या परिच्छेदाचे उत्तरार्धांत श्राद्धादिकांचा निर्णय सांगणें आहे. त्यासाठीं अधिकाराचा निर्णय सांगितला पाहिजे, म्हणून जीवपितृकाचे अधिकाराचा विचार करितों. "जीवपितृकानें ज्येष्ठ भ्राता जिवंत असतां पादुका उत्तरीय रजनीमध्यें रौप्य धारण करुं नयेत." येथें पादुका शब्दानें काष्ठमय पादुका समजाव्यात. उत्तरीय म्हणजे ग्रंथियुक्त वाटोळें वस्त्र किंवा दोन इत्यादि अंगुलें रुंदीचें सुताचे केलेलें असें वाटाळें तें किंवा उत्तरीय स्थानापन्न असें स्मृतिवाक्यानें तिसरें यज्ञोपवीत जीवपितृकांनीं व ज्याचा ज्येष्ठ भ्राता जिंवत असेल त्यानें धारण करुं नये. प्रावरण रुप असलेलें दुसरें वस्त्र जीवपितृकादि सर्वांनीं धारण करावें; कारण एक वस्त्र असतां भोजन व देवपूजन करुं नये. इत्यादि वचनानें सर्व कर्मांमध्यें एक वस्त्रत्वाचा निषेध आहे. पिता, पितामह व ज्येष्ठ भ्राता हे जिवंत असून आधान केलेले नसतील तर पुत्र, पौत्र व कनिष्ठ भ्राता यांनीं आधान करुं नये. ज्येष्ठ भ्राता अविवाहित असतां कनिष्ठ भ्रात्यानें विवाह करुं नये. याविषयीं विशेष निर्णय पूर्वार्धांत सांगितला आहे. याचप्रमाणें पिता इत्यादिक जिवंत असूनही त्यांनीं सोमयाग केलेला नसेल तर पुत्रादिकांस सोमयाग करण्यास अधिकार नाहीं. तसेंच पूर्णमासेष्टी, दर्शेष्टी व अग्निहोत्र होम हे पिता इत्यादिकांनीं आरंभिले नसल्यास तर पुत्रादिकांस तें करण्याचा अधिकार नाहीं. सन्यासाविषयीं असाच निर्णय जाणावा. सोदर कनिष्ठासच दोष आहे भिन्नोदरभ्रात्यास दोष नाहीं. पिता इत्यादिकांची आज्ञा असल्यास पुत्रादिकांस दोष नाहीं, असें कित्येक ग्रंथकार म्हणतात. अधिकारी पिता असेल तर आज्ञा असतांहि दोष आहे. पातित्य, जात्यंधत्व, इत्यादि दोषांमुळें पिता अनधिकारी असल्यास आज्ञेंकरुन दोष नाहीं. पातित्यादिक असतां आज्ञा नसेल तरी दोष नाहीं, असें दुसरे ग्रंथकार म्हणतात. याचप्रमाणें पित्याचीं कृत्यें जीं दर्शादि श्राद्ध, तर्पण व पैतृक दान यास जीवपितृकास अधिकार नाहीं. याविषयीं विशेष निर्णय आपल्या अपत्याचा संस्कार व आपला दुसरा विवाह इत्यादि निमित्तिक नांदी श्राद्ध, चातुमार्स्यांतर्गत पितृयज्ञ व सोमयागाचें अंग जें तृतीय सवन त्यांत असलेल्या पितृयज्ञाविषयीं जीवपितृकांस अधिकार नाहीं. पिंडतृप्तीयज्ञामध्यें होमापर्यंत पिंडतृप्तीयज्ञ करावा किंवा आरंभ करुं नये, असे पिंडतृप्तीयज्ञाचे दोन पक्ष आहेत. पित्याचे पिता इत्यादिकांस उद्देशून पिंडदान करावें, असा एक तिसरा पक्ष कित्येक ग्रंथांत आहे. याप्रमाणें अष्टकादिक विकृतीविषयींही तीन पक्ष आहेत. प्रसंगवशात् गयेस गेले असतां पुत्रानें मातेचें श्राद्ध करावें. जीवपितृकानें मातेच्या श्राद्धाच्या उद्देशानें गयेस जाऊं नये. सर्व महा नद्या व तीर्थें प्राप्त झालीं असतां जीवत्पितृकानें पित्याचें पिता, माता, इत्यादिकांस उद्देशून श्राद्ध करावें. नवमीस अन्वष्टाका श्राद्ध, क्षयतिथीचे दिवशीं मातेचें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हीं जीवत्पितृकानें सपिंडकच करावीं. पिता सन्यासी किंवा पतित असून जिंवत असतांहि दर्शश्राद्ध, महालय, संक्रांती, ग्रहण, इत्यादि सर्व श्राद्धें पित्याचे पिता, माता इत्यादिकांस उद्देशून जीवपितृकानें करावींत. हीं श्राद्धें सांकल्पिक विधीनें पिंडरहित करावींत. कारण अन्वष्टक्य इत्यादि श्राद्धांत पिंडदानाविषयीं जसें वचन आहे, तसें या श्राद्धांत पिंडदानाविषयीं विशेष वचन नाहीं.