ब्रह्मचार्याने पिता, ज्येष्ठ यांवाचून इतरांचे उच्छिष्ट भक्षण; स्त्रियेसहवर्तमान भोजन, मद्यमांस, श्राद्धान्न, सूतकान्न, वेश्येकडचे अन्न इत्यादिकांचे भक्षण वगैरे केले असता पुनरुपनयन करावे असे सांगितले आहे. त्या ठिकाणी अग्निमुख म्हणजे स्थंडिलकरणादि कर्म करून घृताने भिजविलेली पळसाची समिधा घेऊन
"पुनस्त्वादित्या' कामाःस्वाहा" "यन्म आत्मनोभिंदाभूदग्नि० पुनरग्निश्चक्षुदरात"
या दोन मंत्रांनी हवन करावे. चरु शिजवून होम करावा.
"सप्त ते अग्ने० घृतेन स्वाहा"
हा मंत्र होमाचे ठिकाणी म्हणावा. त्यानंतर "येन देवाः पवित्रेण०" इत्यादि तीन ऋचांनी उपहोम करावा. नंतर स्विष्टकृत होम वगैरे गुरूला धेनु दान देणे येथपर्यंत कर्म करावे. याप्रमाणे बौधायनाचा पक्ष आहे. दुसरा पक्ष - वस्त्रधारणापर्यंत कर्म करून पळसाची समिधा घेऊन व्रताच्या प्रायश्चित्ताचा होम करून व्याह्रतिमंत्रांनी होम करावा. तिसरा पक्ष - गायत्री मंत्राने शंभर वेळा मंत्रण केलेले घृत प्राशन केले असता प्रायश्चित्त होते इत्यादि ब्राह्मणाचे वचन ऐकून करावे. या तीन पक्षांविषयी जसे सामर्थ्य असेल त्याप्रमाणे करावे. अशी व्यवस्था जाणावी. हे कौस्तुभ ग्रंथामध्ये पहावे. याप्रमाणे अन्यशाखांमध्ये देखील वपन, मेखला, अजिन, दंड, भिक्षा, व्रत इत्यादिकांविषयी जो जो विकल्प सांगितला असेल त्या त्याप्रमाणे आचरण करून आपापल्या शाखेमध्ये सांगितल्या प्रकारे पुनरुपनयन करावे.