त्रिकाल संध्या, अग्नीची सेवा आणि भिक्षा ही नित्य आहेत. त्यामह्ये अग्नीची सेवा प्रातःकाली व सायंकाळी करावी, अथवा केवळ सायंकाळी करावी. पळस, खैर, पिंपळ आणि शमी यांच्या समिधा श्रेष्ठ होत. त्यांचे अभावी रुई, वेत यांच्या घ्याव्या. ब्राह्मणांनी भिक्षा मागणे ती 'भवत्' शब्दपूर्वक मागावी व ती ब्राह्मणाच्या घरीच मागावी. आपत्काली शूद्राच्या घरची कोरडी भिक्षा घ्यावी. हव्य (देवांप्रीत्यर्थ अन्न), श्राद्ध खेरीजकरून इतर प्रसंगीचे कव्य (पितरांप्रीत्यर्थ अन्न) यांचे ठिकाणी आमंत्रण आले असेल तर भोजन करावे. ब्रह्मचारी याला ब्रह्मयज्ञही नित्य आहे. ब्रह्मयज्ञ उपाकर्माच्या पुर्वी गायत्रीमंत्राने करावा. अन्य उपायांनी रोगाचा परिहार होत नसेल तर रोगनिवृत्यर्थ गुरूचे अन्न, मद्य इत्यादि निषिद्ध पदार्थ भक्षण करावे. निषिद्ध न केलेले गुरूचे उच्छिष्ट औषधावाचून देखील भक्षण करावे. याप्रमाणे ज्येष्ठ भ्राता, पिता यांचे उच्छिष्टासंबंधाने जाणावे. दिवसास झोप घेणे, डोळ्यात काजळ घालणे, जोडा, छत्री वगैरे धारण करणे, पलंगावर शयन करणे ही वर्ज्य करावी. "तांबूल काजळ व कांस्यपात्रांत भोजन ही संन्यासी, ब्रह्मचारी आणि विधवा यांनी वर्ज्य करावी" असे वचन आहे. मद्य, सूतकान्न, श्राद्धान्न इत्यादिकांसंबंधी निषेध पुनरुपनयनसंस्कारामध्ये सांगितले आहेत ते पाळावे. मेखला, अजिन, दण्ड, यज्ञोपवीत, कौपीन व कटिसूत्र ही ब्रह्मचार्याने नित्य धारण करावी. मेखला, यज्ञोपवीत इत्यादि तुटली असता उदकात टाकून दुसरी धारण करावी. यज्ञोपवीताचा नाश झाला असता "मनोज्योति०" हा मंत्र व "व्रातपतिभि०" हे तीन मंत्र अशा चार मंत्रांनी आज्याच्या आहुतीचे हवन करावे असे सांगितले आहे. ब्रह्मचारी याने गुरूची सेवा करण्याचा प्रकार दुसर्या ग्रंथांमध्ये पहावा.