सुमंतुऋषि सांगतो - "पित्याच्या पत्नी ह्या सर्व माता होत. सापत्न मातेचे बंधु ते सर्व मातुल होत. सापत्न मातेच्या बहिणी त्या सर्व मावशा होत. सापत्न मातेच्या कन्या त्या सर्व बहिणी होत. त्या बहिणीची अपत्ये ती सर्व भागिनेय होत. असे न मानल्यास ही सर्व संकर करणारी होतील." या ठिकाणी सापत्न मातेच्या कुळामध्ये चार पुरुषांपर्यंत सापिंड्य विवाहाच्या निषेधाकरिता सांगितले आहे असे कोणी ग्रंथकार म्हणतात. हे विवाहविषयापुरतेच लागू आहे असे मानण्यास काही प्रमाण नसल्यामुळे हे आशौच इत्यादि विषयांसंबंधानेही आहे; आणि "जितक्यांचा उच्चार करून सांगितले तितकेच प्रमाण" या न्यायाने वर ज्यांची नावे सांगितली तितक्यांनाच सापिंड्य आहे असे दुसरे ग्रंथकार म्हणतात. वरील न्याय घेऊन सुमंतूच्या वाक्याची निरनिराळी वाक्ये तोडली असता अर्थ संभवतात ते असे "पित्याच्या पत्नी त्या सर्व माता होत" या पहिल्या वाक्याने सापत्न मातेला मुख्य मातेप्रमाणे मान देणे, तिचा वध केला असता मातृवधाचा दोष म्हणून प्रायश्चित्त करणे, तिच्याशी गमन केले असता मातृगमनाचा दोष म्हणून प्रायश्चित्त करणे इत्यादिकांचा अतिदेश प्राप्त होतो. या वाक्याने अतिक्रांत आशौचाविषयी दहा दिवसांच्या आशौचाचा अतिदेश होत नाही; कारण सापत्न मातेचे अतिक्रांत आशौच तीन दिवस धरावे असे विशेष वचन असल्यामुळे बाध आहे. "सापत्न मातेचे बंधु ते मातुल होत" या वाक्याने मातुलसंबंधी आशौच वगैरे आणि मातुलाला आपल्या बहिणीच्या सवतीच्या कन्येशी विवाहाचा निषेध ही प्राप्त होतात. या ठिकाणि सापत्न मातेचे बंधूंचे ठिकाणी मातुलत्वाचा अतिदेश येतो. तरी त्यांचे पुत्रांचे ठिकाणी मातुलपुत्रत्वादिकाचा अतिदेश येत नाही. म्हणून त्यासंबंधाने बंधुत्रयविशयक आशौच नाही. मातुलकन्या इत्यादिकांबरोबर विवाह करणे याविशयी विधी नाही आणि निषेधही नाही. याप्रमाणे मातुलकन्या इत्यादिकांचे ठिकाणी पित्याची मामेबहीण असा अतिदेश नसल्यामुळे त्या पुत्रासंबंधानेही पितृष्वसृत्वादिकाचा अतिदेश होत नाही. "सापत्न मातेच्या बहिणी त्या मावश्या होत" या वाक्याने आशौच आणि विवाहनिषेधही सूचित होतात. मातेच्या बहिणीच्या पुत्रांसंबंधाने बंधुत्रयत्वही नाही. सापत्न मातेच्या बहिणीचे कन्येशी विवाह करण्याचा निषेध तो विरुद्धसंबंध असल्यामुळे प्राप्त होतो. हा विरुद्धसंबंध पुढे सांगेन. "सापत्न मातेच्या कन्या त्या बहिणी होत" या वाक्याने आशौच, सन्मान ही सूचित होतात. या संबंधाने विवाहाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कारण समान गोत्र आहे. या ठिकाणी सापत्न मातुल, सापत्न बंधु, सापत्न मावशी, सापत्न बहीण इत्यादिकांचे आपल्या स्वतःचे मातुल, सोदर, बंधु, बहिणी यांचा उच्चार केल्यानंतर तर्पण करणे व महालय इत्यादि श्राद्धांत उच्चार करणे हे या वचनावरूनच आवश्यक आहे असे वाटते. "सापत्न बहिणीच्या कन्या त्या भागिनेयी होत" या वाक्याने आशौच, विवाहनिषेध ही प्राप्त होतात. भागिनेयित्वाचा जरी अतिदेश आहे तरी त्यांच्या कन्यांचे ठिकाणी भागिनेयीकन्यात्वाचा अतिदेश होत नाही. कारण "जितके स्पष्ट सांगितले असेल तितकेच प्रमाण होय" असा न्याय आहे. याप्रमाणे दिग्दर्शन केले.
काही ठिकाणी सापिंड्य नसले तथापि विशेष वचन आहे म्हणून विवाह होत नाही. "जिच्याशी विरुद्ध संबंध नाही ती वरावी" असे वचन आहे. ज्या वधुवरांचा विवाह व्हावयाचा त्यांचा परस्परांमध्ये मातृत्वाचा अथवा पितृत्वाचा संबंध असणे याचे नाव विरुद्धसंबंध. उदाहरण "आपल्या भार्येच्या बहिणीची कन्या आणि चुलत्याचे भार्येची बहीण" असे परिशिष्टात सांगितले आहे. बौधायन म्हणतो- सापत्न मातेची बहीण व सापत्न मातेच्या बहिणीची कन्या या वर्ज्य कराव्या." ज्येष्ठ भ्राता पित्यासमान आहे असे वचन असल्यामुळे ज्येष्ठ भ्रात्याचे पत्नीची बहीण मावशीप्रमाणे होते करिता तिच्याशी विवाह करू नये असे कोणी ग्रंथाकर म्हणतात. यवीयसी म्हणजे आपल्याहून वयाने व शरीराने कमी असेल ती वरावी. तसेच असमानार्षगोत्रजा म्हणजे आपल्याशी समान असे गोत्र अथवा प्रवर ज्याचे नाहीत अशा कुलामध्ये उत्पन्न झालेली वरावी, म्हणजे असमानगोत्रा व असमानप्रवरा अशी वरावी हा अर्थ होय.