उपनयनाचे पूर्वदिवशी आचार्याने
"ममोपनेतृत्वयोग्यतासिद्ध्यर्थं कृच्छ्रत्रयं तत्प्रत्याम्नायगोनिप्क्रयीभुतयथाशक्तिरजतद्रव्यदानेनाहमाचरिष्ये, "
तथा द्वादशाधिकसहस्त्रगायत्रीजपमुपनेतृत्वयोग्यतासिद्ध्यर्थं करिष्ये
असा संकल्प करावा. जर पूर्व संस्कार करावयाचे राहिले असतील तर
"अस्य कुमारस्य पुंसवनादीनामथवा जातकर्मादीनां चौलान्तानां संस्काराणा कालातिपत्तिजनितप्रत्यवायपरिहारद्वारा
श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं प्रतिसंस्कारमेकैकां भूर्भुवःस्वः स्वाहेति समस्तव्याह्रत्याज्याहुति होष्यामि
याप्रमाणे संकल्प करून अग्निस्थापन, इध्मास्थापन इत्यादि पाकयज्ञाचे तंत्रासह, अथवा अग्निस्थापन, आज्यसंस्कार, पात्रसंमार्ग एवढ्यांनी मात्र युक्त अशा प्रत्येक राहिलेल्या संस्काराची एक याप्रमाणे समस्त व्याह्रतिमंत्रांनी आज्याहुतीचे हवन करावे. नंतर
"अस्य कुमारस्यपुंसवनानबलोभनसीमन्तोन्नयनजातकर्मनामकर्मसूर्यावलोकननिष्क्रमणोपवेशनान्नप्राशनचौलसंस्काराणां लोपनिमित्तप्रत्यवायपरिहारार्थंप्रतिसंस्कारंपादकृच्छ्रंप्रायश्चित्तंचौलस्यार्धकृच्छ्रंबुद्धिपूर्वकलोपेप्रतिसंस्कारमर्द्धकृच्छ्रंचूडायाः
कृच्छ्रंतत्प्रत्याम्नायगोनिष्क्रयीभूतयथाशक्तिरजतद्रव्यदानेनाहमाचरिष्ये"
असा संकल्प करावा. चौलसंस्कार उपनयनाच्या बरोबर करण्याचा कुलधर्म असेल तर कालातिक्रम झाल्याबद्दल होम व चौललोपबद्दल प्रायश्चित्त ही करू नयेत. कोणी ग्रंथकार संस्कारलोपाबद्दलचे प्रायश्चित्त बटूकडून करवावे, असे म्हणतात. नंतर बटुने
"मम कामचारकामवादकामभक्षादिदोषपरिहारद्वारा उपनेयत्वयोग्यतासिद्ध्यर्थं कृच्छ्रत्रयप्रायश्चित्तंतत्प्रत्याम्नायगोनिष्क्रयीभुतयथाशक्तिरजतद्रव्यदानेनाहमाचरिष्ये"
याप्रमाणे संकल्प करावा. निष्क, निष्कार्ध, निष्काचा चतुर्थांश अथवा निष्काचा अष्टमांश इतके रुपे गाईचे मूल्य म्हणून द्यावे. कमी देऊ नये. आठ गुंजाचा एक मासा या प्रमाणाने चाळीस मासे म्हणजे एक निष्क असे सांगितले आहे. नंतर प्रायश्चित्त केल्यानंतर, अतिक्रांत कर्मे देखील करावी असे कोणी आचार्य म्हणतात. प्रायश्चितानंतर अतिक्रांत कर्मे करण्यास नकोत असे दुसरे आचार्य म्हणतात. यावरून जातकर्म इत्यादि संस्कार पुन्हा करावे किंवा पुन्हा करू नये असे दोन पक्ष होतात. म्हणून, संस्कार न केल्याचा दोष प्रायश्चित्ताने गेला तरी संस्कार करण्याच्या योगाने होणारे पुण्य प्राप्त होण्याकरिता संस्कार पुन्हा करावे. संस्कार करणे असतील तर पुढे लिहिल्याप्रमाणे संकल्प करावा. पत्नी व कुमार यांसह बसून यजमानाने देशकालादिकांचा उच्चार केल्यावर
"अस्य कुमारस्यगर्भाम्बुपानजनितदोषनिबर्हणायुर्मेधाभिवृद्धिबीजगर्भसमुद्भवइनोनिबर्हणद्वारा
श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थंअतिक्रांतं जातकर्म तथा बीजगर्भसमुद्भवैनोनिबर्हणायुरभिवृद्धिव्यवहारसिद्धिद्वारा
श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं नामकर्म आयुरभिवृद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं सूर्यावलोकनं, आयुःश्रीवृद्धिबीजगर्भसमुद्भवैनोनिबर्हणद्वारा
श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं निष्क्रमण, आयुरभिवृद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ उपवेशनं,
मातृगर्भमलप्राशनशुद्ध्यन्नाद्यब्रह्मवर्चसतेजइन्द्रियायुरभिवृद्भिबीजगर्भसमुद्बवैनोनिबर्हणद्वारा श्रीपरमे० अन्नप्राशनंचाद्यकरिष्ये बीजगर्भसमुद्भवैनोनिर्बहणबलायुर्वर्चोभिवृद्धिद्वाराश्रीप०र्थचूडाकर्म द्विजत्वसिद्ध्यावेदाध्ययनाधिकारार्थंउपनयनंचश्वःकरिष्ये जातादिसर्वसंस्कारांगत्वेनपुण्याहवाचनंमातृकापूजनंनान्दीश्राद्धंकरिष्ये उपनयनांगत्वेनमण्डपदेवतास्थापनंकुलदेवतास्थापनंचकरिष्ये
इत्यादि आपापल्या गृह्यसूत्रग्रंथानुसार संकल्प करून नान्दीश्राद्धापर्यंतचे सर्व कर्म तंत्राने करावे. (अंगभूत कर्माचे अनेकांच्या उद्देशाने एकदा अनुष्ठान ते तंत्र होय) मंडपदेवताचे स्थापनेपासून बटु, माता पिता, यांना आप्तेष्टांनी वस्त्रदान (आहेर) देण्यापर्यंत कर्म करून अन्नप्राशनापर्यंत संस्कार आपापल्या गृह्यसूत्राप्रमाणे पूर्वदिवशी करावे. चौल व उपनयन ही दुसर्या दिवशी करावी. सर्व संस्कार एके दिवशी करणे असल्यास वर सांगितलेल्या सर्व संकल्पवाक्यांचे शेवटी "उपनयनंचाद्य करिष्ये" असा संकल्प म्हणावा. संस्कार करणे नसतील तर चूडाकर्म व उपनयन यांचा संकल्प करून
"उभयांगत्वेन पुण्याहवाचनं नान्दीश्राद्धं उपनयनांगत्वेन मण्डपदेवतास्थापनं कुलदेवतापस्थानंच करिष्ये"
असा संकल्प करावा.
नान्दीश्राद्ध झाल्यानंतर पूर्वी पूजन केलेल्या मातृकांसहित मण्डपदेवतांचे स्थापन करावे. त्यानंतर पूर्वोक्त रीतीने वेदि तयार करावी. याप्रमाणे पूर्व दिवसाचे कृत्य झाले.
त्यानंतर दुसर्या दिवशी अंतरलेले चौल करावे. पूर्वी चौल झालेले असल्यास अभ्यंगस्नान घालून मातेसह भोजन करवावे. त्या वेळेस ब्रह्मचारी असतील त्यांनाही भोजन घालावे असा आचार आहे. त्यानंतर देशकालादिकांचा उच्चार करून
"अस्य कुमारस्यद्विजत्वसिद्धिद्वाराश्रीपरमेश्वरप्रीत्यर्थंगायत्र्युपदेशंकर्तु तत्प्राच्यांगभूतंवापनादिकरिष्ये'
याप्रमाणे संकल्प करून वपन इत्यादिक करावे. वपन करणे ते मुख्य शिखा खेरीज करून चौलसमयी ज्या अन्य शिखा ठेविल्या असतील त्यांचे होय. नंतर बटूला स्नान घालून नवे वस्त्र देऊन शेंडीला गाठ बांधून मंगल तिलक लावावा. मुहूर्त सांगणारा ज्योतिषी याची पूजा करुन त्याने सांगितलेल्या मुहूर्तावर वेदीचे ठिकाणी पूर्वाभिमुख बसलेल्या आचार्याने अंतरपट दूर सारून बटूचे मुख अवलोकन करावे. बटूने नमस्कार केल्यावर त्याला आपल्या मांडीवर बसवावा. त्यानंतर ब्राह्मणांनी जसा आचार असेल त्याप्रमाणे दोघांच्या मस्तकावर अक्षता टाकाव्या. याप्रमाणे जसे गृह्यसूत्र असेल तसे पाहून करावे. सर्वत्र बटूकडून गायत्री आदिकरून मंत्र म्हणवावे. संधीच्या वगैरे वर्णांचा उच्चार अशुद्ध करू देऊ नये. अवशिष्ट प्रयोग समाप्त झाल्यावर दोनशे, शंभर अथवा यथाशक्ति ब्राह्मणभोजनाचा संकल्प करून विप्रांना पुष्कळ दक्षिणा द्यावी. नंतर ब्रह्मचारी बटूने नवीन भिक्षापात्रामध्ये आईजवळ, मावशीजवळ वगैरे
"भिक्षां भवती ददातु"
असे म्हणून अनुप्रवचनीय होमाकरिता तांदूळ मागवावे. पित्याजवळ
"भिक्षा भवान्ददातु"
असे म्हणून मागावे. मिळालेली भिक्षा आचार्याजवळ देऊन मध्यान्हसंध्या करावी व उरलेला दिवस आचार्याचे सन्निध घालवावा. त्या दिवशी मध्यान्हसंध्या विकल्पेकरून करावी असे कोणी ग्रंथकार म्हणतात. ब्रह्मयज्ञ दुसर्या दिवसापासून आरंभ करून गायत्रीमंत्राने करावा. अनुप्रवचनीय होमाला आरंभ होण्याच्या पूर्वी गर्जना, पर्जन्यवृष्टी इत्यादि होण्याचा संभव असेल तर दिवसासच चरुश्रपणापर्यंत सर्व कर्म करून संध्याकाळी होम करावा. पाक होण्याच्या पूर्वी गर्जना इत्यादि निमित्त झाले असता शान्ति करून पाक करावा.