ब्रह्मचार्याचें मासिक, वार्षिक इत्यादि श्राद्ध मातापितरांनीं करावें. माता, पिता, मातामह, उपाध्याय व आचार्य यांवांचून इतरांचें ब्रह्मचार्यानें शव नेऊं नये व दहनादि अंत्यकर्म करुं नये. दुसरा कोणी अधिकारी नसेल तर माता, पिता, मातामह व आचार्य यांचें दहनादिक अंत्यकर्म करावें. त्यांत दहादिवसांचें कर्म करणें असल्यास १० दिवस अशौच धरावें; व दहनमात्र केलें असल्यास एक दिवस अशौच धरावें. त्याकालीं म्हणजे अंत्यकर्मामध्यें ब्रह्मचार्याचे नित्यकर्माचा लोप नाहीं. ब्रह्मचारी अशुचि असला तरी त्यानें अशौच धारण करणाराचें अन्न भक्षण करुं नये व त्याजबरोबर वास करुं नये. असें केलें तर प्रायश्चित्त व पुनरुपनयन हीं पुढें सांगेन. इतरांचे दहनादि कर्म केल्यास तीन कृच्छ्र व पुनरुपनयन करावें. कोणा एका स्वकीय वर्णाचें दहनादिक व श्राद्धादिक धर्मार्थ करील तर संपत्ति इत्यादि फल प्राप्त होतें. हा सर्व श्राद्धविधि शूद्रांचा अमंत्रक करावा. कित्येक ग्रंथकार असें म्हणतात कीं, वैदिक मंत्राचा पाठमात्र शूद्रास वर्ज्य आहे. पौराण मंत्र तर शूद्रांनीं पठण करावे. निर्णयसिंधूंत असें म्हटलें आहे कीं, पौरान मंत्रही शूद्रांनीं स्वतां पठण करुं नयेत. ब्राह्मणाकडूनही पठन करावेत व वेदमंत्र तर ब्राह्मणाकडूनही पठण करवूं नयेत. याप्रमाणें ब्राह्मणांच्या स्त्रियांनींही व्रतोद्यापनाप्रमाणें संकल्प मात्र स्वतां करुन वैदिक मंत्रांनीं युक्त सर्व श्राद्ध ब्राह्मणाकडूनच करवावे, असें पारिजातकाराचें मत आहे. शुद्रानें सदोदित आमान्नानेंच श्राद्ध करावें. ’पित्रे नमः पितामहाय नमः’ इत्यादिक नमोन्तनाम मंत्रानें निमंत्रण, पाद्य, आसन, गंध, पुष्य इत्यादि उपचारांनीं ब्राह्मणाची पूजा करुन आमान्न (कच्चें अन्न) निवेदन करुन सातूच्या पिठानें पिंडदानादि करुन दान, दक्षिणादान इत्यादि विधीनें श्राद्ध समाप्त करुन आपले सजातीयांस घरांत सिद्ध झालेल्या पक्वान्नांनीं भोजन घालावें. निर्णयसिंधूंत नाममंत्रानें आवाहन, अग्नौकरण, काश्यपगोत्रोच्चारपूर्वक पिंडदानादिक, तर्पणादिक आणि पक्वान्नांनीं पिंडदानादिक करावें असें सांगितलें आहे, तें सच्छूद्राविषयीं जाणावें. सात पुरुषांपर्यंत किंवा तीन पुरुषांपर्यंत परंपरेनें स्नान, वैश्वदेव, तर्पणादिक शूद्रकमलाकारादि ग्रंथांत संग्रहित केलेला धर्म नियमानें आचरण करणारा तो सच्छूद्र होय. याप्रमाणें भिल्ल, यवन इत्यादि हीन जातीयांनीं ब्राह्मणांस आमान्नदान व दक्षिणादान करुन आपआपल्या जातीस भोजन देणें हेंच श्राद्ध करावें. राजकार्यांत नियुक्त असलेल्यानें, कारागृहांत राहाणार्यानें व सर्व प्रकारच्या व्यसनांत असणारानें ब्राह्मणांकडून श्राद्ध करवावें. या उत्तरार्धांत प्रथम जीवत्पितृकाचा निर्णय सांगितला. त्यांतच प्रसंगानें किंचित् अधिकाराचा विचार सांगितला व आतां तर सर्व अधिकार्यांचा क्रमानें सविस्तर विचार सांगितला. त्यामुळें व शास्त्रव्युत्पत्ति नसणार्या बाळास बोध व्हावा या हेतूनें येथें पुनरुक्ति झाली. ती दोषांस कारण नाहीं. इतिश्रीमदनंतोपाध्यायसूनुविरचिते धर्मसिंधुसारे श्राद्धाधिकार निर्णयः समाप्तः ॥