अविवाहित स्त्रीचा पिता अधिकारी; पिता नसेल तर भ्राता इत्यादिक अधिकारी; विवाहित स्त्रीस पुत्र नसेल तर सापत्न पुत्र; त्याच्या अभावीं पौत्र व पौत्राच्या अभावीं प्रपौत्र अधिकारी. या सर्वांच्या अभावीं पति, पति नसल्यास कन्या, तिच्या अभावीं कन्यापुत्र; तो नसल्यास पतीचा भ्राता; पतीचा भ्राता नसल्यास पतीच्या भ्रात्याचा पुत्र; तो नसल्यास स्नुषा. तिच्या अभावीं पिता; पिता नसल्यास भ्राता; त्याच्या अभावीं पूर्वी सांगितलेलें भ्रातृपुत्रादि अधिकारी होत. येथें पुत्राव्यतिरिक्त जे अधिकारी सांगितले, त्यांस पुत्र समीप नसतील किंवा पुत्राचा अभाव असेल,तरच क्रियाधिकार आहे. पुत्र समीप नसल्यामुळें जर दुसरा कर्ता असेल तर पुत्रव्यतिरिक्तांनीं दहनाला आरंभ करुन सपिंडी करण्याच्या पूर्वींचेंच कर्म करावें. पुत्रव्यतिरिक्तांनीं सपिंडीकरण करुं नये. पुत्र नसल्यास इतरांनीं सपिंडीकरणही करावें. सपिंडापासून राजापर्यंत जे अधिकारी, त्यांतून कोणीही दहनाला आरंभ करुन दहा दिवसांच्या क्रिया कराव्या. याच क्रियांस पूर्वाक्रिया असें म्हणतात. अकराव्या दिवसापासून सपिंडीकरणान्त क्रियांस मध्यम अशी संज्ञा आहे. त्या सपिंडादिकांस सपिंडी पलीकडच्या अनुमासिक, सांवत्सरिक इत्यादिक क्रियांस ’उत्तर’ अशी संज्ञा आहे. त्या सपिंडादिकांनीं करुं नयेच, हा निर्णय मृताची वृत्ति इत्यादि स्थावर धन व जंगम धन घेतलें नसेल तरच लागू आहे. स्थावर किंवा जंगम यांतून कोणतेंही धन घेतलें असेल तर सपिंडादिकांनींही मध्यम व उत्तरसंज्ञक क्रिया कराव्याच. राजानें तर मृताचें धन असल्यास त्या धनानें मृताच्या सजातीयाच्या हांतून त्या मृताच्या सर्व क्रिया करवाव्या. धन नसेल तर पूर्वा क्रिया मात्र करवाव्या. इतर करवूं नयेत. सपिंडापासून राजापर्यंत जे अधिकारी त्यांहून भिन्न असणारांनीं मृताचें धन नसलें तरी आपल्या धनानेंच सपिंडीकरणान्त क्रिया करणें अवश्य आहे. मृताचें धन घेऊन त्याचें प्रेतकार्य न करणार्या सपिंडापासून राजापर्यंत सर्व अधिकार्यांस तद्वर्णवधाचें प्रायश्चित्त आहे. पुत्र आहे आदि ज्यास व भ्रात्याची संतति आहे अंतीं ज्यास, ते दौहित्र, दौहित्र पुत्र यांनीं, मृताचें धन घेतलेलें असो वा नसो, पूर्वोक्त तीन प्रकारच्या क्रिया अवश्य कराव्या.त्यांत स्त्रियांच्या उत्तर क्रिया मृत दिवशींच कराव्या. दर्शादि दिवशीं करुं नयेत; कारण भर्त्याचे श्राद्धानेंच निर्वाह होतो, असें वचन आहे. स्त्रियांच्या पूर्व व मध्यमसंज्ञक क्रिया पृथक् कराव्या. कित्येक ग्रंथकारांच्या मतें पुत्र व पती यांचा अभाव असल्यास स्त्रियांच्या दौहित्रादिकांनीं सपिंडीकरणविरहित उत्तरसंज्ञक क्रिया कराव्या; स्त्रियांचे सपिंडीकरण करुं नये. सपिंडीकरण नसलें तरी एकोद्दिष्ट विधीनें वार्षिकादि करावें असें म्हणतात. ब्राह्मणानें इतर वर्णाचें पैतृक कर्म करुं नये. काम, लोभ, मोह यांच्या आधीन होऊन यदा कदाचित् करील तर तज्जातित्वाला पावतो. शूद्रानेंही ब्राह्मनाचें पैतृक कर्म करुं नये.