गोत्रे व प्रवर यांचे सुलभ रितीने ज्ञान व्हावे आणि भगवान संतुष्ट व्हावे याकरिता त्यांची संख्या संक्षेपाने सांगतो. ७ भृगुगण, १७ आंरिरसगण, ४ अत्रिगण, १०, विश्वामित्र गण, ३ कश्यपगण, ४ वसिष्ठगण आणि ४ अगस्त्यगण याप्रमाणे ४९ गण आहेत. सर्व ग्रंथांमधील मतांचा संग्रह केला असता आणखी गण सापडतात ते त्या ठिकाणी सांगेन. त्यापैकी भृगुगण सात आहेत. वत्स आणि बिद हे दोन जमदग्न्य भृगु आणि आर्ष्टिषेण, यस्क, मित्रयु, वैन्य व शुनक हे पाच केवल भृगु. याप्रमाणे एकंदर सात झाले.
१. यापैकी वत्स, मार्कंडेय, मांडूकेय इत्यादि दोनशेहून अधिक वत्सगोत्राचे भेद आहेत. यांचे भार्गव, च्यावन, आप्नवान और्व व जामदग्न्य असे पाच अथवा भार्गव, और्व व जामदग्न्य असे तीन प्रकार आहेत.
२. बिद, शैल, अवट इत्यादि विसांहून अधिक बिद आहेत. यांचे भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व व बैद असे पाच अथवा भार्गव, और्व व जामदग्न्य असे तीन प्रवर आहेत.
३. आर्ष्टिषेण, नैऋति, याम्यायण इत्यादि विसांहून अधिक आर्ष्टिषेण आहेत. यांचे भार्गव, च्यावन, आप्नवान, आर्ष्टिषेण व अनूप असे पाच अथवा भार्गव, आर्ष्टिषेण व अनूप असे तीन प्रवर आहेत. हे वत्स, बिद आणि आर्ष्टिषेण असे जे तीन गण सांगितले त्यांचा परस्परांमध्ये विवाह होत नाही; कारण याचे दोन अथवा तीन प्रवर समान आहेत. शिवाय पहिले दोन म्हणजे वत्स व बिद हे जामदग्न्य असल्यामुळे सगोत्र आहेत. तीन प्रवराचे आर्ष्टिषेण हे जामदग्न्य नसल्यामुळे त्याचे वत्स अथवा बिद यांच्याशी जरी दोन प्रवरांचे साम्य नाही अथवा सगोत्रहि नाही, तथापि पाच प्रवरापैकी तीन प्रवर समान असणे हेही विवाहाला बाधक आहे. याप्रमाणे पुढेही जाणावे.
१. वात्स्यांचे भार्गव, च्यावन व आप्नवान असे तीन प्रवर जाणावे.
२. वत्सपुरोधस यांचे भार्गव, च्यावन, आप्नवान, वत्स व पौरोधस असे पाच प्रवर आहेत.
३. बैज व मथित यांचे भार्गव, च्यावन, आप्नवान, बैज व मथित असे पाच प्रवर आहेत. बैज व मथित यांचे क्वचित ग्रथांमध्ये तीन प्रवर सांगितले आहेत. यांचा (वात्स्य, वत्स, पुरोधस बैज व मथित यांचा) परस्परांमध्ये अथवा पूर्वीच्या तिघांबरोबर (वत्स, बिद व आर्ष्टिषेण) विवाह होत नाही; कारण तीन प्रवर समान येतात.
४. यस्क, मौन, मूक इत्यादि त्रेपन्नांहून अधिक यस्क आहेत. यांचे भार्गव, वैतहव्य, सावेतस असे तीन प्रवर आहेत.
५. मित्रयु, रौष्ट्यायन, सापिंडिन इत्यादि तिसांपेक्षा जास्त मित्रयु आहेत. यांचे भार्गव, वाध्र्यश्व दैवोदास असे तीन अथवा भार्गव, च्यावन, दैवोदास असे तीन अथवा वाध्र्यश्व हा एक याप्रमाणे प्रवर आहेत.
६. वैन्य, पार्थ, बाष्कल आणि श्येत असे वैन्यांचे प्रकार आहेत. यांचे भार्गव, वैन्य व पार्थ असे तीन प्रवर आहेत.
७. शुनक, गार्त्समद, यज्ञपति, इत्यादि सतरांहून अधिक शुनक आहेत. यांचा शौनक असा एक अथवा गार्त्समद असा एक अथवा भार्गव आणि गार्त्समद असे दोन अथवा भार्गव, शौनहोत्र आणि गार्त्समद असे तीन याप्रमाणे प्रवर आहेत. यस्क, मित्रयु, वैन्य आणि शुनक यांचा स्वतःचा गण वर्ज्य करून परस्पर विवाह होतो. आणि पुर्वीच्या जामदग्न्य, वत्स इत्यादिकांबरोबरही होतो. कारण एक प्रवराचे साम्य असले तरी दोन अथवा तीन प्रवरांचे साम्य नाही; आणि भृगुगणामध्ये एका प्रवराचे साम्य असता विवाहाला दोष होत नाही, आणि ते जामदग्न्य नसल्यामुळे एकगोत्री नाहीत. मित्रयु यांचे एका पक्षाने दोन प्रवर येतात, म्हणून त्यांचा त्रिपवरी वत्स इत्यादिकांबरोबर विवाह होत नाही असे कोणी ग्रंथकार म्हणतात. वत्स इत्यादिकांच्या प्रवराचा पक्ष ग्रहण करणार्या मित्रयूंचा वत्सादिकांबरोबर विवाह होत नाही, इतर पक्ष ग्रहण करणार्या मित्रयूंचा होतो असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. क्वचित ग्रंथांमध्ये दोन गण अधिक सांगितले आहेत. ते
१. वेद आणि विश्वजोतिष यांचे भार्गव, वेद व वैश्वज्योतिष असे तीन प्रवर आहेत.
२. शाठर आणि माठर यांचे भार्गव, शाठर व माठर असे तीन प्रवर आहेत. यांचा परस्परांबरोबर आणि पुर्वी सांगितलेल्या सर्वांबरोबर विवाह होतो. याप्रमाणे भृगुगण सांगितले.