आतुर अवस्थेमध्ये यथाविधि समावर्तनाचा असंभव असेल तर संक्षेपाने समावर्तन करावे. त्याचा प्रयोग संकल्प करून ब्रह्मचारित्वाची चिन्हे जी मेकला वगैरे ती टाकून वपन करून तीर्थामध्ये स्नान करावे. वस्त्रधारण, आचमन, तिलकधारण ही करून अग्नीची स्थापना करावी. त्या अग्नीमध्ये प्रजापतीचे मनाने ध्यान करीत मंत्ररहित समिध द्यावी. इतर कर्मही विरुद्ध नसेल ते मंत्ररहितच करावे. याप्रमाणे समावर्तनाचा गौणपक्ष सांगितला.
ब्रह्मचर्यावस्थेमध्ये दहा दिवस आशौच धरण्याला योग्य असा सपिंड मृत झाला असेल तर समावर्तनानंतर त्याला उदक देऊन तीन दिवसपर्यंत अतिक्रांत आशौच धरावे. उपनयन न झालेला सपिंड अथवा मातुल इत्यादिक मृत झाले असतील तर अतिक्रांत आशौच धरण्यास नको. याप्रमाणे जननाशौचासंबंधानेही अतिक्रांत आशौच नाही. याप्रमाणे दहा दिवसापर्यंत आशौच धरण्याला योग्य असा सपिंड मृत झाला असेल तर समावर्तनानंतर तीन दिवसपर्यंत विवाह करू नये. कोणीही मरण पावला नसेल तर विवाह करण्यास हरकत नाही.
अनंतोपाध्यांचा पुत्र मी याने याप्रमाने व्रतांपर्यंत सर्व कर्माचा निर्णय सांगून केलेला वाग्विलास श्रीविठ्ठलाचे चरणी अर्पण केला आहे.