१२, ८, व ६ या स्थानचे वर्ज्य करुन, शुभ ग्रह मुंजीला घ्यावेत. ३, ६ व ११ या स्थानचे पापग्रह घ्यावेत. शुक्लपक्षांतला वृषभ व कर्क या राशींचा चन्द्र शुभ होय. तनुस्थानचारवि श्रेष्ठ असल्याचें क्वचित् ग्रन्थांत सांगितलें आहे. आठव्या स्थानचे सर्व ग्रह वर्ज्य करावेत. लग्नेश, शुक्र व चन्द्र हे सहाव्या स्थानचे वर्ज्य होत. बारावा शुक्र वर्ज्य होय. लग्नीं चन्द्र व पापग्रह आणि आठव्या व बाराव्या स्थानचा चन्द्र हे वर्ज्य करावेत. ज्या लग्नीं पांच इष्टग्रह येत नाहींत तें (लग्न) सर्वथा वर्ज्य करावेत. ज्या लग्नीं पांच इष्टग्रह येत नाहींत तें (लग्न) सर्वथा वर्ज्य करावें. तुला, मिथुन, कन्या, धनु, वृषभ व मीन हे नवमांश शुभ होत. कर्कांश वर्ज्य करावा. षड्वरशुद्धि आणि इष्टकालसाधनादिक यांचा विचार ज्योतिषग्रन्थांत पाहावा. आई विटाळशी असेल आणि बाप जवळ नसल्यानें थोरला भाऊ, मामा वगैरे जे कोणी मुंज करणारे असतील, त्याचीही स्त्री जर विटाळशी असेल, तर मुंज, लग्न वगैरे करुं नयेत. नान्दीश्राद्धानन्तर जर आई विटाळशी होईल, तर (वडील) भाऊ वगैरे कोणीही इतर मुंज करणारा असला, तरी जवळचा दुसरा मुहूर्त नसल्यास शान्ति करुन किंवा दुसरा मुहूर्त असल्यास त्या मुहूर्तावर मुंज करावी. मामा वगैरे जो कोणी कर्ता असेल, त्याची बायको जर नान्दीश्राद्ध नन्तर विटाळशी होईल, तर (संस्काराला) आरम्भ झालेला असल्या कारणानें शान्तिवांचूनच कार्य करावें. मुंज किंवा लग्न झाल्यानंतर मण्डपोद्वासनाच्या आधीं जरी माता विटाळशी झाली, तरी मङ्गल कार्यसमाप्ति झालेली नसल्याकारणाने शान्ति करावी, असे मुहूर्तचिन्तामणीच्या टीकेंत लिहिले आहे. मङ्गलकार्यारम्भाच्या आधीं जर रजोदर्शन होईल, तर दुसर्या कोणा कर्त्याच्या अभावी अति संकट असल्यास शान्ति करुन, व्रतबन्धादिक करावीत, असें कौस्तुभांत सांगितलें आहे. शान्ति करणें ती पुढीलप्रमाणें करावी :-
’ममामुकमङ्गले संस्कार्यजननीरजदोषजनिताशुभफलनिरासार्थं शुभफलावाप्त्यर्थं श्रीपूजनादिशानिं करिष्ये’
असा संकल्प करावा आणि एक मासा सोन्याच्या केलेल्या लक्ष्मीच्या मूर्तीची श्रीसूक्ताने षोडशोपचारें पूजा करावी. ज्याच्या त्याच्या गृह्यसूक्तांत सांगितल्याप्रमाणें ज्यानें त्यानें विधिवत् श्रीसूक्ताच्या प्रत्येक ऋचेनें खिरीची आहुती देऊन, कलशांतल्या पाण्यानें अभिषेक करावा . विष्णूचें स्मरण करुन (तें सर्व) कर्म ईश्वराला अर्पण करावें. व्रतबन्धसंस्कारास आरम्भ केल्यानंतर जर सुतक आलें, तर सोदर (सख्ख्या) भावांचा समान संस्कार असल्यास, आणि प्रेतकर्म संपलें नसल्यास काय करावें, त्याचा निर्णय चौलप्रकरणांत मागें सांगितला आहे. याचा विशेष निर्णय पुढें सांगूं.