पुनरुपनयन तीन प्रकारचे आहे. दोष घडल्याकारणाने प्रायश्चित्तरूप उपनयन ते पहिल्या प्रकाराचे होय. त्याचे जातकर्मादि संस्कारांसहित, त्या संस्कारांवाचून, प्रायश्चित्तपूर्वक संस्कारासहित, असे अनेक भेद आहेत. एकदा केलेल्या उपनयनामध्ये उक्तकाल इत्यादिकांचा कमीपणा असल्याने ते व्यर्थ होऊन पुनः उपनय्न करावे लागणे हा दुसरा प्रकार होय. दुसर्या इत्यादिक वेदांच्या अध्ययनासाठी पुनः उपनयन करणे तो तिसरा प्रकार होय. त्यामध्ये पहिल्या प्रकारचे पुनरुपनयन असे- इतर औषधांनी रोगाचा नाश होत नाही म्हणून स्वतःच्या बुद्धीने नव्हे तर इतरांनी सांगितल्यावरून पैष्टी सुरेच पान केले असता तीन महिनेपर्यंत कृच्छ्र आचरण करून पुन्हा उपनयन करावे. स्वबुद्धीने पैष्टीवाचून इतर सुरेचे औषधाकरिता पान केले असता कृच्छ्र व अतिकृच्छ्र प्रायश्चित्ते करुन पुन्हा उपनयन करावे. पैष्टी सुरेचे पान केले असता द्वादशाब्द प्रायश्चित्त करून पुन्हा उपनयन करावे. अज्ञानेकरून वारुणी, गौडी (गुळाची), माध्वी (मधुक पुष्पांची) सुरा प्राशन केली तर तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त घ्यावे व पुनरुपनयन करावे. अज्ञानेकरून रेत, विष्ठा, मूत्र यांचे भक्षण केले असता व सुरेपासून तयार केलेले अन्न, जल इत्यादि भक्षण केले असता तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त व पुनरुपनयन ही करावी. जाणून विष्ठा, मूत्र इत्यादिक भक्षण केल्यास चांद्रायण प्रायश्चित्त व पुनरुपनयन ही करावी. लसूण, कांदा, गाजर, विष्ठा, डुकर, गावकोंबड, मनुष्य, गाय, यांचे मांस ही भक्षण केली असता द्विजाति (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) यांनी त्या त्या दोषाबद्दल सांगितलेले प्रायश्चित्त करून नंतर पुन्हा उपनयन करावे. मेंढी, गाढवी, उंटीण, मनुष्यस्त्री यांचे दूध प्राशन केले असता; तसेच हत्तीण, घोडी यांचे दूध प्राशन केले असता तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त व पुनरुपनयन करावी. गाढव, उंट इत्यादिकांवर आरोहण केले असता कृच्छ्र प्रायश्चित्त व पुनरुपनयन करावी असे हेमाद्रीचे मत असल्याविषयी निर्णयसिंधूच्या एखाद्या प्रतीत आढळते. मिताक्षरी, स्मृत्यर्थसार इत्यादिकांमध्ये गाढव, उंट इत्यादिकांवर आरोहण केल्यास तीन दिवस उपवास मात्र करावा, पुनरुपनयन करण्यास नको असे सांगितले आहे. कौस्तुभाचा देखील आशय असाच आहे. अजाणता बैलावर आरोहण केले तर कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. जाणून बुजून केल्यास तीन कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. बैलावर आरोहण केल्यास पुनः उपनयन करावे असे कोणी म्हणतात याविषयी मूलवचन शोधावे. याप्रमाणेच मेंढा, बोकड, टोणगा यांचेवर आरोहण केले असता जाणावे. मांसभक्षक पशूची विष्ठा भक्षण केली असता पुनः उपनयन मात्र करावे. मनुष्याची विष्ठा भक्षण केली असताही पुनरुपनयन मात्र करावे असे कोणी म्हणतात. प्रेतशय्या दान स्वीकारणाराने पुन्हा उपनयन करावे. एखादा मनुष्य मरण पावला अशी वार्ता ऐकून त्याचे अन्त्यकर्म केल्यावर तो जिवंत आहे असे समजले तर त्या मनुष्याला दुधाच्या कुंभामध्ये बुडवून वर काढावे व स्नान घालावे. नंतर जातकर्मापासून पुनरुपनयनापर्यंत सर्व संस्कार करून तीन रात्र व्रत झाल्यावर पहिल्याने विवाह झालेल्या भार्येशी त्याचा विवाह लावावा. पहिली भार्या मृत झाली असेल तर दुसरा विवाह करावा. तो अग्निहोत्री असेल तर पुन्हा अग्निस्थापन, आयुष्मत इष्टि इत्यादि करावी. तीर्थयात्रेकरिता नसून अन्य कारणाने कलिंग, अंग, वंग, आंध्र, सिंधु, सौवीर आणि म्लेंछ लोकांचे सर्व देश यांमध्ये गमन केले असता पुन्हा उपनयनसंस्कार करावा. चांडालाचे अन्न अज्ञानाने भक्षण केले असता चांद्रायण प्रायश्चित्त करावे; बुद्धिपूर्वक भक्षण केले तर कृच्छ्राब्द प्रायश्चित्त करावे; आणि दोन्ही ठिकाणी पुन्हा उपनयन करावे. अजिन, मेखला, दंड, भिक्षा मागणे आणि व्रत ही द्विजातीयाचा पुनःसंस्कार असता करण्यास नकोत. अजिन, मेखला.... इत्यादिकांऐवजी वपन, मेखला..... इत्यादि प्रकारचा पाठ इतर स्मृतिग्रंथात आहे. ब्रह्मचारी असेल त्याने मद्य व मांस यांचे भक्षण केल्यास प्राजापत्य प्रायश्चित्त अथवा तीन अहोरात्र उपवास करून पुनरुपनयन करावे. जाणून भक्षण केल्यास पराक प्रायश्चित्त करून पुनरुपनयन करावे. बहुत वेळा भक्षण केले असल्यास द्विगुणित प्रायश्चित्त करून पुनरुपनयन करावे. हाताने घुसळलेले दही व पुरोडाश यांचे अभ्यासाने भक्षण केले तर कृच्छ्र प्रायश्चित्त करून पुन्हा उपनयन करावे. जो संन्यासग्रहण केल्यावर निवृत्त होऊन पुन्हा गृहस्थाश्रमात येण्याची इच्छा करील त्याने सहा महिनेपर्यंत कृच्छ्र प्रायश्चित्त करून पुन्हा जातकर्मादि संस्कार करावे. असा संस्कारयुक्त झाल्याने शुद्ध झाल्यावर गृहस्थाश्रम करावा. मरण येण्याकरिता उपवास करण्याचा संकल्प करून निवृत्त झाल्यास याप्रमाणेच करावे. कर्मनाशा नदीच्या जलाचा स्पर्श, करतोया नदीचे उल्लंघन, गंडकी नदी पोहून जाणे ही केली असता पुनरुपनयन करावे.