श्राद्धाच्या आरंभी दोनदा आचमन करावे. ब्राह्मणाचे पाय प्रक्षालन केल्यावर आपले पाय प्रक्षालन करून दोनदा आचमन करावे, व देवांची पूजा केल्यावर आणि पितरांची पूजा केल्यावर एकेक आचमन करावे. अवघ्राणानंतर एक आचमन विकिर दिल्यानंतर एकवेळ किंवा दोन वेळ आचमन व श्राद्धाच्या अंती आपले पाय प्रक्षालन केल्यावर दोनदा आचमन करावे. कित्येक ग्रंथकारांच्या मते भस्ममर्यादा घातल्यावर, करशुद्धि केल्यावर व उच्छिष्ट चालन केल्यावर एकेक आचमन करावे असे आहे.
भोक्त्याने पादप्रक्षालनानंतर दोनदा आचमन, पाणीहोम म्हणजे हस्तावर अग्नौकरण झाल्यावर एकदा आचमन व भोजनांती दोनदा आचमन करावे.