जरी अविभक्त अथवा संसृष्ट अशा भ्रात्यासच धनग्रहणाचा अधिकार असला तरी क्रिया करण्याचा अधिकार स्त्रीसच आहे. भ्राता विभक्त व असंसृष्ट असेल तर धनग्रहणाचाही अधिकार स्त्रीसच आहे. पत्नी नसेल तर विभक्त व असंसृष्ट असा जो मृत त्याची कन्या हीच पिंड देनारी व धन घेणारी आहे. त्या कन्यापैकीं, विवाहित कन्याच पिंड देणारी आहे. धन घेण्यास अविवाहित कन्याही अधिकारी आहेत. कन्या नसल्यास कन्येचा पुत्र धन घेणारा व पिंड देणारा होतो. कन्येचा पुत्र नसेल तर भ्राता; भ्राता नसेल तर भ्रात्याचा पुत्र अधिकारी होय. अविभक्त व संसृष्ट याची पत्नी नसेल तर भ्राता अधिकारी होय. संसृष्ट म्हणजे पूर्वी विभक्त होऊन पुनः आपले धन भ्रात्याच्या धनांत मिळवून एका स्वैंपाकादिकानें उपजीविका करणारे ते. त्यांत सोदर (सखा) व असोदर असें असतील तर सख्खा भ्राताच अधिकारी ; त्यांतही ज्येष्ठ भ्राता व कनिष्ठ भ्राता असे असतील तर कनिष्ठच अधिकारी. कनिष्ठ भ्राता नसेल तर ज्येष्ठ भ्राताच अधिकारी. कनिष्ठ भ्राते बहुत असतील तर मृत भ्रात्याहून जो कनिष्ठ तोच अधिकारी; तो नसल्यास त्याच्या पुढचे अधिकारी होत. याप्रमाणें ज्येष्ठ भ्राते बहुत असतील तर मृताच्या अनंतर जो, त्याच्या क्रमानेंच अधिकारी जाणावेत. सोदर भ्राता नसेल तर सापत्न भ्राता अधिकारी; सापत्न भ्रात्यामध्येंही ज्येष्ठत्वादिकाचा निर्णय पूर्वीप्रमाणेंच जाणावा. कित्येक ग्रंथकारांच्या मतानें कन्या व कन्यापुत्र हे जरी धनग्रहणास अधिकारी असेल तरी विभक्त असून असंसृष्ट अशा भ्रात्याचें दहनादिक भ्रात्यानेंच करावें. कारण सगोत्रि असतां भिन्न गोत्रीयांस त्या कर्माचा अधिकार नाहीं. भ्राता नसेल तर भ्रातृपुत्र व त्यांतही सोदर भ्रात्याचा पुत्र मुख्य होय. तो नसेल तर सापत्न भ्रातृपुत्र; त्याच्या अभावीं पिता; पित्याच्या अभावीं माता; मातेच्या अभावीं स्नुषा; स्नुषेच्या अभावीं भगिनी, त्यांतही अनुजा अग्रज, सोदर, असोदर अशा बहुत भगिनी असतील तर भ्रात्याप्रमाणें त्यांचा निर्णय जाणावा. भगिनी नसल्यास भगिनीपुत्र; भगिनीपुत्र बहुत असतील तर त्यांचा निर्णयही भ्रात्याप्रमाणेंच जाणावा. भगिनीपुत्र नसल्यास पितृव्य, पितृव्य पुत्रादिक सपिंड अधिकारी जाणावे. सपिंड नसल्यास सोदक; सोदक नसतील तर गोत्रज; गोत्रज नसल्यास मातामह, मातुल, मातुलपुत्र इत्यादि मातृसपिंड अनुक्रमानें अधिकारी होताता. मातृसपिंडांतील नसल्यास आपले आतेभाऊ व मावसभाऊ; ते नसतील तर पित्याचे आतेबंधु, मावसबंधु व मामेबंधुरुप पितृबंधु, याप्रमाणें पितृबंधु नसतां मातेचे पितृष्वस्त्रादि पुत्ररुप मातृबंधु अधिकारी होतात. ते नसतील तर शिष्य; शिष्य नसल्यास जामाता श्वशुराचा व श्वशुर जामात्याचा, अधिकारी होय. जामाता नसेल तर सखा अधिकारी; व सखा नसेल तर ब्राह्मनाचा कोणीएक धनहारी जाणावा. ब्राह्मणाहून इतर असल्यास राजानें त्याचें धन घेऊन त्या द्रव्यानें दुसर्याकडून कर्म करवावें, अथवा मरणोन्मुख अशा विप्रादिकांनीं धर्मपुत्र करावा.