या कार्याला द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्ठी, एकादशी व द्वादशी या तिथि योग्य होत. सप्तमी, त्रयोदशी व कृष्णप्रतिपदा या तिथीसुद्धां क्वचित् ग्रंथांत जरी सांगितल्या आहेत, तरी त्या पुनरुपनयनाला व मुका (कुमार अथवा कुमारी) यांच्या संबंधानें घ्याव्या. सोमपदा तिथि अनध्याय, गलग्रह व अपराह्न--यांवर जर उपनयन झालें, तर तो संस्कार पुन्हा करावा. पौर्णिमा, चतुर्दशी, अष्टमी, अमावास्या, प्रतिपदा, सूर्यसंक्रान्ति मन्वादि, युगादि कार्तिक, आषाढ व फाल्गुन या महिन्यांतल्या कृष्णपक्षींच्या (तीन) द्वितीया, तुला व मेष या संक्रान्तीच्या पक्षिणी (बारा प्रहर) हीं सर्व अनध्यान असल्याचें पहिल्या परिच्छेदांत सांगितलेंच आहे. सोमपदा व अनध्याय या तिथि जर दोन दिवस सूर्यास्तानंतर व सूर्यास्ताच्या पूर्वीं तीन मुहूर्त असतील, तर दोन्ही दिवस अनध्याय होय. एक दोन घटका जरी प्रतिपदा शिल्लक असली तरी शिष्टलोक तो अनध्यायच मानतात. तुला व मेष या संक्रान्तींशिवाय इतर संक्रान्ति आणि युगादि, मन्वादि यांच्यासंबंधानें पहिल्या व दुसर्या परिच्छेदांत सांगितल्याप्रमाणें, ज्या दिवशीं संक्रान्तीचा पुण्यकाल किंवा युगादि मन्वादि यांचा श्राद्धकाल असेल,त्याच दिवशीं अनध्याय समजावा. सूर्यास्ताच्या आधीं तीन घटका संक्रान्ति अथवा युगादि जरी असतील, तरी तेवढयानें कांहीं अनध्याय होत नाहीं. त्रयोदश्यादि चार तिथि, असतील, तरी तेवढयानें कांहीं अनध्याय होत नाहीं. त्रयोदश्यादि चार तिथि, आणि सप्तमी, अष्टमी, नवमी आणि चतुर्थी--या गलग्रहतिथि होत. येथें चतुर्थी व नवमी या (दोन) तिथि उपनयनाला त्याज्य होत असे वाटतें. चतुर्थीसह पंचमीला कित्येक (लोक) जे व्रतबंध (मुज) करीत नाहींत, त्याबद्दल मूळवचन पाहिलें पाहिजे. नवमीशेष अशा दशमीला मुंज न करण्याबद्दल मयूखांत (सांगितलें) आहे. दिवसाचे तीन भाग करुन, त्यांतला तिसरा जो अपराह्नकाल मयूखांत (सांगितलें) आहे. दिवसाचे तीन भाग करुन, त्यांतला तिसरा जो अपराह्नकाल ते व्रतबन्धाला वर्ज्य समजावा, दुसरा मध्यम होय आणि पहिला मुख्य (योग्य) होय. मन्वादि व युगादि तिथि (कोणत्या तें) दुसर्या परिच्छेदांत सांगितलें आहे, त्यावरुन चैत्र शुद्ध तृतीया ही जी मन्वादि तिथि व वैशाख शुद्ध तृतीया ही जी युगादितिथि त्या दोहींवरच काय तो उपनयनाचा संभव येतो. या दोन्ही तिथि मौंजीबन्धनाला अपवादक असल्याचें, निर्णयसिन्धु, कौस्तुभ वगैरे ग्रन्थांत म्हटलें आहे. चैत्र शुद्ध तृतीया, वैशाख शुद्ध तृतीया, माघसप्तमी आणि फाल्गुन वद्य द्वितीया या तिथि मुनिवर्य भरद्वाजांनीं उपनयनाला योग्य असल्याचें सांगितलें आहे. या ठिकाणीं माघी सप्तमी व मन्वादि यांचा जो अपवाद सांगितला आहे, तो पुनरुपनयनाबद्दलचा आहे. फाल्गुन कृष्ण द्वितीयेला चातुर्मासासंबंधींच्या द्वितीयेनें जें अनध्यायत्व प्राप्त होतें, त्याबद्दलचा हा अपवाद समजावा. अनध्यायाच्या आदल्या दिवशीं आणि पुढच्या दिवशीं व्रतारंभ (येथें उपनयन), व्रतविसर्जन आणि विद्यारंभ हीं करुं नयेत, असें जें दुसरें स्मृतिवचन आहे, तें द्वितीयेच्या असंभवामुळें आणि गलग्रहतिथीच्या योगानें प्राप्त झालेला जो सप्तमी, नवमी व त्रयोदशी यांचा निषेध, त्याचें अनुवादन करणारें आहे असें वाटतें; कारण, हा जर अप्राप्ताचा निषेध मानावा तर मन्वादि, युगादि, संक्रान्ति वगैरे तिथींच्या आधींचा व पुढचा दिवस हेही निषेधांतच येतील ही इष्टापत्तिही नव्हे; कारण शिष्टाचारग्रन्थांत याची उपलब्धि नाहीं. मुहूर्तमार्तण्ड ग्रंथांतल्या वचनावरुन माघ शुद्ध व वद्य द्वितीया आणि वैशाख वद्य द्वितीया या तीन तिथि उपनयनाविषयींच्या अनध्यायाच्या जरी सांगितल्या आहेत, तरी इतर ग्रन्थकार हे अनध्याय मानीत नाहींत. याचें कारण असें कीं, त्याला पुष्कळ ग्रंथांत आधार नाहीं. मुहूर्तचिन्तामणि वगैरे ग्रंथांतल्या मौंजीप्रकरणांत, हे अनध्याय असल्याचें कोठेंही सांगितलेलें नाहीं; म्हणून, मुहूर्तमार्तण्ड ग्रंथांत जे अतिरिक्त अनध्याय सांगितले आहेत, ते मौंजीविषयीं नसून, उपनयनादिकांच्या अभ्यासाविषयींचे आहेत असें (मानणें) मला योग्य दिसतें. त्यांत जर तृतीया, षष्ठी व द्वादशी या तिथींना प्रदोष असेल, तर मुंज करुं नये. रात्रीच्या पहिल्या प्रहरीं चतुर्थी; दीडप्रहरांत सप्तमी आणि दोन प्रहरांत त्रयोदशी यांप्रमाणें अनुक्रमें असल्यास प्रदोष होतो. पहिल्या प्रहरांत दोन दिवस जर चतुर्थीची व्याप्ति असेल, तर पहिल्या दिवशीं प्रदोष समजावा, दुसर्या दिवशीं मानूं नये, असें कौस्तुभांत सांगितलें आहे. प्रदोषाच्या दिवशीं, शनिवारीं व कृष्णपक्षांतल्या अखेरच्या पांच दिवसांत जर उपनयन केलें (असेल) तर तें पुन्हां करावें, असें मयूखांत सांगितलें आहे. (उपनयन म्हणजे गुरुजवळ विद्या शिकायला जाणें) . याप्रमाणें नित्याचे अनध्याय होत.