पात्रांमध्ये सुवर्णाचे, रुप्याचे, तांब्याचे किंवा काष्ठाचे किंवा पळस इत्यादिकांचे पानांचा द्रोण किंवा कांस्यपात्र, शंख, शुक्ति किंवा गेंड्याच्या शिंगाचे पात्र ही अर्घ्यपात्रे प्रशस्त होत. एक अथवा दोन किंव ४ ब्राह्मण असले तर देवाकडे अर्घ्यपात्रे दोनच मांडावी. दैवकर्माकडे दोन अर्घ्यपात्रे, पित्र्यकर्माकडे तीन अथवा दोहोंकडे एकेक पात्र असावे. एक पात्रत्वाचा पक्ष अशक्तिविषयक आहे. याप्रमाणे प्रोक्षण केलेल्या भूमीवर पूर्वेस अग्रे होतील असे दर्भ घालून त्याजवर उपडी अथवा उताणी दोन पात्रे ठेवून प्रोक्षण करावे. उपडी असल्यास उताणी करून त्या दोन पात्रांवर दोन दोन दर्भाचे एक याप्रमाणे २-२ पवित्रे ठेवून 'शन्नोदेवी०' यामंत्रावृत्तीने त्या पात्रात उदक घालावे. व 'यवोसि' या मंत्रावृतीने यव घालून मंत्रविरहित गंधपुष्पे टाकावी. कोणी 'गंधद्वारा० ओषधीः प्रतिमोदध्वं; या दोन ऋचांनी गंधपुष्पे घालतात. नंतर 'देवार्घ्यपात्रे संपन्ने' असे म्हणून 'सुसंपन्ने' असे ब्राह्मणांनी म्हटल्यावर कर्त्याने आपला डावा हात ब्राह्मणाच्या उजव्या गुडघ्यावर ठेवावा व 'अमुक विश्वान्देवान्भवत्स्वावाहइष्ये' असा प्रश्न करून 'आवाहय' अशी ब्राह्मणांनी आज्ञा दिल्यावर 'विश्वेदेवास आगत०' या ऋचेने प्रत्येक ब्राह्मणाचे उजवे पायापासून आरंभ करून युग्मक्रमाने जानू, अंस मस्तकापर्यंत यव टाकावेत; नंतर 'विश्वेदेवाः श्रुणुत' या ऋचेने उपस्थान करून शेष राहिलेले यव भूमीवर टाकावे. हिरण्यकेशी आदिक तर अर्घ्यदान गंधादि पूजा केल्यावर अग्नौकरणकाली 'येदेवास' हा मंत्र व 'आयातपितर' या दोन मंत्रांनी अग्नीचे दक्षिण प्रदेशी देव व पितर यांचे आवाहन करितात. कातियांनी तर अर्घ्यपात्रे स्थापन करण्यापूर्वीच देवपितरांचे आवाहन करावे. कारण कात्यायनसूत्र तसेच आहे. यावर ब्राह्मणांकडून अर्घ्यपात्रसंपत्ति वदवुन 'स्वाहा अर्घ्यः' असे म्हणून ब्राह्मणाचे अग्रभागी अर्घ्यपात्रे मांडावी. यावर ब्राह्मणाच्या हातावर उदक देऊन अर्घ्यपात्रातील पवित्रके हस्तावर द्यावी व 'यदिव्या' या मंत्राने हातावर अर्घ्य देऊन 'विश्वेदेवा इदंवोर्घ्योस्वाहानमः' असे म्हणावे. प्रत्येक ब्राह्मणाला अर्घ्य देताना 'यदिव्या' या मंत्राची आवृत्ति करावी. 'यदिव्या' या मंत्राने दिलेल्या अर्घ्याचे अनुमंत्रण करावे असे काही ग्रंथकार म्हणतात. मयूखात, कातीय प्रयोगात ब्राह्मणाच्या हातावर अर्घ्यावरची पवित्रके दिल्यावर आवाहनासारखे अंगाचे ठायी अर्चन करू अर्घ्यदान करावे असे सांगितले आहे. एकच ब्राह्मण असेल तर एकाच्या हातावर दोन वेळ अर्घ्य द्यावे. ४ ब्राह्मणांचा पक्ष असेल तर एकेक पात्र वाटून दोन दोन ब्राह्मणास द्यावे. कूर्च तर त्या त्या पात्रावरचाच ग्रहण करावा.
कित्येक ग्रंथात दूध, दही, घृत, तिळ, तांदूळ, शिरस, कुशाग्रे व पुष्पे अशी आठ द्रव्ये अर्घ्यपात्रात टाकावी असे म्हटले आहे. प्रत्येक उपचाराच्या आद्यंती उदक देऊन गंधादि उपचारांनी पूजा करावी. 'अमुक विश्वेदेवा अंयवोगंधः स्वाहानमः' या वाक्याने हाताने ब्राह्मणाच्या हातावर दोन दोन वेळ गंध द्यावे. याप्रमाणे सर्वत्र देवांकडे 'स्वाहानमः' येथपर्यंत उच्चार करून उपचार द्यावेत. चंदन, अगुरु, कापूर व केशर हे पदार्थ अर्पण करावेत. 'गंधद्वारा' या मंत्राने गंध व 'आयनेते' या मंत्राने पुष्प, 'धूरसि' या मंत्राने धूप, 'उद्दीपस्य' या मंत्राने दीप, 'युवं वस्त्राणि' या मंत्राने वस्त्र प्रयत्नाने द्यावे. आसनाविषयी ब्राह्मणांनी 'स्वासनं' असे व अर्घ्याविषयी 'अस्वर्घ्य' असे म्हणावे. गंधादिकांविषयी 'सुगंधः सुपुष्पाणि, सुमाल्यानि, सुधूपकः सुज्योतिः अथवा 'सुदीपः' व 'स्वाच्छादनं' याप्रमाणे क्रम जाणावा. कर्त्याने स्कंधावर उत्तरीय वस्त्र धारण करून हातातील पवित्रक काढावे व ब्राह्मणाच्या हातावर दिलेल्या गंधाने ब्राह्मणाचे कपाळ इत्यादि अंगास उटी द्यावी. ब्राह्मणाच्या कपाळी वाटोळा पुंड्र किंवा त्रिपुंड्र करू नये. गंधलेपन करताना ब्राह्मणांस कस्तुरी विकल्पित आहे. 'आयनेते' या मंत्राने अथवा 'ओषधीः प्रतिमोदध्वं' या मंत्राने गंधदानासारखे हातावरच, 'इदंवः पुष्पं' असे म्हणून पुष्पदान करावे.