कर्दय इत्यादिकांचे अन्न नित्य भोजन व श्राद्धकर्म यांस घेऊ नये. ते असे - कदर्य, चोर, नट, वीणावाद्यावर किंवा व्याजावर उपजीविका करणारा; लोकापवादाने दूषित झालेला, गणिका, वैद्य, क्रुद्ध, जारिणी, मत्त, क्रूर, शत्रु, पतित, दांभिक पती व पुत्ररहित स्त्री, सोनार, स्त्रीजित, ग्रामोपाध्याय, घातुक, कर्मार (शिल्पी), कोष्टी, कृतघ्न, वस्त्रक्षालनावर उपजीविका करणारा (रजक), स्त्रीपासून उपजीविका करणारा, सोमविक्रयी, चितारी, गायक इत्यादिक हे त्रैवर्णिक जरी असतील तरी त्यांचेपासून अन्न घेऊ नये. आत्मा,धर्मकृत्य, पुत्र, स्त्रिया व मातापितर यांना जो लोभामुळे पीडा देतो तो कदर्य होय. ब्रह्मचारी व गृहस्थाश्रमी हे दोनच आश्रमी भोज्यान्न होत. वानप्रस्थ, संन्याशी व लिंगी हे भोज्यान्न नाहीत. जो द्विज सहा महिनेपर्यंत शूद्राचे अन्न भक्षण करितो, तो जिवंतपणी शूद्र होत्साता मेल्यावर कुत्र्याचे योनीस जातो. इतर पदार्थ मोठ्या निबंधात पुष्कळ निषिद्ध केलेले आहेत. ते विहित पदार्थांच्या उक्तीवरून निषिद्ध होत. हे अर्थसिद्ध असल्यामुळे व ते अप्रसिद्ध असल्यामुळे येथे सांगितले नाहीत. दुर्गंधयुक्त, केसयुक्त, खारे, चिखलाचे डबक्यातील व ज्याने गाईची तृषा हरण होत नाही ते आणि रात्री भरून ठेविलेले उदक श्राद्धास घेऊ नये व अभोज्यान्नाच्या डोणीतील उदक श्राद्धास घेऊ नये. शूद्राने आणिलेल्या उदकाने व मेधोदकाने स्नान, आचमन, दान, देवता व पितर यांचे तर्पण करू नये. उदक, तुळसी, गोमय व मृत्तिका ही रात्री आणू नयेत. तुळशी, बेल याशिवाय इतर पुष्पे व जान्हवीशिवाय इतर उदक पर्युषित (शिळे) टाकावे. दौहित्र, कुतुपकाल, छाग (बोकड) कृष्णाजिन, रौप्य, दर्भ, तिल, गाय व गेंड्याचे शिंगाचे पात्र हे पदार्थ पितृप्रिय होत. अरण्यसंबंधी काळे तीळ मुख्य होत. ते नसतील तर ग्रामसंबंधी पांढरे व काळे तीळ घ्यावेत. श्राद्धी छागाचे सान्निध्य अत्यंत प्रशस्त आहे. कुक्कुट, गावडुकर, काक, मांजर, शूद्र, षंढ व रजस्वला यांचे सान्निध्य अत्यंत निंद्य होय. चांडाळ, रजस्वला, लंगडा, कुष्टी, न्यूनांग, अतिरिक्तांग इत्यादिकांनी पाहिलेले अन्न अभोज्य जाणावे. आपत्ति असल्यास मृत्तिका, हिरण्य किंवा उदक यांच्या स्पर्शाने भक्षण करण्यास योग्य होय. पावमानी ऋचा व 'तरत' समंदी' या मंत्रांनी व गायत्री इत्यादि मंत्रांनी दर्भांनी जलाचे प्रोक्षण केले असता दूषित अन्न शूद्ध होते. पादुका, उपानह, छत्री, तांबडे वस्त्र, चित्रवस्त्र, तांबडे पुष्प व मांजर हे पदार्थ श्राद्धभूमिचे ठायी असु नयेत. घंटानाद, अश्व, धोत्रा, शंख व शुक्ति हे पदार्थ जवळ असू नयेत.