षण्ढ, अंध, बहिरा, मुका, पांगळा, कुबडा, खुजा इत्यादिकांचे संस्कार करावे. मत्त व उन्मत्त यांचे संस्कार करू नये असे कोणी म्हणतात. त्यांना पातित्य तर नाही कारण कर्मे करण्याचा अधिकारच नाही. त्यांच्या अपत्यांचे संस्कार करावे. कारण ब्राह्मणीचे ठिकाणी ब्राह्मणापासून उत्पन्न झाला तो ब्राह्मणच होय असे श्रुतिवचन आहे. मत्त, उन्मत्त यांचे देखील संस्कार करावे असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. या प्रसंगी आचार्याने होम करावा. विकृतांग असेल त्याच्या उपनयनाविषयी आचार्याचे समीप नेणे, अग्नीचे समीप नेणे आणि गायत्रीमंत्र म्हणविणे ही तीन कर्मे प्रधान आहेत या तिहींपैकी विकृतांग असेल तर कोणते तरी एक केले म्हणजे झाले. इतर संभवनीय असतील तर करावी. मुका, बहिरा इत्यादिकांविषयी गायत्रीमंत्रोच्चार इत्यादिकांचा असंभव आहे म्हणून त्यांना स्पर्श करून गायत्रीजप करावा. संस्काराचे मंत्र आचार्याने म्हणावे. वस्त्रधारण वगैरे निर्मंत्र करावे असेही कोणी ग्रंथकार म्हणतात. या प्रमाणेच विवाहासंबंधाने जाणावे. कारण कन्येचे पाणिग्रहणाखेरीज इतर सर्व ब्राह्मणाकडून करवावे असे वचन आहे. याप्रमाणे विकृतांग इत्यादिकांसंबंधी विचार सांगितला.