गृह्याग्नीवर पाक करणे असल्यास विशेष सांगतो- प्रातःकाळी होम करून त्या गृह्याग्नीतून एकीकडचा अग्नि स्वैपाकघरात नेउन त्या अग्नीवर पाक करावा. पाक झाल्यावर पाकाग्नीतून काही अग्नि गृह्याग्नीत मिळवून गृह्याग्नीवर अग्नौकरण, वैश्वदेव इत्यादिक करावे. याप्रमाणे व्यवस्था जाणावि. कात्यायनादिकांनी गृह्याग्नीवर पाक करावा. आश्वलायनांनी नित्याच्या पाकाग्नीवर पाक करावा. अग्नौकरण करावयाचे ते आश्वलायनांनी व्यतिषंगाने श्राद्ध असता गृह्याग्नीवर चरु पक्व करून गृह्याग्नीवरच करावे. व्यतिषंगाचा अभाव असल्यास पाणीहोम करावा. अन्य शाखीयांनी गृह्याग्नीवरच अग्नौकरण करावे. विधुर व विच्छिन्नाग्निक असल्यास "पृष्टोदिवि०" या विधानादिकाने अग्नि उत्पन्न करावा. हे विधान पूर्वार्धात सांगितले आहे. भोजनाची पात्रे सुवर्णाची, रुप्याची, काशाची किंवा पळस, कमल, केळी, मोह यांच्या पानांची केलेली असावी.