प्रदोष, रात्रि, अनध्याय, शनिवार, कृष्ण, गलग्रह तिथि, अपराह्ण यांचे ठिकाणी उपनयन झाले असता पुन्हा उपनयन करावे. या ठिकाणी प्रदोष म्हणजे प्रदोषाचा दिवस, कृष्ण म्हणजे एकादशीपासून शेवटच्या पांच दिवसांचा कृष्णपक्ष, अपराह्ण म्हणजे दिवसाचा तिसरा भाग असे सांगितले आहे. अनध्याय म्हणजे पौर्णिमा, प्रतिपदा इत्यादि नित्य अनध्याय हेच होत. हेच पुनरुपनयनाला कारण होतात. अकालवृष्टीमुळे त्रिरात्र अनध्याय वगैरे जे नैमित्तिक अनध्याय ते पुनरुपनयनाला कारण होत नाहीत. नैमित्तिक अनध्यायांमध्ये प्रातर्गर्जनेच्या निमित्ताने होणारा अनध्याय तोच पुनरुपनयनाला कारण होतो. या संबंधाचा विस्तार कौस्तुभ ग्रंथामध्ये आहे. खांद्यांना स्पर्श करीत बटूला आचार्याजवळ आणणे हे उपनयनाचे प्रधान कर्म आहे. ते विस्मरणाने राहिले तर पुन्हा उपनयन करावे. याप्रमाणे गायत्र्युपदेशाचे विस्मरण झाले तर पुन्हा उपनयन करावे.