मागें सांगितल्याप्रमाणें तिथि व त्यांच्यामुळें अनध्यायादिकांचा विचार करुन, आतां वारादिक सांगतों. गुरु, शुक्र व बुध हे वार श्रेष्ठ होत रविवार मध्यम होय. सोमवार कनिष्ठ जाणावा. मंगळ व शनि हे वार निषिद्ध होत. सामवेदी व क्षत्रिय यांना मंगळवार प्रशस्त होय. शाखाधिपतीचा वार, शाखाधिपतींचें बल आनि शाखाधिपतीचें लग्न असा हा त्रिकूटयोग उपनयनाला मिळणें दुर्लभ होय. गुरु, शुक्र, मंगळ व बुध हें अनुक्रमें ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचें अधिपति होत. गुरु व शुक्र हे ब्राह्मणांचे अधिपति, मंगळ व रवि, हे क्षत्रियांचे अधिपति आणि चन्द्र व बुध हे वैश्यांचे अधिपति. हे वर्णाधिपति होत. पित्याला रविबल श्रेष्ठ, बटूला शाखाधिपति व वर्णाधिपंति हे श्रेष्ठ होत, व गुरु आणि चन्द्र यांचें बल पिता, बटु वगैरे सर्वांनाच श्रेष्ठ होय. बटु व त्याचा बाप या दोघांना अनुक्रमें जर गुरु व चन्द्र यांचीं बलें नसतील तर बटूला त्या दोहोंचेंहि बल असणें आवश्यक आहे. यांपैकीं चन्द्रबल म्हणजे अकय त गर्भाधानप्रकरणांत सांगितले आहे. २-५-७-९ व ११ या स्थानत्ता (जन्मलग्न कुंडलींतला) गुरु शुभ फल देणारा असतो. १-३-६-१० या स्थानचा गुरु पूजाहोमात्मक शान्ति केल्यानें शुभ होतो. ४-८ व १२ या स्थानचा गुरु दुष्ट फल देणारा असतो. कर्क, धनु व मीन या राशींचा जर (गुरु) असून, तो जर ४-८ किंवा १२ या स्थानीं असेल तर त्याचा दोष नाहीं. अति संकट असल्यास ४ व १२ या स्थानचा गुरु दुप्पट पूजाहोमादि केल्यानें शुभ्र होतो. आठव्या स्थानचा तिप्पट पूजाहोमादिकांनीं शुभ्र होतो. अनिष्ट गुरु वामवेधानें शुभ होतो. असें जरी कांहीं ग्रन्थकार म्हणतात, तरी तें त्यांचें म्हणणें राजमार्तंड ग्रन्थकाला सम्मत नाहीं. आठव्या वर्षाच्या मुख्य कालीं जरी गुरुबल नसलें, तरी मीनस्थ रवीने युक्त अशा चैत्रांत किंवा शान्ति करुन मुंज करावी पण मुख्य कालाचा अतिक्रम करु नये; कारण तोच सर्वांत अधिक असा बलवान् काल आहे.