गोमयादिकांनी भूमि व पात्रे यांची शुद्धि करावी. देवता, ब्रह्मचारी, संन्यासि व बालक यांस पिंडदान होईपर्यंत अन्न देऊ नये. फार लहान मुलास दुसर्या घरी भोजन घालावे. श्राद्धभूमिचे ठिकाणी तिल टाकावे, व बोकड बांधावे, पाक श्राद्धकर्त्याने स्वतःच करावा. स्वतः करण्याचा अभाव असल्यास शुचिर्भूत पत्न्कडून करवावा. अशी स्त्री नसेल तर बांधव, सगोत्र, सपिंड किंवा गुणवान मित्र यांजकडून करवावा. वंध्या, जारिणी, विधवा, परगोत्रात जन्मलेली व श्राद्धकर्त्याच्या मातापितरांच्या वंशात न जन्मलेली अशा स्त्रीच्या हातून श्राद्धाचा पाक करवू नये. श्राद्धपाकाची भांडी सोन्याची, रुप्याची, तांब्याची व काशाची असावीत. मृत्तिकेची असल्यास सर्व नवीन असावी, असे विद्वानांनी सांगितले आहे. पितळेची व रंगजात भांडी विहित किंवा निषिद्धही नाहीत. लोखंडाच्या स्थालीत श्राद्धान्न कधीही शिजवू नये. फले, शाका, इत्यादि चिरण्यासाठी जी विळी इत्यादिक शस्त्रे, त्याशिवाय लोखंडी शस्त्रे व भांडी यांचे दर्शनही पाकादि स्थानी निषिद्ध आहे. पक्व झालेले पदार्थ ठेवण्यास काष्ठाची पात्रे ही प्रशस्त होत. श्राद्धाचा पाक गृह्याग्नीवर किंवा लौकिकाग्नीवर करावा. ज्या अग्नीवर पाक केला असेल त्या अग्नीवर होम करावा.