उपनयनादि मंगलकार्यांत प्रथम ग्रहयज्ञ (ग्रहमख) करावा. श्राद्धादिकांखेरीज करुन शान्ति वगैरे जीं मंगलकार्यें त्यांतसुद्धां ग्रहांचि अनुकूलता इच्छिणार्यांनीं ग्रहयज्ञ करावा. शान्ति करण्यास योग्य असे उत्पात झाल्यास त्यांतील ग्रहयज्ञ हें जरी मुख्य कर्म नाहीं, तरी अरिष्टाचा नाश व्हावा म्हणून ग्रहयज्ञ करावा. हा ग्रहयज्ञ मुख्य कर्माच्या आधीं थोडा वेळ किंवा पुष्कळ काळापूर्वी करावा. हा बराच काळ जर पूर्वीं करणें असेल, तर याचें (मुख्य कर्मांत) सात दिवसांपेक्षां अधिक अंतर असूं नये. प्रत्येक ग्रहाच्या आहुतींची संख्या जर दहाच देणें असेल, तर एकच ऋत्विज असावा. दहापेक्षां जास्त आणि पन्नासांहून कमी आहुति देणें असल्यास चार ऋत्विज असावेत. पन्नासांच्या पुढें पण शंभराया आंत आहुति देणें असल्यास आठ ऋत्विज व एक आचार्य असे असावेत. अशा वेळीं आचार्यानें आपलें आचार्यकर्म करुन सूर्याआ होम करावा. चन्द्रादि (सोम) आठ ग्रहांचे होम आठ ऋत्विजांनीं करावे. चारच ऋत्विज असल्यास दोन ग्रहांचा होम एकेकानें करावा व आचार्यानें सूर्याचा करावा. सूर्याची तांब्याची, चन्द्राची स्फटिकाची, मंगळाची रक्तचन्दनाची, बुधाची सोन्याची, गुरुची सोन्याची, शुक्राची रुप्याची, शनीची लोखण्डाची, राहूची शिशाची आणि केतूची कांश्याची. अशा प्रतिमा कराव्या किंवा सर्वच ग्रहांच्या सोन्याच्याच प्रतिमा कराव्या; किंवा सर्व ग्रहांच्या नांवांनीं फळें अथवा तांदूळांचे पुंजके मांडून त्यांची आदित्यादि ग्रह म्हणून पूजा करावी. होमाहुतींच्या संख्येप्रमाणें कुण्ड किंवा स्थण्डिल (मातीचा चौकोनी सपाट ओटा) व ग्रहांची वेदी (यज्ञकुण्ड) यांची रचना हस्तादि प्रमाणांवरुन करावी. मुख्य आणि अङ्गदेवतांच्या मिळून पन्नासांच्या आंत जर आहुति असतील, तर एक रत्निपरिमित कुंड करावें. (आहुति जर पन्नासांच्या पुढें व ) शंभरांच्या आंत असतील तर (कुंड) अरत्निपरिमित करावें. (आहुति) हजारांच्या आंत असल्यास हस्तपरिमित (कुण्ड) करावें. दहा हजारांपर्यंत (आहुति) असल्यास दोन हातांचें परिमित (कुण्ड) करावें. एक लक्षपर्यंत (आहुति) असल्यास चार हातांचें परिमित (कुण्ड) करावें. मूठ वळलेला (मोंढा) हात म्हणजे रत्नि व मूठ मिटून फक्त करंगळी तेवढी उघडलेली ठेवून तिच्या लांबीपर्यंतचा जो हात तो अरत्नि. चोवीस अंगुळांचा एक हात, एक यव कमी अशीं चौतीस अंगुळें म्हणजे दोन हात, व अठ्ठेचाळीस अंगुलांचे चार हात. कुंडांतली मेखला, योनी, नाभी व खोली वगैरेंचें प्रमाण कसें असावें तें इतर ग्रंथांत पहावें. सर्व ठिकानीं कुण्डाचें प्रमाण असेंच समजावें. समिधा, चरु व घृत यांना द्रव्यें म्हणतात. रुई, पळस, खैर, अपामार्ग (आघाडा), पिंपळ, उंबर, शमी, दूर्वा आणि दर्भ या अनुक्रमें सूर्यादि ग्रहांच्या समिधा होत. यांत तिळही घेण्यास कोणी ग्रन्थकार सांगतात. सूर्यादि मुख्य देवतांच्या होमाहुतींच्या संख्येच्या दशांशानें अधिदेवता व प्रत्यधिदेवता यांचा होम करावा. शान्तींत करण्याचा जो ग्रहयज्ञ, त्यांत बलिदान करतात. इतर ग्रहयज्ञांत (मखांत) बलिदान करीत नाहींत. मुख्य अशी एकच आहुति असतांना एकाच ब्राह्मनाला भोजन देणें श्रेष्ठ होय. शंभर (मुख्य) आहुतींच्या प्रसंगीं एकाच ब्राह्मणाला भोजन देणें मध्यम होय. हजार (मुख्य) आहुतींच्या प्रसंगीं एकाच ब्राह्मणाला भोजन देणें अधम होय. याबद्दलचें सविस्तर प्रयोगादि इतर ग्रन्थांत पहावें. असा हा ग्रहयज्ञ होय.