गुरूला क्षेत्र इत्यादिकांचे दान करून त्याची अनुज्ञा घेऊन स्नान करावे. स्नान म्हणजेच समावर्तन होय. ती दाने अशी - क्षेत्र, सुवर्ण, धेनु, अश्व, छत्री, जोडा, धान्य, तीन वस्त्रे, भाजी ही होत. यापैकी जे गुरूला प्रिय असेल ते द्यावे. दान दिल्यावाचून गुरु संतोष पावेल तर त्याची अनुज्ञा घेऊन स्नान करावे. क्षेत्र इत्यादिक दान केले तरी तेवढ्याने विद्येचे मूल्य होते असे नाही. "पृथ्वीमध्ये असे कोणतेही द्रव्य नाही की, जे दिल्याने गुरु शिष्याला जे एकेक अक्षर शिकवितो त्यापासून शिष्य अनृणी होईल" असे वचन आहे. या स्नातकाचे तीन प्रकार आहेत. विद्या-स्नातक, व्रतस्नातक आणि उभयस्नातक. एक, दोन, तीन अथवा चार वेद अथवा वेदांचे एकदेश यांचे अध्ययन करून व त्यांचा अर्थ जाणून ब्रह्मचर्याचा जो बारा वर्षाचा काल सांगितला त्याच्या अगोदर जो स्नान करितो तो विद्यास्नातक होय. उपनयनव्रत, सावित्रीव्रत आणि वेदव्रत यांचे अनुष्ठान करून वेदाची समाप्ति होण्याच्या पूर्वी स्नान करितो तो व्रतस्नातक होय. बारा वर्षे ब्रह्मचर्य पाळून वेदाध्ययनाची समाप्ति करून स्नान करितो तो विद्याव्रतोभयस्नातक होय. उपनयनानंतर मेधाजननापर्यंत तीन रात्री, बारा रात्री इत्यादि व्रत ते उपनयन व्रत. मेधाजनानंतर उपाकर्मापर्यंत ब्रह्मचारिधर्माचे अनुष्ठान करणे ते सावित्रीव्रत होय. त्यानंतर वेदाध्ययनाकरिता बारा वर्षेपर्यंत व्रत करणे ते वेदव्रत होय. 'स्वाध्यायाचे अध्ययन करावे' असे अर्थज्ञान होईपर्यंत विधिवचन आहे, याकरिता वेदार्थाचे ज्ञान झाल्यावाचून केवल वेदाध्ययनाने समावर्तनसंस्काराला अधिकार येत नाही असे पूर्वमीमांसक म्हणतात. वेदग्रहण हेच विधिफल आहे. पूर्वकांडाच्या अर्थाचे ज्ञान होणे ते कर्माच्या अनुष्ठानाकरिता आहे व उत्तर कांडाच्या अर्थाचे ज्ञान काम कर्माच्या श्रावणीय विधीने प्राप्त आहे असे उत्तर मीमांसक म्हणतात. त्यामध्ये संहिता व ब्राह्मण मिळून वेद होतो. आरण्यकाण्डाचा अंतर्भाव ब्राह्मणामध्येच होतो. संपूर्ण एका वेदाचे अध्ययन करण्यास असमर्थ असेल त्याने वेदाच्या भागाचे पठन करावे. अति असमर्थ असेल त्याने पहिले व शेवटचे सूक्त, काही सूक्तांच्या पहिल्या ऋचा अथवा सर्व सूक्तांच्या पहिल्या ऋचा यांचे अध्ययन करावे. याप्रमाणे वेदाच्या भागाचे अध्ययन होऊन समावर्तन झाल्यावर विवाहित झालेल्याने ब्रह्मचर्याचे नियम पाळून वेदाध्ययन करावे. ऋतुकाली भार्यागमन करावे. ब्रह्मचारि व्रतांचा लोप झाल्याबद्दल तीन कृच्छ्र प्रायश्चित्त करून महाव्याह्रतिमंत्राने होम करावा आणि मग समावर्तन करावे. हे प्रायश्चित्त संध्या, अग्निकार्य, भिक्षा यांचा लोप; शूद्रादिकांचा स्पर्श; कटिसूत्र, मेखला, अजिन यांचा त्याग; दिवसास झोप; काजळ; शिळ्या अन्नाचे भक्षण इत्यादि अल्प व्रतांचा अल्पकालपर्यंत भंग झाला असेल तर जाणावे. पुष्कळ धर्माचा लोप झाला असेल तर "तंवोधियानव्यस्याशविष्टं०" या मंत्राचा शिवालयामध्ये एक लक्ष जप करावा असे सांगितले आहे. याप्रमाणे महानाम्नीव्रत, ब्रह्मचर्यव्रत, यांच्याबद्दल प्रायश्चित्त केल्यानंतर समावर्तनसंस्काराला अधिकार प्राप्त होतो.