विजांच्या स्त्रियांना मौजीबंधन आणि वेदाध्ययन हे संस्कार सांगितले आहेत; कलियुगामध्ये हे दोन संस्कार नाहीत. करिता स्त्रियांनी वेदोच्चार वगैरे केल्यास दोष आहे.