मेधाजननच्या पूर्वकालि होणारे अग्निकार्य झाल्यावाचून जर उपनयनाचे अग्नीचा नाश झाला तर कटिसूत्र धारण इत्यादि बटूचे संस्कार, अवक्षारण, अग्निकार्य, गायत्रीचा उपदेश यावाचून पूर्वोत्तरतंत्रसहित अशा उपनयनाचे आहुतींनी अग्नि उत्पन्न करून त्या अग्नीवर अनुप्रवचनीय होमाच्या पूर्वीचे अग्निकार्य करून नंतर अनुप्रवचनीय होम करावा. नंतर मेधाजननाच्या अगोदर करावयाचे अग्निकार्य करून मेधाजनन करावे असे कौस्तुभ ग्रंथात प्रतिपादन केले आहे.
"नष्टस्योपनयनाग्नेः पुनरुत्पत्तिहोमे विनियोगः"
असा विशेष सांगितला आहे. माझ्या मते उपनयनाच्या आहुतींनी अग्नि उत्पन करून त्या अग्नीवर मेधाजननाच्या अगोदर अग्निकार्ये करून मग मेधाजनन करावे; अनुप्रवचनीय होमाच्या अगोदरचे अग्निकार्य व अनुप्रवचनीय होम ही करू नयेत असे वाटते. गायत्रीचा उपदेश, अनुप्रवचनीय होम व मेधाजनन ही तीन समप्रधान भावाने अध्ययनाची अंगे आहेत, करिता अग्नि या तीन प्रधान कर्मांचे अंग आहे म्हणून कौस्तुभात सांगितलेल्या रीतीप्रमाणे गायत्रीचा उपदेश व तत्पूर्वी होणारे अग्निकार्य यांच्या आवृत्तीच्या अभावाप्रमाणेच अनुप्रवचनीय होम व तत्पूर्वी होणारे अग्निकार्य यांच्याही आवृत्तीचा अभाव करणे उचित दिसते. अग्निष्टोमाची अंगे जे तीन पशुयाग त्यांचे अंगभूत जो यूप तो दोन पशुयाग झाल्यानंतर नष्ट होईल तर तृतीय पशुयागाकरिता यूप तयार करण्याकरिता दुसरा पशुयाग पुन्हा करावा लागत नाही. याविषयी सज्जनांनी सदसद्विचार करून काय करणे ते करावे. संध्याकाळी व अग्निकार्य ही केल्यावर बटूने अनुप्रवचनीय होम करावा. बटु अशक्त असल्यास चरुश्रपणापर्यंत कर्म दुसर्याने करावे. होम मात्र बटुनेच करावा. होम करून शिल्लक राहिलेल्या चरूने तीन पर्यंत ब्राह्मणांना भोजन द्यावे.